Jump to content

कंजिरा

दाक्षिणात्य संगीताच्या कार्यक्रमांमध्ये वापरले जाणारे, पाश्चात्त्य ‘टँबरीन’ सारखे एक अवनद्ध तालवाद्य. यात सु. ०⋅२३ मी. व्यासाच्या आणि सु. ०⋅१० मी. खोली असलेल्या एका वर्तुळाकार लाकडी कड्याच्या एका बाजूस चामड्याचा एक तुकडा ताणून बसवलेला असतो. हे चामडे प्रायः घोरपडीचे असते. लाकडी कड्याला तीन किंवा चार भोके असून त्यांत धातूच्या तुकड्यांचे घोस ओवलेले असतात. त्यांव्यतिरिक्त कड्याला जे आकडे लावलेले असतात, त्यांना बारीक घुंगरांचे घोस लटकावलेले असतात.

कंजिरा वाजविली जात असताना या दोहोंचा मिळून मधुर किणकिणाट साथीच्या वेळी ऐकू येतो. कंजिरा हे वाद्य डाव्या हातात धरून उजव्या हाताच्या बोटांनी वाजवतात. कंजिरेचे वादन अतिद्रुत लयीतही करता येते. कंजिरा हे उपतालवाद्य असून मृदंगासमवेत त्याची जोड अतिशय मनोवेधक होते. त्यागराजाचा एक शिष्य चित्तूर राधाकृष्ण अय्यर, मामूंडिय पिळ्ळै आणि पुदुकोट्टईचे दक्षिणामूर्ती पिळ्ळै हे कंजिरावादनातले विख्यात कलावंत होत.

महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या खंजिरी ह्या वाद्याचे कंजिराशी लक्षणीय साम्य आहे. तथापि खंजिरीला धातूच्या चकत्या लावलेल्या असतात धातूच्या तुकड्यांचे घोस नसतात तसेच महाराष्ट्रामध्ये खंजिरीचे वादन मृदंगाबरोबर होत नाही.