कांचन मार्कंड अधिकारी
कांचन मार्कंड अधिकारी तथा कांचन शरद घारपुरे (२३ एप्रिल, ??? - ) या चित्रपट अभिनेत्री व निर्मात्या आहेत.
नाटक, चित्रपट, दूरदर्शन या माध्यमांतून अभिनयाने सुरू झालेला प्रवास यशस्वी निर्मितीपर्यंत नेणाऱ्या कांचन अधिकारी यांचे पूर्वाश्रमीचे नाव कांचन शरद घारपुरे. एका मध्यमवर्गीय व सुसंस्कारित कुटुंबात मुंबई येथे त्यांचा जन्म झाला. वडील शरद घारपुरे मुंबईला श्रीनिवास मिलमध्ये नोकरी करत होते आणि आई कुसुम घारपुरे कीर्तनकार होत्या. शालेय वयापासूनच त्यांना अभिनयक्षेत्राचे आकर्षण होते. मुंबईच्या एम.एल. डहाणूकर महाविद्यालयातून त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली. त्यानंतर ‘आविष्कार’ या नाट्यसंस्थेच्या शिबिरात अभिनयाचे प्रशिक्षण घेतले.
वाणिज्य शाखेच्या शिक्षणामुळे त्यांनी ‘बँक ऑफ इंडिया’मध्ये ५ ते ६ वर्षे नोकरीही केली. याच दरम्यान त्यांनी महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेमध्ये रत्नाकर मतकरींच्या एका नाटकात काम केले. या भूमिकेचे खूप कौतुक झाले आणि त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला. या नाटकानंतर रंगभूमीवरील त्यांची वाटचाल सुरू झाली, पण दरम्यान दूरदर्शनच्या मुंबई केंद्रावर भक्ती बर्वे यांच्या प्रोत्साहनाने निवेदिका म्हणून त्यांची निवड झाली. १९८५ ते १९८८ या तीन वर्षांच्या काळात त्यांनी दूरदर्शन वाहिनीवर निवेदिका व वृत्तनिवेदिका म्हणून कामाचा अनुभव घेतला, तो भविष्यात त्यांच्या कुटुंबीयांच्या ‘सब टी.व्ही.’ अर्थात ‘श्री अधिकारी ब‘दर्स’ यांच्या खाजगी वाहिनीसाठी उपयुक्त ठरला.
‘बबन प्रभू’ लिखित ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’ या पहिल्या व्यावसायिक नाटकातून कांचन अधिकारी यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. या पहिल्याच नाटकामुळे त्यांना भक्ती बर्वे, आत्माराम भेंडे, दिलीप प्रभावळकर, माधव वझे या कलाकारांसह काम करण्याचा अनुभव मिळाला. या नाटकातील भूमिकेमुळे ‘प्रेमासाठी वाट्टेल ते’ या प्रकाश भेंडे यांच्या चित्रपटात त्यांना संधी मिळाली. अशोक सराफ या दिग्गज कलाकाराबरोबर नायिका म्हणून या चित्रपटात काम केले. कांचन अधिकारी यांनी बाबा सावंत यांच्या ‘हिचं काय चुकलं?’ या चित्रपटात रंजना, विक्रम गोखले यांच्यासह भूमिका केली होती. हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता. किरण शांताराम यांची निर्मिती असलेल्या, गिरीश घाणेकर दिग्दर्शित ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी’ या चित्रपटातही भूमिका साकारली. १९८९ साली आलेल्या या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांनी मार्कंड अधिकारी यांच्याशी विवाह केला.
लग्नानंतर काही काळ अभिनयक्षेत्रापासून दूर राहिल्यानंतर कांचन अधिकारी यांनी १९९५ साली ‘दामिनी’ या अत्यंत लोकप्रिय मालिकेच्या दिग्दर्शनाने या क्षेत्रात पुनरागमन केले. पंधराशेपेक्षा जास्त भाग चाललेल्या या मालिकेने अनेक पुरस्कारही मिळवले. आठ वर्षे चालू असलेल्या या मालिकेने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. कांचन अधिकारी यांनी मराठी चित्रपटांबरोबरच हिंदी चित्रपटातही भूमिका केल्या. दादा कोंडके यांच्या ‘आगे की सोच’ या हिंदी चित्रपटात शक्ती कपूर, स्वप्ना या कलाकारांबरोबर सहजतेने अभिनय केला. ‘ये जो है जिंदगी’, ‘बनते बिगडते’, ‘और भी है राहें’, ‘तितलियॉं’ यासारख्या हिंदी मालिकांमध्ये अभिनय केलाच, शिवाय ‘अभी तो मै जवान हूॅं’, ‘संबंध’, ‘डोली लेके आयी है दुल्हनियॉं’, ‘हॅंसी वो फसी’ या हिंदी मालिकांचे दिग्दर्शनही केले.
‘श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क लिमिटेड’ या आपल्या कुटुंबाच्या व्यवसायात सक्रिय सहभाग घेऊन ‘मी मराठी’ या मराठी वाहिनीच्या कार्यक्रमांच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहेत. त्यांनी रोहिणी हट्टंगडी, अजिंक्य देव, रेणुका शहाणे या कलाकारांना घेऊन ‘अंतर’ या दूरदर्शनपटाचे, ‘मानिनी’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटानंतर ‘तुक्या तुकविला नाग्या नागविला’, ‘दोन घडीचा डाव’, ‘मोकळा श्वास’ अशा वेगळ्या वाटेने जाणाऱ्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. तसेच ‘चोरावर मोर’ यासारख्या काही मराठी मालिकांचेही दिग्दर्शन केले आहे. साजिद खान यांच्या ‘सब कुछ हो सकता है’ या मालिकेची संकल्पना आणि दिग्दर्शन कांचन अधिकारी यांनी केले. सत्य घटनेवर आधारित २०१८ मध्ये आलेला ‘इंडिअन नेव्हर अगेन निर्भया’ हा हिंदी चित्रपट त्यांनी प्रोड्यूस तर केलाच आणि यात अभिनय देखील केला आहे.
रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन या माध्यमांतून अभिनय आणि दिग्दर्शनाबरोबर ‘ध्रुव सेवाभावी संस्थे’च्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांमध्येही कांचन अधिकारी यांचा सहभाग असतो. एकूणच सर्व माध्यमांची जाण असलेल्या कांचन अधिकारी यांचे निर्माती म्हणून काम आजही सुरू आहे.