Jump to content

कठाणी गाय

कठाणी गाय हा शुद्ध भारतीय गोवंश असून, याचे मूळ महाराष्ट्राच्या विदर्भ प्रांतातील चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा तसेच गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळतो. गवळाऊ गायी नंतर भारतीय कृषी संशोधन परिषद ने प्रमाणीकरण केलेला विदर्भातील हा दुसरा गोवंश आहे.[] हा दुहेरी हेतूचा गोवंश म्हणून ओळखला जातो.[]

ग‌डचिरोली जिल्ह्यातील चामोर्शीजवळील अनखोडा येथे गोंड आदिवासी भातासोबत कठाणी; एक रब्बी हंगामातील पीक घेतात. या पिकाच्या नावावरूनच या जातीच्या जनावरांना कठाणी, असे नाव पडले.[]

शारीरिक रचना

या गोवंशाचा प्रमुख रंग पांढरा तसेच तांबूस असून अल्प प्रमाणात काळसर आणि लाल रंग देखील दिसून येतो. या गोवंशाचे शरीर मध्यम आकाराचे असते. याचे डोळे, बुबूळ, नाकपुडी, खूर, शिंगे आणि शेपटीचा गोंडा पूर्णपणे काळा असून गोंडा हा मागच्या टाचे पर्यंत आढळतो. शिंगे मध्यम आकाराची असून ती पाठीमागे डोक्याच्या बाजूला वळलेली असतात. काही जनावरांमध्ये शिंगे ही वरच्या बाजूला वळलेली देखील दिसून येतात.[][]

वैशिष्ट्ये

या गोवंशाची प्रजनन क्षमता उत्तम असून वेताची संख्या अधिक असल्याने पशुपालकांकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. विदर्भातील उष्ण हवामानात हा गोवंश तग धरून राहण्यास अनुकूल असल्याने सर्व सामान्य शेतकरी याचे सहज पालन करतो. सामान्य परिस्थितीतील दिवसाला साधारण अर्धा ते एक लिटर दूध मिळते. परंतु जर व्यवस्थापन नीट केले तर चार ते पाच लिटर पर्यंत दूध मिळते. या गोवंशाचा दूध देण्याचा कालावधी हा साधारणतः साडेसात ते आठ महिने इतका असतो. दुधातील फॅटचे प्रमाण ४.४ टक्के पर्यंत आढळते. या गोवंशाचे पहिल्या वेताचे वय ५१ ते ५८ महिने इतके असून याच्या दोन वेतातील अंतर ३८७ ते ५२२ दिवस पर्यंत असते.[][]

बैल वजनाने हलके, खूर काळे असून चिखलात सहज चालतात, यामुळे हा गोवंश भात शेतीसाठी उपयुक्त मानला जातो. तसेच हा उपलब्ध असलेला सुका चारा, गव्हाचे काड, तांदळाचे तुस, सोयाबीनचे कुटार तसेच शेतात उगवणारे गवत खाऊन सहज जगतो. यामुळे याचे जतन संवर्धन खास करून शेतकमासाठी जास्त केले जाते.[]

भारतीय गायीच्या इतर जाती

भारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ "Registered Breeds Of Cattle" (इंग्रजी भाषेत). १ मार्च २०२४ रोजी पाहिले.
  2. ^ a b c "कठानी गोवंशाची राष्ट्रीय पातळीवर नोंद". ऍग्रोवन. १ मार्च २०२४ रोजी पाहिले.
  3. ^ "विदर्भातील गावरानी गायीचे कूळ सापडले!". महाराष्ट्र टाइम्स. १ मार्च २०२४ रोजी पाहिले.
  4. ^ a b c "Traditional practices for newly registered Kathani cattle breed". baif.org.in the (इंग्रजी भाषेत). १ मार्च २०२४ रोजी पाहिले.