Jump to content

कंपोस्ट खत

कंपोस्ट खत
कंपोस्ट खत

कंपोस्ट खतात अनेक प्रकारचे वनस्पतिजन्य व प्राणिजन्य पदार्थ असतात. कंपोस्ट खत हे ग्रामीण व नागरी भागात निर्माण झालेल्या सेंद्रिय पदार्थापासून सूक्ष्म जिवाणूंच्या साहाय्याने कुजवून तयार केलेले उत्कृष्ट खत होय. कंपोस्ट खत तयार करण्याच्या निरनिरळ्या पद्धती आहेत. यामध्ये इंदूर पद्धत, बेंगलोर पद्धत, सुपर कंपोस्ट खत, नॅडेप पद्धत इत्यादी पद्धतींचा समावेश होतो.

भारत देशात रासायनिक खताचे आगमन व त्यांचा वापर होण्यापूर्वी शेतकरी शेणखत, कंपोस्ट खत, गाळाचे खत, निरनिराळया पेंडींचा वापर, पिकांची फेरपालट यांचेद्वारे जमिनीची सुपिकता टिकवून ठेवत असे. कालांतराने शेतकरी रासायनिक खतांचा वापर प्रमाणापेक्षा जास्त करू लागले व त्यामुळे त्याचा दुष्परिणाम पिकावर तसेच जमिनीत दिसून येऊ लागला. पर्यायाने शेतकरी, पाणी, प्राणी, पक्षी मानवी आरोग्य व गांडूळ मित्रांचे अस्तित्वच धोक्यात आले.

वनस्पती सेंद्रिय पदार्थ निर्माण करतात. जंगलातील झाडांची पाने, काटक्या जमिनीवर पडतात, वारा व वादळाने झाडे मोडून जमिनीवर पडतात, शाकाहारी प्राणी वनस्पती खातात आणि त्यांच्या विष्ठेतून सेंद्रिय पदार्थ बाहेर पडतात. जेव्हा मासांहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांना खातात तेव्हा त्यांच्या विष्ठेत सेंद्रिय पदार्थ असतात. शेतीतील पिकांचे अवशेष जमिनीत मिळतात. मेलेल्या मुळया जमिनीत कुजतात. गुरे, शेळया-मेंढया, रानात चरतात तेंव्हा त्यांचे शेण व लेंड्या जमिनीवर पडतात. शेणकिडे (भुंगे) शेणाचे गोळे करून आपल्या बिळात नेतात व शेण खातात जमिनीत राहणारे कीटक, लहान प्राणी व जिवाणू मरतात, तेंव्हा त्यांचे शरीरातील सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळतात. अशाप्रकारे जमिनीतील सेंद्रिय पदार्थ कुजविण्याच्या विविध अवस्था असतात. कच्चे सेंद्रिय पदार्थ माणसाला ओळखता येतात, पण ते पूर्णपणे कुजल्यानंतर त्याचा मूळचा आकार राहत नाही. तेंव्हा त्याला ह्युमस असे म्हणतात.

कंपोस्ट खत देण्याची पद्धत

नॅडेप कंपोस्ट खत पुरेशा प्रमाणात तयार असल्यास ते दरवर्षी प्रति हेक्टर ७.५ ते १२.५ टन पेरणीच्या १५ दिवस आधी पसरून घेतात. अश्या पद्धतीने तयार केलेल्या कंपोस्ट खताची उपलब्धता कमी असल्यास पेरणीच्या वेळी नरसाळ्यांमधून देतात. खत देण्याचे चाडे (नरसाळे) पुढे ठेवून बियाणे पेरणीकरिता चाडे मागे असते. त्यामुळे प्रथम खत जमिनीत पडते व त्यानंतर बियांची पेरणी होते. टाक्यामधून खत काढल्यानंतर ते मोकळ्या जागेत ठेवत नाहीत. खत प्रत्यक्ष देण्यापूर्वी काही दिवस साठवून ठेवायचे असल्यास त्याचे ढीग लावून व त्यावर गवताचे आच्छादन टाकून ठेवतात. त्यावर मधून मधून पाणी शिंपडतात. त्यामुळे आर्द्रता कायम राहण्यास मदत होते.

सेंद्रिय पदार्थ

सेंद्रिय पदार्थ कार्बनच्या अनेक संयुगाने बनलेले असतात. खडक व खनिजे यापासून तयार झालेल्या जमिनीच्या असेंद्रिय घटकामध्ये सेंद्रिय पदार्थांचे मिश्रण झालेले असते. अश्या जमिनीला सेंद्रिय जमीन म्हणतात. जमिनीतील सेंद्रिय पदार्थ कुजण्याची क्रिया सतत चालू असते आणि अखेरीस सेद्रिय पदार्थांचे रूपांतर साध्या असेंद्रिय संयुगात होते.

जमिनीच्या उत्पादन क्षमतेत सेंद्रिय पदार्थांचे कार्य सुपीक जमीन बनविण्यात सेंद्रिय पदार्थाचा प्रत्यक्ष सहभाग असतो. कारण त्यामधून हळूहळू अन्नद्रव्ये पिकांना मिळत असतात. जिवाणूंमुळे सेंद्रिय पदार्थ कुजण्याची हळूहळू क्रिया होते, तेव्हा त्यातील अन्नद्रव्ये पिकासाठी मुक्त होतात. सेंद्रिय पदार्थाचे खनिजीकरणामुळे हळूहळू कार्बन, नायट्रोजन, गंधक, फॉस्फरस, व इतर मूलद्रव्ये मुक्त होतात. भारी जमिनीत चिकण कणांचे प्रमाण जास्त असते. अश्या जमिनीची मशागत करणे अवघड असते. अश्या जमिनीत पाणी हळूहळू मुरते, त्यामुळे बरेचसे पाणी वाहून जाते. अश्या जमिनीत हवा खेळती रहात नाही, भारी जमिनीत सेंद्रिय पदार्थ मिसळल्यास ती जमीन भुसभुशीत होते, व मशागत करणे सोपे जाते. जमीन भुसभुशीत झाल्यावर पाणी मुरते, पाणी वाहून जात नाही. त्यामुळे जमिनीची धूप कमी होते, हवा खेळती राहते. जमिनीच्या पृष्ठभागावर पोपडा तयार होत नसल्याने पेरलेल्या बियाण्याची उगवण चांगली होते.

संदर्भ

https://mahaagro.wordpress.com/%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%96%E0%A4%A4/

https://aaqua.persistent.co.in/aaqua/forum/viewthread?thread=11568[permanent dead link]