कदमबांडे घराणे
कदमबांडे घराणे हे एक मराठा घराणे आहे. १८व्या शतकाच्या सुरुवातीला नेमाजी शिंदे, दाभाडे, गायकवाड व थोरात यांच्या सोबतीने गुजरात प्रांतात मराठा साम्राज्याच्या विस्तारात या घराण्याचा मोलाचा वाटा आहे.[१] अळकुटीकर कदमबांडे आणि तोरखेडकर कदमबांडे या कदमबांडे घराण्याच्या दोन प्रमुख शाखा आहेत.
इतिहास
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात अळकुटी गावी सरदार कदमबांडे पाटील यांचा ऐतिहासिक भुईकोट गढीचा वाडा उभा आहे. सरदार कृष्णाजी कदमबांडे व व्यंकोजी कदमबांडे हे शहाजीराजांच्या कारकिर्दीत निजामशाहीतील मातब्बर सरदार होते. ते दोघे निजामशाहीचा अस्त झाल्यावर मोगल सत्तेकडून अळकुटी गावी जहागीरदार म्हणून कारभार पाहू लागले. त्यांनी साधारणतः अठराव्या शतकात अळकुटी या गावी चार एकरांवर देखणा आणि मजबूत गढीचा वाडा बांधला.
त्या भुईकोटाचे प्रवेशद्वार भव्य असून ते पूर्वाभिमुख आहे. दरवाजाच्या कमानीवर कमळपुष्पे कोरलेली आहेत. दरवाजावर विटांनी केलेल्या बांधकामाची सुंदर दुमजली इमारत आहे. प्रवेशद्वाराला जोडून असलेली तटबंदीची भिंत तत्कालीन स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. तिचा खालचा भाग मजबूत घडीव दगडांचा असून वरचा भाग उत्तम रेखीव विटांनी युक्त आहे. तटबंदी तीन मीटर रुंदीची असून त्यास चुन्याचा स्लॅब आहे. तटबंदीतील चारही बुरुज घडीव दगड व रेखीव वीटकामामुळे आजही नवीन बांधकामासारखे नजरेत भरतात. तटबंदी त्यावरून एखादे वाहन सहज जाऊ शकेल इतकी मजबूत आहे. तटबंदीत अनेक जंग्या (तटबंदीला असलेली छिद्रे. त्यातून बंदुकीने शत्रूंवर मारा करण्यात येत असे.) आजही सुस्थितीत असलेल्या पाहण्यास मिळतात.
वाड्याच्या भव्य दरवाजातून प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूंस दोन प्रशस्त अशा ढेलजा आहेत. मुख्य दरवाजा मात्र आज दिसत नाही. प्रवेशद्वाराचे बांधकाम लाल रंगाच्या दगडांनी केल्यामुळे ते आकर्षक दिसते. प्रवेशद्वारावरील दोन्ही मजल्यांच्या खिडक्यांना मोगली पद्धतीच्या जाळ्या आहेत. प्रवेशद्वाराच्या भिंतीवर रूंडभिरूंड हे शिल्प असून; दुसरे, एक वाघ व त्याच्या पायात हत्ती असे चित्र कोरले आहे. आत प्रवेश केल्यावर चौसोपी वाड्याच्या भक्कम जोती दिसतात. समोरच्या जोत्यावर एक सोपा आजही तग धरून उभा आहे. त्याच्या तुळयांच्या बाहेरील भागावरील कलाकुसरीचे काम नजरेत भरते. कदमबांडे यांच्या वंशजांचे एक कुटुंब वाड्यात राहते. त्यांच्याकडून वाड्यातील नक्षीकाम असलेले खांब, सिंहासन, मोठमोठी दालने, भुयार अशा वाड्याच्या भुतकाळातील भव्यतेचे वर्णन ऐकण्यास मिळतात. मात्र वाड्याचे ते वैभव कालपरत्वे नष्ट झाले आहे. वाड्यात ३० x २० आकाराचे तळघर आहे. वाड्यास पाणीपुरवठ्यासाठी त्या काळी बांधलेली विहीर आजही उत्तम स्थितीत आहे.
जुन्या काळी नाणेघाट-जुन्नर-पैठण असा वाहतुकीचा मार्ग होता. अळकुटी हे त्या मार्गावरील गाव होते. त्या भागावर सातवाहन राजे राज्य करत होते. पैठण ही सातवहानांची राजधानी व जुन्नर ही उपराजधानी होती. इसवी सनाच्या दुस-या आणि तिस-या शतकात त्या भागात मोठा व्यापार चाले. अंबरिष ऋषींची तपोभूमी म्हणून त्या गावास पूर्वी ‘अमरापूर’ असे नाव होते. संत ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे आळंदीस जाताना अमरापूर येथे थांबल्याचा उल्लेख आढळतो. शहाजीराजांच्या व छत्रपती शिवाजीराजांच्या कारकिर्दीत कदमबांडे हे मातब्बर सरदार होते. इंग्रजांनी त्या घराण्याचा उल्लेख स्वतःस राजे समजणारे, स्वतंत्र सिंहासन, स्वतंत्र ध्वज, घोडदळ, पायदळ बाळगणारे असा केला आहे. छत्रपती शाहुमहाराज औरंगजेबाच्या कैदेतून सुटल्यावर अमृतराव कदमबांडे यांना येऊन मिळाले. त्यानंतर अमृतराव व कांताजी यांनी गुजरात स्वारीतून प्रचंड धन प्राप्त केले. कांताजींच्या घोडदळात मल्हारराव होळकर होते. ते पुढे मोठे सरदार झाले. बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीत कांताजीरावांनी गुजरात मोहिमेत पराक्रम गाजवला. त्यावेळी त्यांना धुळे, रनाळा, कोपर्ली, तोरखेळ हा भाग जहागिरी म्हणून मिळाला. शाहुराजांनी कांताजीपुत्र मल्हारराव यांच्यासोबत त्यांची कन्या गजराबाई हिचे लग्न लावून दिले आणि भोसले-कदमबांडे यांची सोयरीक झाली. त्यांनी अळकुटी येथील वाड्याच्या तळघरात त्र्यंबकेश्वराहून आणलेल्या शिवलिंगाची स्थापना केली. मल्हारराव तोरखेड येथे स्थायिक झाले.
रघोजीरावांचा दुसरा पुत्र कमळाजी हा मात्र अळकुटी येथे राहिला. त्याने खर्ड्याच्या लढाईत पराक्रम केला. त्याने इसवी सन १७५०
अळकुटीकर कदमबांडे
तोरखेडकर कदमबांडे
राघोजी कदमबांडे याचा थोरला पुत्र मल्हारराव कदमबांडे हा तोरखेडकर कदमबांडे शाखेचा मूळ पुरुष.
संदर्भ
- ^ Gordon, Stewart (2007). The Marathas 1600-1818. Cambridge University Press. p. 117. ISBN 0521033160.