Jump to content

कमल देसाई (समाजवादी नेत्या)

कमल देसाई (जन्म : इ,स. १९२१; - मुंबई, २० फेब्रुवारी २०१८]) या मुंबईतील महागाई प्रतिकार महिला आंदोलनाच्या आघाडीच्या नेत्या, आणि मुंबई-गोरेगावातील समाजवादी चळवळीच्या कार्यकर्त्या व समाजसेविका होत्या. त्या गोरेगावच्या माजी आमदार होत्या. अहिल्याबाई रांगणेकर, कमल देसाई आणि मृणाल गोरे या महाराष्ट्रातील, विशेषतः मुंबईतील समाजकारणात आणि राजकारणामध्ये काम करणाऱ्या आघाडीच्या स्त्रिया होत्या.[ संदर्भ हवा ]

कमल देसाई यांची कट्टर लोहियावादी अशी ओळख झाली होती. लोकांमध्ये मिसळून केलेल्या कार्यामुळेच १९७३ साली त्यांना नगरसेवक होण्याची संधी मिळाली. आधीचा संपर्क आणि पदाच्या माध्यमातून केलेले काम यामुळे त्यांचा लोकसंपर्क वाढत गेला. पुढे १९७८ मध्ये त्या जनता पक्षाकडून विधानसभेवर निवडून आल्या. फेरीवाले, महिला या घटकांबरोबरच नागरी समस्यांच्या निवारणासाठी त्यांनी आक्रमकपणे काम केले. महागाईविरोधी प्रतिकार समितीच्या दुसऱ्या फळीतील त्या प्रमुख नेत्या होत्या. मृणाल गोरे यांच्या साथीने त्यांनी महागाईविरोधी प्रतिकार महिला आंदोलनाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडले. मृणालताईंबरोबरच कमलताईंनाही पाणीवाली बाई, हंडावाली बाई म्हणून ओळखले जात होते. जॉर्ज फर्नांडिस यांचा रेल्वेचा संप यशस्वी करण्यामध्ये त्यांचा सहभाग महत्त्वाचा होता. स्वाधार संस्था, नागरी निवारा परिषद यामध्येही त्या सक्रिय होत्या. कोणत्याही सामाजिक कार्यात मनापासून सहभाग देण्याबरोबरच उत्साही आणि मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी अनेक जिवाभावाची माणसे जोडली होती. कमल देसाई यांचा महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका महत्त्वाच्या घटनेशी-अंतुले यांच्या राजीनाम्याशी- निकटचा संबंध होता. मृणाल गोरे यांनी कमल देसाई आणि देसाईंचे मेव्हणे, संयुक्त समाजवादी पक्षाचे नेते सामंत, यांच्यासह तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचप्रकरणी पुढे अंतुले यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

कमल देसाई यांना छबूताई असे टोपणनाव होते. त्या इंदिरा गांधींनी देशावर लादलेल्या आणीबाणीच्या काळात त्या तुरुंगात होत्या. गोरगरिबांच्या हक्कांसाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. मृणाल गोरे यांच्याबरोबर अनेक आंदोलनांत त्यांनी भाग घेतला होता. गोरे आणि देसाई या अनुक्रमे 'लाटणेवाल्या आणि हंडावाल्या बाई' म्हणून ओळखल्या जात.