कल्याणी विद्यापीठ
कल्याणी विद्यापीठ हे एक पश्चिम बंगालमधील एक विद्यापीठ. नडिया जिल्ह्यातील कल्याणी या गावी १९६० मध्ये स्थापन झाले. नडिया जिल्ह्यातील चकढा आणि हरिणघाट व चोवीस परगणा जिल्ह्यातील बीजपूर हे भाग ह्या विद्यापीठाच्या क्षेत्रात येतात. ह्याशिवाय पश्चिम बंगालमधील कृषी व पशुवैद्यक महाविद्यालये त्याच्या कक्षेत समाविष्ट झालेली आहेत. विद्यापीठाचे स्वरूप मुख्यत्वे निवासी व अध्यापनात्मक आहे. कला, विज्ञान, कृषी व पशुवैद्यक ह्या विषयांच्या शाखोपशाखा विद्यापीठात असून अलीकडे विद्यापीठाने त्रैवार्षिक पदवी-अभ्यासक्रम अवलंबिला आहे. विद्यापीठाचे संविधान इतर विद्यापीठांप्रमाणेच असून सवेतन कुलगुरू हा प्रशासनाचा सर्वोच्च अधिकारी असतो. त्यास प्रशासकीय बाबतींत कुलसचिव साहाय्य करतो. कुलगुरूची नियुक्ती चार वर्षांकरिता होते. विद्यापीठाचे माध्यम अद्यापि इंग्रजीच आहे. हे निवासी विद्यापीठ असल्यामुळे बहुतेक विद्यार्थी विद्यापीठाच्या वसतिगृहांतून राहतात. १९७१ – ७२ मध्ये असे १,९८६ विद्यार्थी शिकत होते. विद्यापीठाचे ग्रंथालय आधुनिक ग्रंथसंपदेने संपन्न असून त्यात सु. ६७,००० ग्रंथ होते (१९७२). विद्यापीठाचे वार्षिक उत्पन्न सु. ८६⋅५३ लाख रु. होते (१९७२).