Jump to content

कऱ्हा नदी

कऱ्हा नदी
इतर नावे कऱ्हामाई, कऱ्हाबाई
उगम चतुर्मुख मंदिर दरेवाडी गराडे ता. पुरंदर
पाणलोट क्षेत्रामधील देशमहाराष्ट्र
उगम स्थान उंची १,०२० मी (३,३५० फूट)
ह्या नदीस मिळतेनीरा नदी
धरणे नाझरे धरण मल्हारसागर (०.७५ TMC)

कऱ्हा नदी महाराष्ट्रातील एक नदी आहे. ही नीरा नदीची उपनदी आहे. ही पुणे जिल्ह्यातून वाहते. पुणे जिल्ह्यातील सासवड हे तालुक्याचे ठिकाण या नदीकाठी वसले आहे. तिच्या काठावर जिल्ह्यातील सासवड, जेजुरी मोरगाव आणि बारामती ही प्रमुख गावे आहेत.

भौगोलिक

कऱ्हा नदीचा उगम पुरंदर तालुक्यातील सासवडच्या पश्चिमेकडे गराडे गावाजवळ चतुर्मुख येथे होतो. नंतर ती कोडित बुद्रुक, कोडित खुर्द, सासवड, खळद, बेलसर, धालेवाडी, नाझरें या गावातून वाहते, व मोरगाव येथून बारामती तालुक्यात नीरेला मिळते. कऱ्हा नदी ही पूर्व वाहिनी नदी आहे. कऱ्हा नदीवर जेजुरी जवळील नाझरे येथे मल्हारसागर नावाचे धरण बांधलेले आहे. कऱ्हा नदी पुणे जिल्ह्याच्या सीमेवर नीरा नदीला सोनगाव येथे मिळते आणि संपते.

पौराणिक व ऐतिहासिक

संत ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू संत सोपानदेव यांनी कऱ्हा नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली होती. अश्या या सासवडला वटेश्वर, संगमेश्वर, सिद्धेश्वर ही तीन पांडवकालीन शिवमंदिरे आहेत. मंदिरे खरंच पाहण्यासारखी आहेत.

बाळाजी विश्वनाथ पेशवे यांची या ठिकाणी समाधी देखील आहे. कोटेश्वर,(कोडित) सिद्धेश्वर, वटेश्वर, संगमेश्वर, कमलेश्वर, लवथळेश्वर (जेजुरी), पांडेश्वर , नागेश्वर (नाझरे कडे पठार) ही कऱ्हेकाठची शिवमंदिरे प्रसिद्ध आहेत.

कऱ्हानदी उगम आख्यायिका :- पांडेश्वर येथे द्रौपदी व कुंतीमातेसह पांडव वास्तव्य करून रहात असत, सदर भागात पाण्याचे दुर्भिक्ष होते. भगवान श्रीकृष्णाने पांडवांना या भागातील पाण्याची टंचाई दूर करण्यासंबंधी विनविले. त्याच वेळी भगवान श्रीकृष्णाने असेही सुचविले की, गराडे येथे ब्रह्मदेव जलपूर्ण कमंडलू घेऊन बसले आहेत. तो कमंडलू कलंडून दिल्यास त्यातून निर्माण होणाऱ्या धारेतून सरिता वाहील. अर्जुन ब्रम्हदेवापाशी गेला, त्याने समाधीमग्न असलेल्या चतुराननास जागृत करण्याचा खूप प्रयत्न केला. ब्रम्हदेव समाधीतून जागे होईनात. नाईलाजाने शेवटी ब्रम्हदेवास सावध करण्यासाठी भीमाने ब्रह्राच्या मस्तकावर शीतल पाण्याचा कमंडलू ओतला. ब्रह्माचा कोप होऊ नये या भीतीने म्हणून तो पूर्वेस पळत सुटला. त्याच्या बरोबरच त्या करातील पाण्याचा प्रवाहही वाहू लागला, थंडपाण्याच्या स्पर्शाने ब्रह्म जागृत झाला व भीमाच्या मागे लागला. श्रीकृष्णाने पूर्वीच सुचविल्याप्रमाणे भीमाने त्या जलप्रवाहाकाठी शिवभक्त ब्रम्हाकरिता पार्थिव शिवलिंगे तयार केली होती. ब्रह्मदेव हा शिवभक्त असल्याने पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्याखेरीज त्यास मार्ग आक्रमिता येईना. त्यामुळे ब्रह्मदेव शिवलिंगस्थळी थांबत व त्या अवधीत अर्जुन पुढे जाई. अर्जुन व जलप्रवाह पुढे पुढे आणि ब्रह्मदेव मागे मागे अशी ही शर्यत पांडेश्वरी समाप्त झाली, पांडेश्वरी श्री कृष्णासह वर्तमान पांडव यज्ञकर्म आचरीत होते. त्यामध्ये ब्रह्मदेवही सामील झाले, त्यांच्या कमंडलूचे नाव होते कर करामधून जन्मलेली ती कर-जा म्हणजे कऱ्हा. अर्जुनाने ज्या ज्या ठिकाणी पार्थिव शिवलिंगे तयार केली त्या त्या ठिकाणी आजही भव्य शिवालये उभी आहेत. कोटेश्वर, सिद्धेश्वर, वटेश्वर, संगमेश्वर, कमलेश्वर, लवथळेश्वर, पांडेश्वर ही कऱ्हाकाठची शिवालये याच कथेची साक्ष देत आहेत. पांडवांचा यज्ञ संपला परंतु ब्रह्मदेवाच्या कमंडलूमधून सुरू झालेली कऱ्हा शतके लोटली, युगे लोटली तरी अजूनही वाहतेच आहे. आणि तीरावरील जीवनमळे फुलवीत आहे. तसेच अर्जुन इतर पांडवाना जवळ आलेला दिसला ते गाव म्हणजे जवळार्जून गाव.

प्रसिद्ध व्यक्ती

कोडीत खुर्द हे आचार्य अत्र्यांचे मूळ गाव तर लेखक-नाटककार-कवी-वक्ते असलेल्या अत्र्यांच्या आत्मचरित्राचे नाव कऱ्हेचे पाणी असे आहे.

इतिहास

कऱ्हा नदीच्या काठी, मराठी समाजवादी लेखक आणि चित्रपट निर्माते प्र. के. अत्रे (प्रल्हाद केशव अत्रे) यांचा जन्म झाला.[] संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील ते एक नेते होते. त्यांच्या या चळवळीवरील पुस्तकांची मालिका, कऱ्हेचे पाणी हा मराठीतील साहित्याचा एक प्रसिद्ध भाग आहे.


संत तुकाविप्र आणि कऱ्हा नदी परिक्रमा

शके १६९२ला संत नामदेव यांनी केलेल्या शतकोटी अभंग रचनेच्या संकल्पांची संत तुकाविप्र यांच्याकडून  पूर्तता झाल्यानंतर, संत तुकाविप्र यांनी शके १६९३ पासून कऱ्हा नदीची प्रदक्षिणा केली. या काळातील राजकीय घटना म्हणजे थोरले माधवराव पेशवे यांचा मृत्यू , नारायण रावांचा खून, धाकटे माधव राव पेशवे यांना पेशवेपद बहाल झाले या परिस्थितीत लोकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून त्यांनी कीर्तनांच्या माध्यमातून जनजागृती केली. यामधून  त्यांनी सामाजिक एकतेचा संदेश दिला.[]

संदर्भ

  1. ^ "Pralhad Keshav Atre". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-12-15.
  2. ^ संत तुकाविप्र रचित तत्वमसि. 2020. pp. संत तुकाविप्र यांच्या काळातील तत्वमसिची गरज.