Jump to content

कादवा नदी

महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातली कादवा नदी ही एक छोटी नदी असली तरी गोदावरी नदीची एक महत्त्वाची उपनदी आहे. तिचा उगम आणि प्रवास दिंडोरी तालुक्यातून होतो.

उगम

सह्याद्री पर्वताच्या सातमाळा डोंगररांगेच्या कोपऱ्यातून ही नदी दिंडोरी तालुक्याच्या वायव्य भागातून आग्नेयेकडे धावते. तिचा किनारा आणि तळ खडकाळ असला तरी नदी बरीच रुंद आहे. ज्या भागातून ती वाहते त्या भागाच्या मानाने वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण थोडे आहे. नदीवर महत्त्वाचे जलसिंचन प्रकल्प आहेत. ही नदी जेथे गाोदावरीला मिळते तेथे पाणी उचलून धरणारा एक जलग्रहण बंधारा बांधला आहे. त्यामुळे नांदूर माध्यमेश्वर जलाशयाची निर्मिती झाली आहे. जलाशयाच्या मागे सरकलेल्या पाण्यामुळे त्या भागात भरपूर वनस्पती उगवतात आणि तेथील झाडांमुळे पक्ष्याची चांगली सोय होते. येथेच 'नांदूर माध्यमेश्वर पक्षी अभयारण्य' आहे.

नदीची उगमापासून ते धरणापर्यंतची लांबी ७४ किमी आणि एकूण पात्रविस्तार १६६४ चौरस किमी आहे.

उपनद्या

कादवा नदीच्या उत्तर आणि पश्चिम किनाऱ्याला सातमाळाच्या डोंगरावरून वहात आलेले अनेक ओढे मिळतात. उनंदा, कोळवण आणि धामण हे त्यांतले महत्त्वाचे ओढे होत.

उनंदा : या ओढ्याचा सातमाळाला समांतर असलेला प्रवास बरेच अंतर कापत जातो. या अंतरात त्याला अनेक छोटे ओहोळ येऊन मिळतात. त्यांपैकी वणीच्या जवळून वाहणारी देव नदी ही एक. पाराशरी ह्या दुसऱ्या नदीवर तिसगाव नावाचे एक छोटे धरण आहे. त्यांचे पाणी शेतीसाठी सोडतात. पाराशरी नदी ही पिंपळगाव बसवंत गावातून वाहते. ही निफाड तालुक्यातील शिरसगावजवळ कादवा नदीला मिळते. वडनेर जवळचा नेत्रावती नाला वैनता नदीला मिळाल्यावर वडाली नदी बनते. वडाली नदी ही वडाली भोई व शेलू गावांजवळून वाहते. उनंदा नदीवर ओझरखेड बांध आहे.

कोळवण ही नदी सह्याद्रीच्या दक्षिण भागातून उगम पावते. नदीवर वाघाड येथे वाघाड धरण आहे. धरणातून निघालेल्या पाण्याचा वाघाड तलाव बनतो. त्याचे पाणी शेतीसाठी उपयोगी पडते. हिला धामण नदी येऊन मिळते. संगमानंतर ह्या नद्या दिंडोरीजवळून वाहत वाहत दोन किमी अंतरावर राजापूर येथे कादवा नदीला मिळतात.

धरणे

कादवा नदीवर करंजवन आणि पालखेड ही धरणे आहेत.