काणे बुवा
जन्म १२ जानेवारी १९३८ (पौष वद्य सप्तमी)
महाराष्ट्रातील प्रख्यात बुजुर्ग कीर्तनकार कीर्तनकलाशेखर ह.भ.प. श्री नारायण श्रीपाद काणे. किर्तनातून अग्निहोत्र प्रचार आणि प्रसार हे बुवांचे मुख्य कार्य. या माध्यमातून बुवांनी आजवर ३ वेळा भारतभर दौरा केला आहे. शिवपुरी अक्कलकोट, येथील स्वामी समर्थावतार परम सद्गुरू श्री गजानन महाराज हे बुवांचे सद्गुरू. जवळपास २५ वर्षे बुवांना त्यांचा प्रत्यक्ष सहवास लाभला आहे.
काणे घराण्याची परंपरा
१. आद्य किर्तनकार चिमणाजी महाराज
महान दत्तभक्त. दत्तमहाराजांची यांच्यावर असीम कृपा होती व त्यांना दत्तदर्शन झाले होते. किर्तनासाठी त्यांनी संपूर्ण भारतभर प्रवास केला होता.
२. शिवरामबुवा
लोकप्रिय किर्तनकार. ग्वाल्हेरला जाऊन यांनी धृपद-धमारचा अभ्यास केला. उत्तम धृपदिये होते.
३. तात्याबुवा
उत्तम कीर्तनकार व उत्तम सारंगीवादक. तसेच उत्तम मृदुंगाचार्य होते. धृपद धमार गायकीला उत्तम साथ करत असत. उत्तम कीर्तनकार असा लौकिक होता. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक व थोर गायक विष्णू दिगंबर पलुसकर यांचे उत्तम स्नेही होते. तात्याबुवांचे कीर्तन जवळपासच्या गावात असेल तर पलुसकर बुवा नेहमी ऐकायला जात. सांगली जवळील वठाळ रेल्वे स्टेशनवर तात्याबुवा एकदा सारंगी वाजवीत बसले असता, एक नाग समोर फणा काढून दोन तास सारंगी ऐकत डोलत होता असा एक किस्सा तात्याबुवांविषयी नेहमी सांगितला जात असे.
४. हरि कृष्ण काणे / श्रीपाद कृष्ण काणे
हरि कृष्ण काणे हे तात्याबुवांचे थोरले चिरंजीव पट्टीचे कीर्तनकार होते. श्रीपाद कृष्ण काणे हे धाकटे बंधूही कीर्तनकार होते. ते हरि कृष्णांना पेटीची साथ करीत असत. हरि कृष्ण काणे बुवांना खूप लोकप्रियता मिळाली. त्यांच्या कीर्तनांना अलोट गर्दी होत असे याचे अनेक किस्से पूर्वीची मंडळी सांगत असत.
५. नारायण श्रीपाद काणे
हरि कृष्ण काणे व श्रीपाद कृष्ण काणे दोघांचीहि पुढील पिढी म्हणजेच काणे घराण्यातील ५ व्या पिढीत अनेक कीर्तनकार झाले. नारायण श्रीपाद काणे म्हणजेच काणे बुवा म्हणून सुपरिचित झालेल्या काणे बुवांनी आपले संपूर्ण आयुष्य कीर्तन कलेसाठी वाहिले आहे. शीघ्रकवी म्हणून यांची ओळख आहे. उत्तम काव्यनिर्मिती (पदं, स्तोत्र, अष्टके, ओवीबद्ध चरित्रलेखन), उत्तम संगीतकार व गायक यामुळे बुवा कीर्तनात स्वतःचीच पदे गातात. पूर्वीचे अनेक थोर गायक बुवांचे किर्तन ऐकायला अनेकदा हजेरी लावत. पं. रामभाऊ मराठे, पं. छोटा गंधर्व, पं. जितेंद्र अभिषेक अनेकदा बुवांचे किर्तन ऐकायला बसत असत.
शिक्षण व कार्याचा परिचय
वयाच्या १७ व्या वर्षी किर्तन सेवेला सुरुवात. लौकिक अर्थाने शिक्षण इयत्ता सातवी. त्यानंतर संस्कृत पंडित वामनशास्त्री चिंचणीकर, चिकोडी, बेळगाव यांच्याकडे संस्कृतचे शिक्षण व श्री. विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडे गाण्याची तालीम.
पुरस्कार व सन्मान
- किर्तन कलाशेखर (१९६५-६६)
- किर्तनाचार्यवर्य (काशी, १९६९)
- किर्तन चूडामणी
- किर्तन कौस्तुभ
- किर्तन भूषण (कीर्तनकार संमेलन, गोवा, १९८४)
- देवर्षी नारद पुरस्कार (१९९७-९८)
- किर्तनकलासागर (२०१०)
- किर्तन मार्तंड (उज्जैन, २०१०)
काणे बुवा - किर्तन वैशिष्ट्ये व सद्गुरुनाथा नमन
भक्तीरसपूर्ण सुरेल व मधुर आवाज, विषयाची सोपी पण प्रभावी व अर्थपूर्ण मांडणी, सर्व वयोगटातील श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची ताकद ही बुवांच्या किर्तनाची ठळक वैशिष्ट्ये. अतिशय सुरेल व खडा आवाज व भावपूर्ण गायन यामुळे बुवांच्या किर्तनात श्रोत्यांना गाणे ऐकण्याचा विशेष आनंद मिळतो. बुवांचे "सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे झरा" हे नमन अतिशय लोकप्रिय ठरले आहे. नमन ऐकण्यासाठी दुवा: https://www.youtube.com/watch?v=-X1X0t4pen8
करताल वादन
किर्तनात करताल वादन करणारे काणे बुवा हे महाराष्ट्रातील एकमेव किर्तनकार आहेत. बुवांचे करताल वादन आपण येथे ऐकू शकता. : https://www.youtube.com/watch?v=fnBCZ6aCgIw
श्री. गजानन महाराज, शिवपुरी अक्कलकोट जन्मशताब्दी कीर्तन संकल्प दौरा
बुवांच्या किर्तनाचे अग्निहोत्र प्रचार आणि प्रसार हे मुख्य उद्दिष्ट असते. २०१७-१८ हे श्रींचे म्हणजेच ‘परम सद्गुरू श्री गजानन महाराजांचे’ जन्मशताब्दी वर्ष आहे. हे निमित्त साधून किमान १०० ठिकाणी श्रींच्या जन्मकथेचे आख्यान सांगावे व किर्तनाच्या माध्यमातून अग्निहोत्र सांगावे असा बुवांचा संकल्प आहे. या कार्याची सुरुवात श्रींचे जन्मस्थान तसेच गंगा नदी किनारी खरगपूर, कलकत्ता येथे झाली असून, अमरकंटक, गरुडेश्वर, गिरनार, अयोध्या, काशी, प्रयाग, द्वारका, बुद्धगया, सिद्धपुर, हरिद्वार, उज्जैन अश्या सर्व प्रमुख तीर्थक्षेत्रांवर या संकल्पनिमित्त बुवांनी या वर्षभरात कीर्तने केली आहेत. या संकल्प मालिकेतील १०८ कीर्तने पूर्ण झाली आहेत. तरी १७ मे २०१८ या ‘श्री’ म्हणजेच ‘परम सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या’ जन्मशताब्दी वर्ष समाप्ती पर्यंत जास्तीत जास्त ठिकाणी ही कथा सांगावी असा बुवांचा मानस आहे.
प्रकाशित साहित्यः
ध्वनिफिती:
‘गुरुप्रसाद’, ‘नाना तरंग’, ‘दत्तदरबार’, ‘भरली माझी झोळी’
कवितासंग्रह:
‘स्पर्श’
प्रकाशित पुस्तके:
‘ध्यास पाउलांचा’, ‘न्यास पाउलांचा’, ‘वर्षाव श्री कृपेचा’
‘सप्तशती सोनाई’
परमसद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या मातोश्री सर्वमंगला सोनामाता यांचे ओवीबद्ध चरित्र
‘गीत गजानन’
गीतकार, संगीतकार व गायक- परमसद्गुरू श्री गजानन महाराज, शिवपुरी अक्कलकोट यांच्या चरित्रावर आधारित ५६ गीतांचा संग्रह
‘गीत समर्थायन’
गीतकार, संगीतकार व गायक- श्री समर्थ रामदास स्वामींच्या जीवनचरित्रावर आधारित ४० गीत रचना
‘गाथा नारायणी’
बुवांनी आजवर लिहिलेली सर्व पदे, स्तोत्रे, अष्टके, रचना यांचा एकत्रित संग्रह.
पदयात्रा
कवठे गुलंद (जि. कोल्हापूर) ते अक्कलकोट ही पायी वारी काणे बुवा गेली ४५ वर्षे करीत आहेत. गेली ४५ वर्षे अनेक पदयात्रींना बरोबर घेऊन बुवांचे हे व्रत अखंडितपणे सुरू आहे.
अधिकृत वेबसाईट: kanebuwa.com