Jump to content

कर्णभूषणे

कर्णभूषणे हे एक कानांत घालावयाचे अलंकार आहे. सुमेरियन संस्कृतीचे केंद्र असलेल्या अर येथील उत्खननात सापडलेली कर्णभूषणे सर्वांत जुनी मानतात (इ.स.पू.सु. २५००). कर्णाभरणांसाठी कान टोचण्याची प्रथा हिंदुधर्मीयांत दिसते. इतर पुष्कळशा समाजांत कर्णभूषणे चापाने किंवा अन्य साधनाने कानात अडकवितात.

भारताबाहेरील कर्णभूषणे पद्धती

प्राचीन ईजिप्तमध्ये इ. स. पू. १५०० नंतर कर्णभूषणे प्रथम प्रचारात आली असावीत. ती सोन्याच्या कोंदणात रत्ने, पाचू इ. बसवून तयार केलेली असत. इ.स.पू. पहिल्या सहस्रकातील ग्रीसमधील कर्णभूषणे आढळली असून ती लोंबणारी व तीन कळ्यांच्या आकाराची कुडीवजा आहेत. याच काळातील काही कर्णभूषणांना पक्ष्याच्या आकाराचे लोंबते लोलक बसविलेले आढळले. यानंतरच्या रोमन काळात (इ.स.पू.सु. १०० ते इ.स. ४५०) मुख्यत: स्त्रियाच कर्णभूषणे वापरीत. त्यांच्या कर्णभूषणांत पाचू, इंद्रनीलमणी इ. रत्ने बसविलेली असत. चौथ्या शतकातील कर्णभूषणे अत्यंत कौशल्यपूर्ण बनावटीची व सुंदर होती. पुढे पुरुषवर्गात कर्णभूषणे वापरण्याची प्रथा फार बोकाळली म्हणून तिसऱ्या शतकातील अलेक्झांडर सर्व्हेलस या सरदाराने त्यांवर बंदी घातली. बायझंटिन काळातही कर्णभूषणे वापरण्याची प्रथा कमी होत गेली. मध्ययुगात स्त्रियांच्या डोक्यावर झिरमिरीत पडदा वा घुंगट वापरात येऊ लागल्यामुळे कर्णभूषणे हळूहळू लुप्त झाली.

यूरोपीय प्रबोधनकाळात अनेक गोष्टींचे पुनरुज्जीवन झाले, तसे अलंकारांचेही झाले व पुन्हा कर्णभूषणे प्रचारात येऊ लागली. सोळाव्या शतकात इंग्लंडमध्ये एलिझाबेथ राणीच्या कारकिर्दीत स्त्रियांप्रमाणे पुरुषही कर्णभूषणे वापरीत. पुढे हे अलंकार फक्त स्त्रियांचे आहेत, असे मानण्यात आले.

पंधराव्या शतकानंतर अमेरिका व आफ्रिका यांच्या शोधामुळे तेथील लोकांच्या अलंकारांची माहिती मिळाली. त्यात दक्षिण अमेरिकेतील चिली देशात चांदीची ४ ते ५ इंच (सु. १० ते १२⋅५ सेंमी.) लांबीची कर्णभूषणे आढळली. त्यात मणी, पाने, फुले कोरलेली होती. आफ्रिकेतील रानटी जमातींतही त्यांच्या सौंदर्यकल्पनेप्रमाणे मोठ्या आकाराचे कर्णालंकार आढळतात. मसाई जमातीत ४ इंच (१० सेंमी.) व्यासाची, वजनदार दगडी खुंटी कानात घालतात. बोर्निओमधील जमातीत ३ ते ४ इंच (सु. ७⋅५ ते १० सेंमी.) व्यासाची लाकडी वा दगडी खुंटी (चोंदा) कानाच्या पाळीत बसवितात त्यामुळे कानाच्या पाळ्या खाली लोंबत राहतात.