Jump to content

कादंबरी

साधारणत: अधिक लांबीच्या काल्पनिक, वास्तव किंवा मिश्र कथा असलेल्या गद्य लेखनास कादंबरी असे म्हणतात. मराठी भाषेतील कादंबऱ्यांनी मराठी साहित्याचा ठेवा समृद्ध केला आहे. कादंबरी हा शब्द भारतात सातव्या शतकात होऊन गेलेल्या बाणभट्ट नामक कवीने लिहिलेल्या ’कादंबरी’ या ग्रंथनामावरून आला. हा ग्रंथ म्हणजे जगातली पहिली कादंबरी. इंग्रजीतली The Tales of Genji (द टेल्स् ऑफ जेंजी) ही पहिली कादंबरी ११ व्या शतकात लिहिली गेली.

कादंबऱ्याचे प्रकार

  1. ऐतिहासिक
  2. दलित
  3. ग्रामीण
  4. पौराणिक
  5. सामाजिक
  6. वास्तववादी
  7. राजकीय
  8. समस्याप्रधान
  9. शेेतकरीवादी
  10. बालकादंबरी
  11. वैज्ञानिक
  12. कौटुंबिक
  13. आत्मकथनात्मक
  14. काल्पानिक
  15. प्रसंग चित्रणपर

कादंबरी या साहित्य प्रकारचे स्वरूप

कादंबरी ह्या साहित्य प्रकाराला अभ्यासताना त्यासाठी असणाऱ्या करार, काळ,आवाज हे पैलू लक्षात घ्यावे लागतात. डॉ. मिलिंद मालशे यांनी दिलेल्या साहित्याच्या पायाभूत करार या संकल्पनेनुसार ‘कथन करणे’ हा कादंबरीचा करार सांगितला जातो. म्हणजेच कथानात्मक या साहित्याच्या मूलभूत प्रवृत्तीत ‘कादंबरी’ हा प्रकार मोडतो. यातून कादंबरीकार त्याने अनुभवलेल्या जीवनाचे त्रयस्थपणे कथन करत असतो. म्हणून या प्रकाराला आत्मनिष्ठ म्हणता येत नाही. कादंबरीत येणारा जीवनपट एका विशिष्ट काळाचे दर्शन घडवत असतो. कादंबरीत येणारा हा ‘काळ’ सुझन लॅंगरच्या ‘काळ’ या संकल्पनेनुसार भूतकाळ असतो. कादंबरी ही कथनात्मक स्वरूपाची असल्याने कादंबरीकार त्यातील व्यक्तिरेखांविषयी सांगत असतो, म्हणजे टी. रास इलियटच्या आवाजाच्या संकल्पनेनुसार कादंबरीचा ‘दुसरा आवाज’ असतो.

कादंबरी, लघुकादंबरी आणि दीर्घ कादंबरी

लघुकादंबरी म्हणजे कादंबरीच- फक्त लघू असे नाही. लघुकादंबरी ही तिच्या मुळापासूनच एक स्वतंत्र प्रक्रिया आहे. १८७२ साली विनायक कोंडदेव ओक यांनी 'शिरस्तेदार' लिहिली तेव्हापासूनच मराठीत हिचा आरंभ झाला. व्यक्ती आणि समाज यांचे यथार्थ चित्रण असलेल्या लाचखाऊ मामलेदाराच्या या आत्मपरीक्षणात्मक कहाणीला तेव्हा छोटेखानी कादंबरी संबोधले गेले होते. केवळ आकाराच्या दृष्टीने हा छोटेपणा नसून यात एकूणच लघुत्व आहे, व ते पुढे कसेकसे विकसित होत गेले हे पाहणे महत्त्वाचे आहे. लघुकादंबरी लिहिण्यासाठी लघुकथा, दीर्घकथा आणि नेहमीची कादंबरी विचारात घ्यावी लागते.

कथा-दीर्घकथा, लघुकादंबरी-कादंबरी असे म्हणण्यानेच जाणकार वाचकाच्या मनात त्यांतील भेद लक्षात येतो. पण कधीकधी लेखकाचीच द्विधा मनःस्थिती होते.'निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी' ही ह.मो. मराठे यांची लघुकादंबरी १९६९ साली साधनाच्या दिवाळी अंकात दीर्घकथा म्हणून प्रसिद्ध झाली. तिला पुस्तकरूप देताना मात्र लेखकाने आणि प्रकाशकानेही कादंबरी म्हणले. 'काळा सूर' या कमल देसाई यांच्या वाचकप्रिय लेखनाबाबतही असेच झाले.

डॉ. स्वाती सु. कर्वे यांनी त्यांच्या 'लघुकादंबरीचे साहित्य स्वरूप' या पुस्तकाच्या चौथ्या सूची विभागात गणपतराव शिरके, सद्गुणी स्त्री, ना.ह. आपटे यांच्यापासून ते हिदायतखान यांच्यापर्यंतच्या लघुकादंबऱ्यांची नामावली दिली आहे. इ.स. १९९६ ते २०१० या कालावधीतील महत्त्वाच्या लघुकादंबऱ्या, दीर्घकथा/कथांचीही यादी दिलेली आहे. प्रतीती ही सानिया यांची दीर्घकथा आहे, तर अवकाश ही त्यांचीच लघुकादंबरी आहे, डॉ. स्वाती सु. कर्वे. यांनी वामन मल्हार जोशी, विभावरी शिरूरकर, जयवंत दळवी, दिलीप पु. चित्रे, वसंत आबाजी डहाके अशा अनेकांच्या लेखनावरही सविस्तर लिहिले आहे.

जी कथात्म कलाकृती मानवी जीवनातील व्यक्तिगत पातळीवर अधिक विकास पावते किंवा एका सूत्राच्या मदतीने समूह जीवनाचे चित्रण करते; आपल्या मर्यादित विकासात एका स्वतंत्र जीवनांशाचे, संघर्षाने भान आणून देते; कादंबरीतंत्राने विकसित होऊन मर्यादित अवकाशात संपते ती लघुकादंबरी. वा जो अनुभव व्यक्तिगत पातळीवर अधिक रेंगाळत असतो किंवा एका सूत्रात समूहजीवनाचे, व मर्यादित परिघात एका संपूर्ण जीवनाचे चित्र उभे करीत असतो, असा कादंबरीतंत्राने विकसित होणारा कथात्म लेखनप्रकार म्हणजे लघुकादंबरी, असे स्वाती कर्वे लिहितात..

मराठी कादंबरीचा इतिहास

  • पहिली कादंबरी : यमुनापर्यटन (इ.स.१८५७), लेखक - बाबा पदमनजी. ही आधुनिक भारतीय भाषांतलीही पहिली कादंबरी समजली जाते.
  • पहिली लघुकादंबरी : शिरस्तेदार (इ.स. १८८१), लेखक - विनायक कोंडदेव ओक
  • पहिली सामाजिक कादंबरी : पण लक्षांत कोण घेतो (इ.स. १८९३), लेखक - हरी नारायण आपटे

भारतातील स्वातंत्र्यपूर्व काळातील मराठी कादंबऱ्या

१. कसे दिवस जातील (न. वि. कुलकर्णी) : यांचा खेडूत सृष्टीचे कादंबरीकर म्हणून गौरव झाला आहे.
त्यांची "मजूर"(१९२५) ही कामगार जीवनाचा वेध घेणारी कादंबरी आहे.
२. माकडीची माळ (अण्णा भाऊ साठे) : या कादंबरीत उपेक्षितांच्या जीवनातील वास्तव्य शब्दबद्ध केले आहे..
३. ब्राह्मणकन्या (श्री.व्यं. केतकर ) : कालिंदी या तरुणीची बंडखोर कहाणी या कादंबरीत वर्णिली आहे.


प्रसिद्ध मराठी कादंबरीकार

प्रसिद्ध कादंबऱ्या

  1. अमृतवेल (कादंबरी)
  2. आनंदी गोपाळ
  3. आमदार सौभाग्यवती
  4. आम्हांला जगायचंय
  5. उपकारी माणसे (त्रिखंड)
  6. कापूसकाळ
  7. काळोखातील अग्निशिखा
  8. कोसला
  9. छावा
  10. जरिला
  11. जीवन गंगा (काहूर)
  12. झाडाझडती
  13. झेप
  14. झोपडपट्टी
  15. झोंबी
  16. झुलू
  17. प्राजक्ताची फुले
  18. हाल्या हाल्या दुधू दे
  19. पखाल
  20. वारूळ
  21. पाटीलकी
  22. दंश
  23. स्मशानभोग
  24. आर्त
  25. झळाळ
  26. द लास्ट टेस्ट
  27. नो नाॅट नेव्हर
  28. एक पाऊल पुढं
  29. झुंड
  30. तांबडफुटी
  31. दुनियादारी
  32. पाचोळा
  33. पाणधुई
  34. पानिपत
  35. पार्टनर
  36. पोखरण
  37. फकिरा
  38. बनगरवाडी
  39. ब बळीचा
  40. महानायक
  41. मुंबई दिनांक
  42. मृत्युंजय
  43. ययाति
  44. रणांगण
  45. राऊ
  46. व्यासपर्व
  47. शूद्र्
  48. श्रीमान योगी
  49. सत्तांतर
  50. संभाजी
  51. सूड
  52. स्वामी
  53. ही वाट एकटीची
  54. तुडवण
  55. चाळेगत
  56. उजव्या सोंडेच्या बाहुल्या
  57. इंडियन अॅनिमल फार्म