कमार जमात
कमार ही भारताच्या मध्य प्रदेशाच्या मुख्यत्वे रायपूर जिल्हा व त्याच्या आसपासचा प्रदेश यांत आढळणारी एक जमात आहे. १९६१ च्या जनगणनेनुसार त्यांची लोकसंख्या ११,७८१ होती. कमार मध्यम बांध्याचे, रंगाने काळे, कुरळ्या व राठ केसांचे आहेत. पूर्वी हे लोक कपडे वापरीत नव्हते, मात्र अलीकडे पुरुष लंगोटी घालतात किंवा पंचा लंगोटीसारखा बांधतात आणि बायका गुडघ्यापर्यंत लुगडे नेसतात, पण चोळी वापरत नाहीत. मुख्यत्वे डोंगरमाथ्यावर किंवा जंगलात यांची वस्ती आढळते.
उदरनिर्वाह
शेती, शिकार, मासेमारी, टोपल्या विणणे किंवा मजुरी हे ह्यांचे धंदे असून शेती बहुधा स्थलांतरित पद्धतीची करतात. त्यास दोही व बेवरा म्हणतात. जंगलाच्या एका विशिष्ट भागातील झाडे कापून ती जाळतात व तेथे दोन-तीन वर्षे शेती करतात. नंतर दुसरी जागा शोधतात. बहुधा तांदूळ व मका ही पिके काढतात. चिंचेच्या व पिंपळाच्या कोवळ्या पानांची भाजी हे लोक खातात. मोहाची दारू यांना प्रिय असते.
पोटविभाग
कमार जातीचे सात बहिर्विवाही कुळींत विभाजन झालेले आढळते. जगत, नेतम, मरकाम, सोरी, कुंजम, मरई, चेदैहा ही त्या कुळींची गणचिन्हे आहेत. कासवाने काही कमारांना महापुरातून वाचविले, म्हणून त्यांचे गणचिन्ह कासव (नेतम) आहे. कासवास ते मारीत नाहीत. बुधादेवाच्या बोकडापासून एका कमार स्त्रीस संतती झाली, त्यावरून एका कुळीचे गणचिन्ह कुंजम झाले.
परंपरा व श्रद्धा
पितरात्म्यास पुनर्जन्माची इच्छा होईपर्यंत संतती होत नाही, असा त्यांचा समज आहे. मासिक पाळीच्या वेळी तीन ते पाच दिवस स्त्री कुटुंबापासून अलिप्त राहते. आते-मामे भावंडाच्या विवाहास अधिक्रम देण्यात येतो. विवाह वयात आल्यानंतरच करतात. देज द्यावे लागते, पण ते नाममात्रच असते. गांधर्वविवाह किंवा सेवाविवाह सर्वमान्य आहे. सेवाविवाहात मुलाने मुलीच्या घरी काम करून वधूमूल्याची फेड करावयाची असते. कधीकधी मुलगी जबरदस्तीने मुलाच्या घरी येऊन राहते व त्यास विवाह करावयास भाग पाडते; यास पैथुविवाह म्हणतात. बहुपत्नीत्वाची प्रथा रूढ आहे, तसेच घटस्फोटही त्यांना मान्य आहे.
जादूटोणा, जीवात्मे किंवा दैवीशक्ती रागावल्याने मृत्यू येतो, असा त्यांचा समज आहे. बहुधा मयताचे दफन करतात, पण अलीकडे वृद्ध माणसे व उपाध्याय वारल्यास त्यांचे दहन करतात. नैसर्गिक मृत्यू आल्यास जीव भगवानाकडे जातात, अपघाती मृत्यू आल्यास त्यांचे भूतात्मे बनतात, गर्भारशी स्त्री वारल्यास तिची‘चुंडेलन’ होते व ती स्त्रियांना आणि मुलांना त्रात देते, असा कमारांत समज आहे.
कमार महादेवाला विश्वकर्ता मानतात. देवीच्या पूजेसही कमारांत महत्त्व आहे. धरतीमातेची जागा स्वयंपाकघरात असते. हरेली व पोरा असे त्यांचे दोन प्रसिद्ध सण आहेत. त्यांच्या सणांत दसरा, दिवाळी आणि होळी यांनाही महत्त्व आहे; पण इतर हिंदुजातींप्रमाणे हे सण ते मोठ्या समारंभपूर्वक साजरे करत नाहीत. दसऱ्यास बोकडाचा किंवा कोंबडीचा बळी देवास देतात. दिवाळीत गुराढोरांना खिचडी देतात. हिंदूंच्या सान्निध्याने कमारांत हळूहळू बदल होत आहे.
संदर्भ
- Dube, S. C. The Kamar, Lucknow, 1951.
- मराठी विश्वकोश
- http://mr.vikaspedia.in/