Jump to content

कमलाकर नाडकर्णी

कमलाकर नाडकर्णी
जन्म १० जानेवारी,१९३५
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
पेशा नाट्यसमीक्षक
पुरस्कारमाधव मनोहर पुरस्कार

कमलाकर नाडकर्णी (१० जानेवारी,१९३५ - हयात) हे एक ज्येष्ठ मराठी नाट्यसमीक्षक आहेत.

बालपण

नाडकर्णी हे सुधा करमरकर यांच्या 'लिटल थिएटर' या संस्थेच्या बजरबट्टू, गणपतीबाप्पा मोरया, चिनी बदाम वगैरे बालनाट्यांत कामे करायचे; 'बहुरूपी' या प्रायोगिक नाट्यसंस्थेच्या 'जुलूस' या नाटकातही त्यांनी काम केले होते.

कारकीर्द

बहुरूपी' या संस्थेसाठी राज्य नाट्यस्पर्धेकरिता कमलाकर नाडकर्णींनी यांनी इंग्रजी नाटकांचा अनुवाद केला होता. त्यावेळी त्यांनी नाट्यचर्चा आणि तत्सम परिसंवादांत भाग घेतला. त्यांनी गावोगावच्या शिबिरांमध्ये नाट्यप्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. नाटकांवरची व्याख्याने देत असताना नाडकर्णींनी एकांकिका-नाट्यस्पर्धांसाठी परीक्षक म्हणून काम केले. 'नांदी' नावाच्या देविदास तेलंग यांच्या पाक्षिकात त्यांनी नाट्यपरीक्षणे लिहायला सुरुवात केली. एका परीक्षणात नाडकर्णींनी नाटककार विद्याधर गोखले यांच्या 'मेघमल्हार' नाटकावर त्यांनी 'मेघमल्हार की जयमल्हार?' या शीर्षकाने परीक्षण करून गोखलेंच्या लेखनावरच टीका केली. पुढे विद्याधर गोखले संपादक असलेल्या दैनिक 'लोकसत्ते' मध्येच नाडकर्णी गेले. त्यांची नाट्यसमीक्षा 'लोकप्रभा' साप्ताहिकातही चालू होती. परखड परीक्षक अशी त्यांची ओळख तेथे बनली. त्यांनी आवडलेली नाटकेही डोक्यावर उचलून घेतली. सुमार नाटकांची ते फारच वाईट शब्दात निंदा करीत. नाडकर्णींची नाटकाबद्दलची मते इतकी आग्रही असत की ते त्यावर परिसंवादात बोलतानाही त्यांचा आवाज तसाच असे. पण याच गुणांमुळे त्यांनी आपले असंख्य चाहते निर्माण केले आणि त्यांना अगणित शत्रूही मिळाले.

नाडकर्णी पुढे 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये गेले आणि तेथूनच निवृत्त झाले. त्यांचा अमृत महोत्सवी सोहळा 'यशवंत संस्कार केंद्रा'तर्फे मुंबईच्या शिवाजी मंदिर येथे डॉ. अरुण टिकेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला

नाडकर्णींच्या समीक्षणांचा संग्रह

'महाराष्ट्र टाइम्स'मधल्या कालखंडानंतर कमलाकर नाडकर्णी यांनी 'महानगर' या सायंदैनिकात सन २००० ते २०१० या काळात ४०० नाट्यपरीक्षणे लिहिली. त्यांपैकी निवडक ५८ नाटकांची परीक्षणे ’महानगरी नाटकं’ या संग्रहात समाविष्ट करण्यात आली आहेत. संग्रहातील 'यदाकदाचित' पासून सुरू होणारी यादी 'पोपटपंची' नाटकापर्यंत येऊन थांबली आहे. यांत व्यावसायिक, प्रायोगिक, समांतर धारेतली नाटके आहेत तसेच 'योजनगंधा', रघुवीर खेडकरांचा तमाशा, चंदाबाई तिवाडींचे भारूड असे लोकधारेतले प्रयोगही आहेत; प्रदीप दळवींचे '२३ जून', 'सर आले धावून' आणि अशोक पाटोळे यांचे 'जाऊबाई जोरात' या नाटकांवरची परीक्षणेही संग्रहात आहेत.

कमलाकर नाडकर्णींनी लिहिलेली पुस्तके

  • नाटकं ठेवणीतली
  • नाटकी नाटकं
  • महानगरी नाटकं

कमलाकर नाडकर्णी यांना मिळालेले पुरस्कार