Jump to content

कान्कुन

कान्कुन
Cancun
मेक्सिकोमधील शहर


कान्कुन is located in मेक्सिको
कान्कुन
कान्कुन
कान्कुनचे मेक्सिकोमधील स्थान

गुणक: 21°09′38″N 86°50′51″W / 21.16056°N 86.84750°W / 21.16056; -86.84750

देशमेक्सिको ध्वज मेक्सिको
राज्य किंताना रो
प्रांत बेनितो हुआरेझ प्रांत
स्थापना वर्ष एप्रिल २०, इ.स. १९७०
महापौर हुलियान रिकाल्दे मागान्या
समुद्रसपाटीपासुन उंची ० फूट (० मी)
लोकसंख्या  
  - शहर ६,२८,३०६
प्रमाणवेळ यूटीसी−०६:००
http://www.rio.rj.gov.br


कान्कुन तथा कॅन्कून हे मेक्सिकोच्या किंताना रो राज्यातील एक शहर आहे. युकातान द्वीपकल्पाच्या ईशान्य टोकावर वसलेले हे शहर जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे.,[] हे कॅरिबियन समुद्राच्या किनाऱ्यावर आहे.

नावाची व्युत्पत्ती

कान्कुन या माया भाषेतील शब्दाचे दोन अर्थ होतात. त्यातील एक सापांचे वारूळ किंवा सोनेरी सर्पाचे निवासस्थान असा होतो तर दुसरा अर्थ घडा असाही निघतो.

इतिहास

एल मेको पुरातत्त्वशास्त्रीय भाग.
यामिल लुउम (विंचवाचे देउळ).
एल मेकोचे एल कास्तियोवरून काढलेले छायाचित्र.

जुन्या स्पॅनिश दस्तऐवजांनुसार माया लोक कान्कुनजवळच्या भागाला निझुक (गवताळ प्रदेश) म्हणून ओळखत असत.[] स्पॅनिश आक्रमणानंतर येथील बहुतांश वस्ती सततच्या लढाया, चाचेगिरी, दुष्काळ आणि युरोपीय लोकांनी आणलेल्या रोगराईमुळे मृत्युमुखी पडली. येथील मूळ रहिवाशांपैकी हातावर मोजण्याइतक्याच छोट्या वसाहती इस्ला मुहेरेस आणि कोझुमेल द्वीपांवर तग धरून राहिल्या.

इ.स. १९७०मध्ये मेक्सिकोच्या सरकारने कान्कुनचा विकास करण्याचे ठरवले. त्यावेळी येथील वस्ती फक्त तीन लोकांची होती. ही तिघे दॉन होजे हेसुस लिमा गुतिरेझच्या मालकीच्या नारळाच्या वाड्यांतील कामगार होते. हे तिघे खुद्द कान्कुनमध्येही राहत नसून जवळील इस्ला मुहेरेस या बेटावर राहत होते. याशिवाय जवळील पुएर्तो हुआरेझ या कोळीवाड्यात ११७ व्यक्तींची वस्ती होती.[] अशा निर्जनस्थळी गुंतवणूक करण्यास कोणीच तयार नसल्याने मेक्सिको सरकारला स्वतःच येथील पहिल्या ९ होटेलांचा विकास करावा लागला.[] हयाट कान्कुन करिबे होटेलचे बांधकाम सर्वप्रथम सुरू झाले परंतु प्लाया ब्लांका (नंतरचे ब्लू बे होटेल व आताचे टेम्पटेशन रिसॉर्ट) हे होटेल पहिले बांधून झाले. त्यावेळी कान्कुनमध्ये राहणे हे अतिमहाग होते.

इ.स. १९७४मध्ये कान्कुनचा मोठे पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यासाठीचा प्रकल्प सुरू झाला. फोनातुर (फोंदो नॅसियोनाल दे फोमेंता आल तुरिस्मो) या मेक्सिकन सरकारी संस्थेचा हा याप्रकारचा पहिलाच प्रकल्प होता. पुढील काही वर्षात कान्कुनचे रूपांतर दाट झाडीत वसलेल्या छोट्या कोळ्यांच्या गावातून मेक्सिकोतील दुसऱ्या क्रमांकाच्या पर्यटनस्थळात झाले.

कान्कुनमध्ये राहणाऱ्या लोकांना कान्कुनेन्सेस असे संबोधतात. ही लोक मुख्यत्वे युकातान व जवळील राज्यांतून येथे आलेली आहेत. गेल्या काही वर्षांत अमेरिकेतील इतर भाग व युरोपमधूनही बरीच लोक येथे कायमची राहण्यास आली आहेत. अचानक झालेल्या या वस्तीवाढीमुळे कान्कुनच्या स्थानिक यंत्रणेवर मोठा ताण आलेला आहे.[] आत्तापर्यंत मेक्सिकोमधील अवैध मादक पदार्थांच्या व्यापार व वाहतूकीमुळे होत असलेल्या अराजकाचा कान्कुनवर फारसा थेट प्रभाव पडलेला नाही परंतु काही अंशी स्थानिक लोकांवर हा प्रभाव आहेच.[] १९९० व २००० च्या सुमारास येथे हुआरेझ कार्टेलचा प्रभाव होता. अलीकडील वर्षांत लॉस झेतास या गुंडांच्या टोळीने युकातानमधील चाचेगिरीत जम बसवलेला आहे.[]

शहराचा आराखडा

कान्कुन शहराच्या समुद्रकिनाऱ्यावरील हॉटेलांचे विहंगम दृष्य

झोना होतेलेरा नावाने ओळखला जाणारा पर्यटकांसाठीचा भाग आणि एल सेंत्रो नावाने ओळखले जाणारे खुद्द गावठाण असे कान्कुन शहराचे दोन मुख्य भाग आहेत. गावठाणाची रचना प्रचंड शंकरपाळ्यांच्या आकाराच्या अनेक सुपरमांझानांमध्ये विभागलेली आहे.[] या शंकरपाळ्यांच्या मध्यात मोकळी जागा, एखादे वाचनालय, फुटबॉल मैदान किंवा बाग असते व त्याच्या आजूबाजूने चालण्यासाठी व सायकलींच्या वाहतूकीसाठीचे मार्ग असतात. त्याबाहेरील भागांत नालाकृती रस्त्यांवर घरे व त्यांच्याबाहेरील भागात दुकाने व इतर व्यवसाय असतात.

आव्हेन्यू तुलुम हा उत्तर-दक्षिण जाणारा रस्ता शहराच्या मध्यवर्ती भागातून आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा मोठा रस्ता आहे. आव्हेन्यू कोबा हा पूर्व-पश्चिम रस्ता त्याला छेदतो व आव्हेन्यू तुलुमच्या पश्चिमेस हाच रस्ता आव्हेन्यू कुकुलकान नावाने ओळखला जातो. आव्हेन्यू कुकुलकान हा झोना होतेलेरामधील एकमेव मोठा रस्ता असून कान्कुनमधील बहुतांश मोठी होटेले या रस्त्यावर आहेत. आव्हेन्यू तुलुमच्या दक्षिण टोकास विमानतळतर उत्तर टोकास आव्हेन्यू बोनामपाक आहे. आव्हेन्यू बोलामपाक हा पश्चिमेस चिचेन इत्झा व मेरिदाला जाणाऱ्या महामार्गास जुळतो. कान्कुनच्या जवळच्या पुएर्तो हुआरेझ या उपनगरातून इस्ला मुहेरेसला जाणाऱ्या होड्या व नावांचा धक्का आहे.

कान्कुनमधील नवीन वसाहती सुपरमांझानामध्ये विभागलेल्या नसून चौकटींमध्ये बसविलेल्या आहेत. हरिकेन गिल्बर्टचा तडाखा बसल्यावर कान्कुनची पुनर्बांधणी करताना खर्च कमी करण्यासाठी असे केले गेले. येथील उच्चभ्रू वसाहतींमध्ये छोटे सुपरमांझाना बांधण्याचा प्रयत्न दिसतो. मध्यमवर्गीय वसाहतींमध्ये सहसा एक किंवा दोन मजली बैठी घरे असतात किंवा तीन-चार मजली सदनिकांच्या इमारती असतात. २००५ सालापासून आव्हेन्यू बोनामपाकच्या आसपास बहुमजली दुकाने, सदनिका तसेच शॉपिंग मॉल बांधली गेलेली आहेत. अगदी अलीकडील वसाहतींमध्ये नियोजनाचा अभावच दिसून येतो. पुंता साम, पुएर्तो कान्कुन आणि पुएर्तो हुआरेझमध्ये हे दिसून येते.[][]

वाहतूक

कान्कुन आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील मुख्य विमानतळ आहे. दक्षिणेस कोझुमेल द्वीपावरही एक छोटा विमातळ आहे. कान्कुन विमानतळावरून उत्तर, मध्य आणि दक्षिण अमेरिका, युरोप आणि आशियाला थेट विमानसेवा उपलब्ध आहे. ऑक्टोबर २०१०मध्ये या विमानतळावर दुसरी धावपट्टी बांधण्यात आली व त्यानंतर वर्षाला एक कोटी प्रवासी या विमानतळावरून येजा करतात. हा विमानतळ गावठाणापासून ३० किमी दक्षिणेस तर झोना होतेलेरापासून २० किमी आग्नेयेस आहे.[] शहरात तसेच झोना होतेलेरामध्ये सार्वजनिक बससेवाही उपलब्ध आहे. जवळील इस्ला मुहेरेसला जाण्यासाठी पुएर्तो हुआरेझमधून फेरी जाते.

माया संस्कृतीचे पुरातत्तवशास्त्रीय विभाग

एल रे पुरातत्तवशास्त्रीय विभाग

कान्कुनमध्ये काही ठिकाणी माया संस्कृतीचे अवशेष आढळतात. कोलंबसपूर्वकालातील हे अवशेष कान्कुनच्या दक्षिणेस व पश्चिमेसही विखुरलेले आहेत. लास रुइनास देल रे (एल रे) हे भग्नावशेष झोना होतेलेरामध्येच आहेत तर एल मेको हे मोठे अवशेष पुंता सामकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहेत. जवळच असलेल्या रिव्हियेरा माया आणि ग्रांदे कॉस्ता माया प्रदेशांमध्ये कोबा, मुयिल, च्कारेत, कोहुनलिच, किनिच्ना, झिबांचे, ओश्तांकाह, तुलुम, चाक्चोबेन, इ. ठिकाणी छोटीमोठी संवर्धनस्थळे आहे. पश्चिमेस जवळच चिचेन इत्झा हे माया संस्कृतीचे मोठे केंद्र युकातान राज्यात आहे.

हवामान

कान्कुनचे हवामान विषुववृत्तीय असून येथील ऋतूंमध्ये तापमानात फारसा फरक नसतो.

कान्कुनसह युकातानमध्ये मे ते डिसेंबर हा उन्हाळी वादळांचा काळ असतो. जानेवारीत महत्तम पाउस पडतो आणि फेब्रुवारी ते मे साधारणतः कोरडे महिने असतात. कान्कुनच्या आसपासचा प्रदेश कॅरिबियन वादळी पट्ट्यात मोडतो आणि अधूनमधून या वादळांचा तडाखा येथे बसतो. असे असताही गेली काही वर्षे वगळता मोठी वादळे येथे अभावानेच येतात. २००५सालचे हरिकेन विल्मा हे आत्तापर्यंतचे कान्कुनवर आलेले सगळ्यात मोठे वादळ होते तर १९९८८मधील हरिकेन गिल्बर्ट आणि २००७ चे हरिकेन डीन ही वादळे इतर मोठ्या वादळांपैकी होती.

शैक्षणिक संस्था

कान्कुनमध्ये गेल्या काही वर्षांत मोजक्या उच्चशिक्षणसंस्था सुरू झाल्या आहेत. यांत इन्स्तित्युतो तेक्नोलॉजिको दे कान्कुन, उनिव्हर्सिदादला साल कान्कुन, उनिव्हर्सिदाद आनाहुआक कान्कुन, उनिव्हर्सिदाद तेक्नोलॉजिका दे कान्कुन, उनिव्हर्सिदाद देल करिब, उनिव्हर्सिदाद इंतरअमेरिकाना पारा एल देसारोयो आणि तेक मिलेनियम यांचा समावेश होतो.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "OMT concede premio excelencia a la promoción turística de Cancún (México)" (स्पॅनिश भाषेत). ES. 02/3/2007. June 17, 2011 रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ [१] A proper Maya spelling of Nizuc may be “Ni’ su’uk” which translates to “promontory” or “point of grass”-Source-Some Historic Notes and Observations on Isla Cancún, Quintana Roo, published at FAMSI by Andrews, Anthony P.
  3. ^ a b c सीगेल, जुल्स. कान्कुन युझर्स गाइड. p. २०४.
  4. ^ बूथ, विल्यम. "कान्कुनच्या महापौरावर अवैध पदार्थांच्या वाहतूकीचा व काळ्या पैशांच्या व्यवहाराचा आरोप".
  5. ^ हॉली, क्रिस. "मेक्सिकोतील पर्यटनस्वर्गावर अवैध पदार्थांचे सावट". 2010-05-27 रोजी पाहिले.
  6. ^ [२] El Centro supermanzanas-Source-La arquitectura norteamericana, motor y espejo de la arquitectura española ... By José Manuel Pozo Municio, Javier Martínez González (स्पॅनिश मजकूर)
  7. ^ "संग्रहित प्रत". 2013-05-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-04-02 रोजी पाहिले.
  8. ^ "संग्रहित प्रत". 2011-07-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-04-02 रोजी पाहिले.
  9. ^ [३] CANCUN AIRPORT MAP (CUN) ICAO CODE (MMUN) LATITUDE 21.0° LONGITUDE 86.9°
  10. ^ "Normales Climatologicas 1951-2010". National Meteorological Service of Mexico. August 2011. 2015-07-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-08-30 रोजी पाहिले.
  11. ^ Weatherbase:Historical Weather for Cancún, Quintana Roo Archived 2013-04-11 at the Wayback Machine., Weatherbase. Retrieved July 17, 2012.

बाह्य दुवे