कडवंची पाणलोट क्षेत्र विकास
‘कडवंची पाणलोट क्षेत्र विकासाच्या उपक्रमामध्ये सुरुवातीपासूनच ‘माथा ते पायथा’ उपचार प्रणाली राबवली गेली. या पद्धतीमध्ये डोंगरमाथ्यावरून पाणलोटाच्या पायथ्याकडे कामे केली गेली. या प्रकल्पांमध्ये ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या प्रचलित तत्त्वावर भर न देता, ‘माती अडवा-पाणी जिरवा’ या पद्धतीने कामे झाली आहेत.
‘इंडो-जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमा‘अंतर्गत १९९४-२००० सालांदरम्यान ‘मराठवाडा शेती साहाय्य मंडळा’च्या ‘कृषी विज्ञान केंद्रा‘द्वारे जालना जिल्ह्यतील कडवंची (ता.जालना) येथे पाणलोट क्षेत्र विकासाचा प्रकल्प हाती घेतला गेला. कडवंची पाणलोट क्षेत्र हे पाणलोट विकासातील एक मॉडेल ठरले आहे. पाणलोट क्षेत्रात २५० हेक्टर क्षेत्रावर ४ फूट रुंद व १ फूट खोल चर घेण्यात आले. सलग समतल चरांसोबत ४ फूट रुंद व दोन ते अडीच फूट खोल समतल जलशोषक चर (खंदक)सुद्धा घेतले. चरांवर रोपांएेवजी बियांची लागवड करून वनीकरण करण्यात आले.
खाजगी वाहितीखालील क्षेत्रांवर जमिनीच्या मशागतीमुळे मातीची उलथापालथ मोठ्या प्रमाणावर होत असते व त्यामुळे जमिनीची धूप जास्त होते. सरासरी ३०० मीटर प्रतिहेक्टर शेत बांधबंदिस्ती करण्यात आली. जास्तीचे पाणी सुरक्षितपणे वाहून जाण्यासाठी प्रत्येक बांधाला पाइपांचे व दगडांचे सांडवे केले. बांध पक्का ठेवण्यासाठी आणि मृद्संधारणासाठीसुद्धा त्यांचा खूप चांगला उपयोग होतो. अशा प्रकारची शेत बांधबंदिस्ती संपूर्ण १ हजार ५५० हेक्टर क्षेत्रावर करण्यात आली. त्याचबरोबर लहान दगडी बांध बांधण्यापासून ते मोठे सिमेंट बांध बंधण्यापर्यंतची अनेक जलसंधनाची कामेही परिस्थितीअनुरूप करण्यात आली. जलसंधारणाच्या या विविध कामांमुळे अपधावेचा वेग कमी होऊन जवळपास १९ कि. मी. लांबीच्या नाल्यांमुळे जागोजागी पाणीसाठा निर्माण झाला. साठवलेले पाणी भूगर्भात मुरण्यासाठी अधिक जागा व वेळ मिळाल्यामुळे परिसरातील विहिरींची पाणी पातळी २ ते ६ मीटर्सनी वाढली. पाणलोट विकासाचा हा पहिला दृश्य परिणाम.
ऊस, केळी, मोसंबी अशा प्रकारच्या पिंकांमध्ये शेतकऱ्यांचे शेतीचे दिवस वाढतात. कृषी विज्ञान केंद्राद्वारे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन ऊस, केळी, मोसंबी यांसारख्या प्रचलित पिकांएवजी द्राक्ष, डाळिंब, बोर, आवळा अशी फळपिके घेणे, शेडनेटमधील आधुनिक शेती करणे, तसेच भुसार धान्याएवजी डाळवर्गीय पिके घेणे, ठिबक सिंचनावर आधारित भाजीपाला व कापसाची लागवड करणे अशा अनेक बाबतीत प्रबोधन करण्यात आले. प्रकल्प सुरू होण्यापूर्वी फक्त ३ हेक्टर क्षेत्रावर असलेले द्राक्ष लागवडीखालील क्षेत्र पाणलोट विकासानंतर ४८० हेक्टरांपर्यंत वाढले. ४८ शेतकऱ्यांनी ४५० हेक्टरवर द्राक्षाची लागवड केली. २००३-४ या वर्षापासून कडवंची पाणलोट क्षेत्रामध्ये शेततळ्याची संकल्पना अंमलात आणण्यास सुरुवात झाली. चार वर्षे राज्यात सातत्याने दुष्काळ असला तरी कडवंची पाणलोट क्षेत्रांत करण्यात आलेल्या शेततळ्यांत मात्र याच वर्षांमध्ये भरपूर पाणीसाठा झाला. पाणलोट मिळणाऱ्या शेतांतील उत्पन्नातही लक्षणीय वाढ झाली आहे. पानलोट क्षेत्रामध्ये एकूण कृषी उत्पन्नाच्या २० टक्क्यांपर्यंत म्हणजे साधारणपणे आठ कोटी रुपयांपर्यंत रोजगार उपलब्ध झाला आहे.
संदर्भ
पुस्तकाचे नाव:- जलयोजन आणि व्यवस्थापन; लेखकाचे नाव:- विजय बोराडे (ज्येष्ठ जलतज्ज्ञ)