कपुरथला
कपुरथला (मराठी लेखन - कपूरथाळा) हे भारताच्या पंजाब राज्यातील एक शहर आहे.
हे शहर कपूरथाळा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
कपूरतळा येथे रेल्वेचे डबे तयार करण्याचा कारखाना आहे
कपूरथाळा संस्थान
भारतातील सध्याच्या पंजाब राज्याच्या उत्तरेकडील कपूरथाळा हे ‘शीख राज्यसंघा’तील महत्त्वाचे संस्थान होते. लाहोरजवळच्या अहलु येथील जस्सासिंगचे वडील त्याच्या वयाच्या पाचव्या वर्षी निधन पावल्यामुळे शिखांचे दहावे गुरू गोविंदसिंग यांची विधवा पत्नी मातासुंदरीने जस्साचे पालनपोषण केले. पुढे नवाब कपूरसिंग याने त्याचे पालकत्व स्वीकारले. पुढे सैन्याचा एक गटप्रमुख झालेल्या जस्साने खालसा संघाला लाहोर मिळवून देण्याची मोठी कामगिरी केल्यामुळे खालसा संघाने त्याला सुलतान-उल-अवाम हा किताब दिला.
१७५३ साली कपूरसिंगाने जस्साला जरी आपले वारस नेमले होते तरी जस्साने १७७२ साली कपूरसिंगाच्या नावाने कपूरथाळा हे राज्य स्थापन केले. जस्सासिंग हा अहलुवालिया किंवा वालिया हे आडनाव लावणारी पहिली व्यक्ती होती. जस्साचे पुढील वारस महाराजा रणजीतसिंगच्या उदयापर्यंत प्रबळ होते. कपूरथाळा राजघराण्यातले लोक व बहुसंख्य नागरिकदेखील त्यांच्यातल्या लष्करी कौशल्यामुळे प्रसिद्ध होते.
जस्सासिंगनंतर त्याच्या वारसांपकी बाघसिंग, फतेहसिंग, निहालसिंग, रणधीरसिंग, जगतजीतसिंग या शासकांनी कपूरथाळा संस्थानाला उत्तम प्रशासन देऊन एक वैभवसंपन्न राज्य म्हणून प्रसिद्धीस आणले. राजा फतेहसिंग याने १८०६ साली ईस्ट इंडिया कंपनीशी संरक्षण करार करून त्यांची तनाती फौज राखणे सुरू केले. १५५० किमी२ राज्य क्षेत्र असलेल्या कपूरथाळा संस्थानात १६७ खेडी आणि दोन शहरे अंतर्भूत होती. १९०१ च्या जनगणनेनुसार संस्थानाची लोकसंख्या ३,१५,००० होती, तर महसुली उत्पन्न वीस लाख रुपयांचे होते. ब्रिटिशांशी चांगले संबंध व उत्तम प्रशासन यामुळे संस्थानाला १३, तर शासकाला व्यक्तिशः १५ तोफांच्या सलामींचा बहुमान मिळाला होता. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण, सनिकी शिक्षण, संगीताच्या शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या कपूरथाळा शासकांनी औद्योगिक विकासातही लक्ष घातले. परंतु काही महाराजांचे बडेजाव, रंगेल-विलासी खासगी जीवन, यांबाबतही कपूरथाळा प्रसिद्ध आहे.