Jump to content

कांचनगड

कांचनगड
नावकांचनगड
उंची
प्रकारगिरिदुर्ग
चढाईची श्रेणीमध्यम
ठिकाणनाशिक, महाराष्ट्र
जवळचे गावनाशिक, वडाळाभोई, सटाणे, खेळदरी
डोंगररांगअजंठा-सातमाळा
सध्याची अवस्थाव्यवस्थित
स्थापना{{{स्थापना}}}


इतिहास

छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतेची संपत्ती लुटल्यानंतर, हा खजिना कांचनगडच्या मार्गाने रायगडी नेत असताना मोगली सरदार दाऊदखान आडवा आला होता. या दाऊद खानाला कांचन किल्ल्याच्या जवळ असणाऱ्या भाऊड खिंडीजवळ गाठून महाराजांनी त्याचा सपाटून पराभव केला. छत्रपती शिवरायांनी दुसऱ्यांंदा जेव्हा सुरत लुटली तेव्हाही सरदार दाऊदखान आडवा आला व कांचन किल्ल्याच्या पायथ्याशी मराठा मोगल हातघाईवर आले. मराठ्यांनी बेरीरगिरी तंत्राचा वापर करून मोगलांचा पाडाव केला छत्रपती शिवराय स्वतः हा लढाईत मोगलांशी लढले. शिवरायांचा प्रत्यक्ष सहभाग असलेली ही लढाई इतिहासात खूप महत्त्वाची मानली जाते.

भौगोलिक स्थान

नाशिक जिल्ह्यात दुर्गांची संख्या मोठी आहे. हे दुर्ग गिरिदुर्ग प्रकारात मोडणारे असल्यामुळे बेलाग आहेत. यातील अनेक दुर्ग एकेका डोंगर रांगेमध्ये असल्यामुळे दुर्गांची साखळीच तयार झाली आहे. नाशिक शहराच्या उत्तरेकडे भौगोलिकदृष्टया अतिशय महत्त्वाची अशी अजंठा-सातमाळा ही डोंगररांग आहे. या डोंगर रांगेची सुरुवात अचला नावाच्या किल्ल्यापासून होते. या पूर्व-पश्चिम पसरलेल्या रांगेत अनेक दुर्ग ठाण मांडून बसले आहेत.याच रांगेत माथ्यावर तुरा शोभावा असा सुळका घेऊन उभा आहे, तो कांचनगड अथवा कंचना किल्ला.

कसे जाल ?

नाशिक-सटाणे मार्ग या सातमाळा रांगेला छेदून जातो. येथे लहानसा घाट रस्ता आहे. या घाटाच्या पश्चिम अंगाला कांचनगड आहे. या घाटाजवळ खेळदरी नावाचे लहानसे खेडे आहे. खेळदरी हे खेडे भाऊ खिंडीच्या दक्षिण पायथ्याशी आहे. नाशिक वडाळाभोई सटाणे अशी एस.टी.ची सेवा आहे. या एस. टी. मार्गाने अथवा चांदवड या तालुक्याच्या गावाकडूनही गाडीमार्गाने खेळदरीपर्यंत पोहोचता येते. खेळदरीपासून चालत अर्ध्या पाऊण तासात माणूस कांचनच्या पायथ्याला पोहोचू शकतो. पायथ्यापासून मळलेल्या वाटेने कांचन मंचनच्या मधील खिंडीत पोहोचेपर्यंत तासभर लागतो.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

खिंडीच्या उजव्या बाजूच्या गुहेमध्ये पाण्याची टाकी कोरलेली आहेत. खडकांमध्ये कोरलेल्या या टाक्यामधील पाणी थंडगार असून पिण्यायोग्य आहे. या गुहेमधून मंचनचे दृष्यही उत्तम दिसते. खिंडीतून काहीश्या घसाऱ्यावरून कसरत करीत कांचनगडाच्या माथ्यावर पोहोचता येते. माथ्यावर गडपणाच्या काहीश्या खाणाखुणा सोडल्या तर उभी असलेली एकही वास्तू नाही. पाण्याच्या तीन टाक्या आहेत. माथ्यावरचा सुळका चढण्यासाठी सोबत आवश्यक असे गिर्यारोहणाचे साहित्य हवे.

कांचनावरून पूर्वेकडे कोळदेहेर, राजदेहेर, इंद्राई हे किल्ले तसेच साडेतीन रोडगा नावाच्या सुळक्याचे दर्शन उत्तम होते. तर पश्चिमेकडे विखाऱ्याचा सुळका लक्ष वेधून घेतो. त्याच बरोबर सातमाळा रांगेतील धोडप, खळा-जवळा, सप्तश्रृंगी, अहिवंत हे किल्ले दिसतात. स्वच्छ हवामानात उत्तरेकडे साल्हेर सालोटा, मुल्हेर, चौल्हेर तसेच कऱ्हेगडापर्यंत डोंगररांग दिसते.

कांचनवरून पुन्हा खिंडीत आले की मंचन नावाचा भाग येतो. गडाच्या या भागात अनेक अवशेष व पाण्याची टाकी पहायला मिळतात.