Jump to content

कळसूबाई शिखर

कळसूबाई (Kalsubai) हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १६४६ मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची ऊंची अंदाजे ९०० मीटर आहे. यातील अर्ध्या ऊंची पर्यंत गावकऱ्यांनी पायऱ्यांची शेती केलेली आहे. कठीण कातळटप्प्यांवर शिड्या बसविलेल्या आहेत. त्यामुळे ३ ते ४ तासात कळसूबाईचे शिखर सर करणे सहज शक्य आहे. भंडारदरा धरण येथून ६ कि.मी वर आहे. तेथे २ दिवस मुक्काम करून कळसूबाई , रंधा धबधबा, कोकणकडा इत्यादी ठिकाणे पाहाता येतात.

कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच पर्वतशिखर आहे.समुद्रसपाटीपासून त्याची उंची ५४०० फूट म्हणजे सुमारे १६४६ मीटर आहे.[][][] नाशिक-इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते. बारी हे गाव कोळी महादेव या आदिवासी जमातीचे आहे. या गावापासून कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे. देवीची अशी आख्यायिका सांगितली जाते की, कळसुबाई ही तेथील गावातील सून होती आणि तिला बऱ्यापैकी औषधी वनस्पतींबद्दल ज्ञान होते. त्याने ती गावातील लोकांची सेवा करत असे. कालांतराने तिच्या मृत्यू नंतर गावातील लोकांनी तिची ओळख म्हणून त्या शिखराला तिचे नाव दिले आणि तिची आठवण म्हणून शिखरावर एक छोटे मंदिर बांधले. आदिवासी समाजामध्ये पूर्वजांना देव मानले जाते म्हणून आजही कळसुबाईला ते आपली देवी मानतात. कळसुबाई ही आदिवासींची कुलदेवी आहे. संगमनेर गावापासूनही भंडारदरामार्गे बारी गावास जाता येते. ट्रेकिंगचा छंद असेल तर भेट द्यायला हे एक उत्तम ठिकाण आहे..

इतिहास

कळसूबाईचा इतिहास म्हणजे एक दंतकथा आहे. प्राचीनकाळी कळसू नावाची कोळ्याची मुलगी होती. ती पाटलाच्या घरी कामाला होती. कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला अट घातली होती की, मी केर काढणे व भांडी घासणे सोडून इतर कामे करीन. एकदा पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले, पाटलाने कळसूला भांडी घासायला लावली, त्यामुळे चिडून कळसू डोंगरावर जाऊन राहू लागली. तोच कळसूबाईचा डोंगर होय.

पाहण्याची ठिकाणे

कळसूबाईचा डोंगर चढायला सुरुवात केल्यावर पहिल्या टप्प्यावर कळसूबाईचे नवीन मंदिर लागते. ज्या लोकांना शिखरावर जाणे शक्य नाही, त्यांच्या सोईसाठी हे मंदिर बांधलेले आहे. पुढे दुसरी शिडी पार केल्यावर कातळात दोन पावले कोरलेली आहेत, ती कळसूबाईची पावले आहेत अशी श्रद्धा आहे. शेवटच्या शिडीच्या खाली विहिर व बाजूला एक पत्र्याची शेड आहे. शिखरावर कळसूबाईचे छोटे मंदिर आहे. देवळात साधारण ३ माणसे बसू शकतील एवढीच जागा आहे. येथून समोरच खाली भंडारदयाचा अथांग पसरलेला जलाशय लक्ष वेधून घेतो. या शिखरावरून उत्तरेला रामसेज, अचला, अहिवंत, सप्तश्रुंग, मार्कंडा, धोडप, रवळया जवळया, कोळधेर अशी डोंगररांग नजरेस पडते. पूर्वेकडे औंढा, विश्रामगड, अलंग, मदन, कुलंग, माथेरान, हरिश्चंद्रगड लक्ष वेधून घेतात.

पोहोचण्याच्या वाटा

या शिखरावर जाण्यासाठी मुख्य वाट ही बारी गावातून जाते. भंडारदऱ्यापासून ‘बारी’ हे गाव अवघ्या ६ कि.मी अंतरावर आहे. बारी गावात जायचे झाल्यास मुंबई-नाशिक मार्गावर इगतपुरी गाठावे. इगतपुरीवरून भंडारदऱ्याला जाणाऱ्या एसटी ने बारी या गावी यावे. येथून शिखरावर जाण्यास ३ तास लागतात. वाटेत तीन ठिकाणी आता लोखंडी शिडया बसविलेल्या आहेत. गावातच सामान ठेवून ५ ते ६ तासात शिखरावर जाऊन येता येते. गावातून बाहेर पडल्यावर एक ओढा लागतो. हा ओढा ओलांडून झाल्यावर थोडयाच अंतरावर एक मंदिर लागते. या मंदिराच्या मागच्या बाजूने जाणारी वाट थेट शिखर माथ्यापर्यंत घेऊन जाते.

स्वतःचे वाहन असल्यास मुंबई - कसारा मार्गे घोटी गाठावे. घोटी - सिन्नर मार्गावर भंडारदरा फाटा आहे.या फाट्यावरून भंडारदऱ्याला जातांना, भंडारदऱ्याच्या अलिकडे ६ कि.मी अंतरावर ‘बारी’ हे गाव आहे.

राहाण्याची सोय

येथे शिखरावर रहाण्याची सोय नाही. शिखरा खालील शेडमध्ये किंवा भंडारदऱ्याला किंवा बारी गावात राहण्याची सोय होऊ शकते.

जेवणाची सोय

बारी गावात/ भंडारदऱ्याला जेवणाची सोय होते. तसेच सध्या शिखरावर असणाऱ्या विहिरीलगत चहा आणि भजी उपलब्ध आहे. शिखरावर चढताना कमीत कमी समान न्यावे , रस्त्यात जागोजागी नाश्ता,चहा, पाणी, जेवण देखील मिळत असते.

पाण्याची सोय

शिखरावर जाताना शेवटच्या टप्प्यावर शिडीच्या आधी एक विहीर आहे. वाटेत पाणी मिळत नसल्याने बारी गावातच पाणी भरून घ्यावे.

जाण्यासाठी लागणारा वेळ

बारी गावातून ३ ते ४ तास लागतात.

छायाचित्रे

पहा : कळसूबाईची रांग

संदर्भ

  1. ^ [१] विकिमॅपियावर कळसूबाई
  2. ^ [२] कोर्ट.महा.एनायसी.इन हे संकेतस्थळ
  3. ^ [३] पॅनोरामियो डॉट कॉम या संकेतस्थळावर कळसूबाई शिखराची छायाचित्रे