Jump to content

कर्नाटक संगीत

(संस्कृत:कर्णाटक सङ्गीत) भारतीय अभिजात संगीताचा एक प्रकार

भारताच्या दक्षिण भागात अर्थात कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ या राज्यात प्रचलित असलेले अभिजात शास्त्रीय संगीत कर्नाटक संगीत म्हणून ओळखले जाते. कर्नाटक प्रांताच्या नावावरून भारतीय शास्त्रीय संगीताचा हा प्रकार ओळखला जातो. कर्णास(कानास) गोड वाटणारे म्हणून कर्नाटक संगीत अशीही एक व्युत्पत्ती सांगितली जाते. (कर्णे अटति इति कर्णाटकम्)

पायाभूत संकल्पना

खालील चार संकल्पना कर्नाटक संगीताच्या पाया आहेत.

पारंपरिक समजुतीनुसार श्रुतीस माता तर लयीस पिता मानले जाते. हिंदुस्तानी पद्धतीप्रमाणेच कर्नाटकी पद्धतीतही गायकास स्वतःचा आधार स्वर (सा) पकडण्याचे स्वातंत्र्य असते. कर्नाटकी संगीतात १६ स्वर मानले जातात.

षड्ज - सा

शुद्ध ऋषभ - रि१ चतुःश्रुति ऋषभ - रि२ षट्श्रुति ऋषभ - रि३

शुद्ध गांधार - ग१ साधारण गांधार - ग२ आंतर गांधार - ग३

शुद्ध मध्यम - म१ प्रति मध्यम - म२

पंचम - प

शुद्ध धैवत - ध१ चतुःश्रुति धैवत - ध२ षट्श्रुति धैवत - ध३

शुद्ध निषाद - नि१ कैशिकी निषाद - नि२ काकळी निषाद - नि३

टीप - षट्श्रुति ऋषभ, साधारण गांधार, तसेच चतुःश्रुति धैवत व शुद्ध निषाद हे समनाद स्वर आहेत. रागाच्या आरोहणात व अवरोहणात स्वराचे शक्यतो एकच रूप वापरले जाते. याला काही अपवाद आहेत. (उदा. राग बेहाग)

  • राग

वरील १६ स्वरांची नियमबद्ध व कर्णमधुर बांधणी म्हणजे राग म्हणता येईल. प्रत्येक रागाचे खालील हिस्से असतात.

- खालच्या स्वरापासून वरवर जाणे - आरोहण,

- वरच्या स्वरापासून खाली येणे - अवरोहण

- मुख्य स्वर ( सा - रि - ग - म - प -नी - ध ) (उत्तर हिन्दुस्तानी पद्धतीपेक्षा येथे स्वर-नाम व क्रम किंचित वेगळा आहे.)

- अमुख्य स्वर

- राग-अलंकार (जसे - गमक)

  • साहित्य (पद्यरचना)

कर्नाटक संगीताची जडणघडण दाक्षिणात्य मंदिरांमध्ये झाली असल्याने हे संगीत भक्तिरसप्रधान आहे. निरनिराळ्या कवींनी तामिळ, तेलुगू, कानडी, संस्कृत आदी भाषांमधून केलेल्या विविध भक्तिप्रधान रचना कर्नाटक संगीताचा गाभा आहे. उदा - पुरंदरदासांनी विठ्ठलस्तुतीपर केलेल्या कीर्तन-गीतांची संख्या हजारात आहे. कर्नाटक संगीताच्या गायकास अनेक रचना पाठ असणे गरजेचे मानले जाते.

मेळकर्ता पद्धती

रागांच्या वर्गवारीसाठी कर्नाटक संगीतात मेळकर्ता पद्धत वापरली जाते. व्यंकटमुखी या संगीतकाराने ही पद्धत सतराव्या शतकात प्रचारात आणली. यानुसार सर्व रागांची विभागणी ७२ मेळकर्त्यांत होते. पहिल्या ३६ मेल रचनांमध्ये 'म' स्वर शुद्ध असतो व नंतरच्या ३६ मेल रचनांमध्ये तो प्रति-मध्यम असतो. वरील सर्व ७२ राग १२ चक्रांमध्येही विभागता येतात.