कर्णफळ
मराठी नाव
कर्णफळ
इंग्रजी नाव
एलिफन्ट इयर पॅाट
या वृक्षाला 'एलिफन्ट इयर पॅाट' असेही म्हणतात. यांचा विस्तार एवढा की ते १००-१२० फूट उंच वाढून रस्ताच्या दुसऱ्या बाजूला पोहोचून फांद्या जमिनीला लागलेल्या. जरी याची पाने उन्हाळ्यात पूर्ण गळून जातात तरी उर्वरित दिवसांत या वृक्षाच्या भव्य छत्रीसारख्या पसरलेल्या फांद्या भरपूर सावली देतात. पाने आणि शेंगा जनावरांचे खाद्य म्हणून मोठ्या प्रमाणात वापरले जातात. शेंगा सुरुवातीला हिरव्या असून पक्व झाल्यावर कॉफीच्या रंगाच्या होतात. दोन महिन्यानंतर शेंगा झाडावरून गळून पडतात.
शेंगामधे असलेला घट्ट द्रव गोड असतो. 'पोर्टोरिको' येथील नोंदीनुसार झाडाला प्रथम फळ यायला कमीत कमी २५ वर्षे लागतात. कदाचित त्याचमुळे मलबार हिलवरील वृक्षाची ओळख पटायला एवढे दिवस लागले असावेत. लाकूड अत्यंत उपयोगी असून त्याला वाळवी लागत नाही. या लाकडाचा वापर घरातील वासे, बोटींमधील मोठे वासे यांसाठी करण्यात येतो. कच्च्या शेंगांचा रोजच्या आहारात वापर होतो. बिया भाजून व भूकटी करून खातात. हा वृक्ष जमिनीतील नत्रयुक्त क्षारांचे प्रमाण वाढवतो म्हणून कदाचित त्याची शेताच्या बाजूला लागवड केली जाते. या झाडाची लागवड बीपासून होते. एक पूर्ण वाढलेले झाड वर्षाकाठी सुमारे २००० बियांचे उत्पादन देते. याचे फळ गारंबीसारखे कठीण व विभाजन न होणारे असल्यामुळे त्याला हाताने फोडावे लागते. अन्यथा फळाची कुजण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन बी बाहेर पडते. भारतातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये असलेल्या उद्यानांमध्ये हा वृक्ष मोठ्या प्रमाणात लावला आहे.
संदर्भ
वृक्षराजी मुंबईची डॉ. मुग्धा कर्णिक