कळलावी
कळलावी (शास्त्रीय नाव: Gloriosa Superba, ग्लॉरिओसा सुपर्बा ; इंग्लिश: glory lily, ग्लोरी लिली, फ्लेम लिली, सुपर लिली) ही लिली प्रजातीतील एक वनस्पती आहे. ही वनस्पती आफ्रिका व आशिया खंडांमध्ये आढळते. ग्लोरिअस म्हणजे सुंदर फुले येणारी आणि ती सुंदर दिसते म्हणून सुपर्बा.
सुलभ प्रसूतीसाठी आदिवासी आणि पारंपरिक औषधी पद्धतीमध्ये मुळाचा लेप ओटीपोटावर लावला जातो. बाळंतिणीला प्रसूतीच्या वेळी कळा आणण्यासाठी वापर होत असल्याने या वनस्पतीला "कळलावी' म्हणले जाते. कळलावीच्या फुलांच्या पाकळ्यांची टोके तांबडी व मधला भाग पिवळा असल्याने अग्निज्वाला असल्याचा भास होतो. अग्निज्वालाप्रमाणे असणाऱ्या या पाकळ्या दुरून समईत ज्योती तेवल्याप्रमाणे दिसतात, म्हणूनच या वनस्पतीला ‘अग्निशिखा’ असेही म्हणतात.
फुलांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे या वेलीला अग्निमुखी, अग्निशिखा, कलहारी, खड्यानाग, गौरीचे हात, नखस्वामिका, बचनाग आणि अशी खूप नावे आहेत. फुले नसतानाही ही वेल तिच्या कुरळ्या कुरळ्या नखरेल पानांमुळे सहज ओळखू येते. हिच्या पानांना देठ नसतात. पाने साधी. पानांचा शिराविन्यास समांतर असून खोडावरील मांडणी एका आड एक लांबट शंकूच्या आकाराची, परस्परविरोधी, गुंडाळलेली, टोकदार असतात. पानांची टोके स्प्रिंगसारखी विळखे घेऊन पकड घेत घेत वर चढतात.
आढळ आणि वर्णन
ही बहुवर्षायू वनस्पती भारतातील उष्ण कटिबंधातील जंगलात कमी-अधिक प्रमाणात आढळते. पश्चिम घाट, कोकण, सातपुडा, सातमाळ्याचे डोंगर या ठिकाणी महाराष्ट्रात ही प्रजाती आढळून येते. हिची मुळे इंग्रजी मुळाक्षर एल् किंवा व्ही. या अशा विशिष्ट आकाराची, हाताच्या बोटासारखी असतात. कंद पांढऱ्या रंगाचे, गुळगुळीत असतात. पाने एकाआड एक, खोडाला लागून आलेली असतात. पानाचा शेंडा टोकदार स्प्रिंगसारखा दुसऱ्या झाडाच्या आधारासाठी तयार झालेला असतो. ही वेल १०-२० फुटापर्यंत वाढते. फुले आकर्षक, सुरुवातीला हिरवी, त्यानंतर पिवळी, नारिंगी आणि शेवटी लाल रंगाची होतात. फळे आधी हिरवट अस्तात व परिपक्व होताना राखाडी-पिवळी होतात. बिया गोलाकार, राखाडी रंगाच्या असतात.
कळलावीची फुले दिसेनाशी झाली म्हणजे, कळलावीचे झाड नक्की कोठे होते, हेही ओळखणे कठीण जाते. कारण पाने व वेलही ताबडतोब वाळतो. कंद सुप्तावस्थेत राहातो व पुढील पावसाळ्यात ते आपला जीवनक्रम पुन्हा सुरू करतात.
रोपवाटिका आणि लागवड
या वनस्पतींची लागवड परिपक्व फळांतील बियांद्वारे आणि कंदाने केली जाते. फुले ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत येऊन फळे डिसेंबर-जानेवारीपर्यंत मिळतात. फळे जमा करून त्यातील बिया वेगळे करून आठ दिवस सावलीत वाळवतात. चांगले वाळलेले बियाणे सहा ते नऊ महिने टिकते. त्यानंतर ते रोपवाटिकेतील रोपे तयार करण्यासाठी वापरता येते. फेब्रुवारी-मार्च महिन्यात केलेली रोपे जून ते ऑगस्ट या कालावधीत लागवडीसाठी उपयोगी पडतात.
औषधी उपयोग
कळलावीचे कंदांत, बियांत आणि पानांमध्ये कॉल्चीसीन, थिओकॉलचीचीन, कॉलचीकोस्टेरॉल बीटा सायटोस्टॉल इत्यादी रसायने आढळतात. सूज, व्रण, गंडमाळ, शोथ, अर्श इत्यादी विकारांत कललावीचा वापर केला जातो. विंचू व सर्पदंशावर हिचा वापर होत असे. कृमी, काष्ठ, विषमज्वर, दौर्बल्य यांमध्येही कळलावी उपयोगी आहे. फुले धार्मिक उत्सवासाठी गौरीचे हात म्हणून गौरी गणपतीला वाहिली जातात. कर्करोग, पोटाचे विकार यावरही कळलावी गुणकारी आहे. पानाच्या रसाचा उपयोग विषारी बाण तयार करण्यासाठी केला जात असे. जनावरांच्या कर्करोगातही या वनस्पतीचा वापर होतो.
कळलावी वनस्पतीच्या पानांच्या रसाने उवा मरतात.
अतिवापरामुळे संकटग्रस्त
कळलावी या वनस्पतीचा वापर औषधी आणि धार्मिक कार्यासाठी केला जातो. अलीकडच्या काळात या प्रजातीचा वापर वेदनाशामक, वेदनानाशक औषधांमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. कळलावीची मुळे आणि बिया औषधात वापरल्या जात असल्याने उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे ही प्रजाती संकटग्रस्त वनस्पतींच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहे.
बाह्य दुवे
- फ्लॉवर्स ऑफ इंडिया - कळलावी (इंग्लिश मजकूर)