कल्पतरू
कल्पतरू | |
---|---|
प्रकार | दैनिक |
प्रकाशक | नारायण काकडे |
स्थापना | १० जानेवारी १८८८ |
भाषा | मराठी |
मुख्यालय | महाराष्ट्र, भारत |
सोलापूरचे आद्य पत्र म्हणजे शंभरी पार करून गेलेले कल्पतरू आनंदवृत्त हे साप्ताहिक होय. वास्तविक कल्पतरू व आंनदवृत्त ही दोन पत्रे प्रथम स्वतंत्रपणे निघत असत.
इतिहास
साप्ताहिक १८६७ साली निघाले. हे पत्र आण्णाजी गोविंद इनामदार हे काढीत असत. आनंदवृत्त पत्र बलवंत नारायण काकडे चालवीत असत. इनामदार व काकडे दोघेही इंदापूर भागातले असल्याने इनामदारांनी आपला छापखाना व पत्र काकडे यांस दिला व त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कल्पतरू आणि आनंदवृत्त अशा जोड नावाने काकडे १८७४-७५ पासून पत्र चालवू लागले. कल्पतरू साप्ताहिक १८६७ साली निघाले. काकडे घराण्यातील व्य्क्तीनीच हे पत्र पुढे चालू ठेवले. राजकीय व सामाजिक बाबतीत पत्राचा रोख नेमस्त धोरणाचा होता. रानडे गोखले यांच्या प्रागतिक विचारसरणीचा पुरस्कार निस्पृहपणे हे पत्र करीत असे.[१]
१९०८ साली लोकमान्य टिळकांना सहा वर्ष्याची शिक्षा झाली तेव्हा तिचे खापर ना. गोपाळ कृष्ण गोखले यांच्यावर फोडण्यात येत असे. या शिक्षेला गोखले कारणीभूत झाले असे निदान सूचित तरी करण्यात येत असे. या दोषारोपाच्या संदर्भात कल्पतरू आनंदवृत्त पत्रात पुढीलप्रमाणे समाचार घेण्यात आला होता. गोविंद नारायण काकडे हे त्या वेळी संपादक होते व पत्र नेमस्तवादी होते. परंतु कल्पतरूचे एकंदरीत धोरण ऋजुतेचेच असे. सहसा तोल जाऊ न देता या पत्राने मार्ग काढला. यामुळे दीर्घकाळ टिकूनही पत्राचा फार मोठा बोलबाला झाला असे मात्र नाही. ज्या वेळी मुंबई- पुण्यातही वृत्तपत्राचा व्याप बेताचाच होता, व इतर जिल्ह्यांत वृत्तपत्रे तुरळकच उगवू लागली होती, आशा वेळी सोलापूरने वृत्तपत्राच्या क्षेत्रात आघाडी मारली. सोलापूर हे तसे आडवळणी गाव, रेल्वे स्थानक व कापडगिरण्या निघ्याल्यानंतर सोलापूरचा विकास झाला. पण त्याआधी छापखाना काढून वृत्तपत्र चालविण्याचे धाडस काकडे घराण्यांनी केले. शांत नंदादीपाप्रमाणे तेवत राहून कल्पतरू दीर्घकाळ टिकला. पत्राने कोणाला सहसा चटके दिले नाहीत किंव्हा कोणत्या लाटेवर स्वार होऊन लौकिक यशाचा नसता हव्यास त्याने धरला नाही. शांतपणे पण सातत्याने प्रबोधन करण्याची या पत्राची कामगिरी उपेक्षणीय म्हणता येणार नाही.
संदर्भ
- ^ लेले, रा.के. (२००९). मराठी वृत्तपत्राचा इतिहास. पुणे: अनिरुद्ध अनंत कुलकर्णी. pp. २२३.