Jump to content

औद्योगिक समाजशास्त्र

औद्योगिक समाज व त्यातील औद्योगिक संघटनांचे स्वरूप यांचा अभ्यास करणारी अनुप्रयुक्त समाजशास्त्राची एक शाखा. समाजशास्त्रातील तत्त्वे आणि अभ्यासपद्धती वापरून औद्योगिक समाजामागील तत्त्वज्ञान, औद्योगिक संघटनांची संरचना आणि कार्य, कर्मचाऱ्यांचा व्यावसायिक उत्कर्ष आणि व्यावसायिक चलनशीलता, कर्मचारी-व्यवस्थापनाची उत्क्रांती, औद्योगिक क्षेत्रातील नेतृत्व, कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य व उत्पादनक्षमता, औद्योगिक संघटनांचे प्रशासन तसेच उद्योगधंदे, समूह व समाज यांचे परस्परसंबंध आणि औद्योगिक समाजाचे भवितव्य यांसारख्या विषयांचा औद्योगिक समाजशास्त्रात अभ्यास केला जातो. अर्थातच हे सर्व विषय मुख्यत: समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले जातात. त्याचा ⇨ औद्योगिक मानसशास्त्राशीही निकटचा संबंध आहे.

पार्श्वभूमी:

औद्योगिक समाजात औद्योगिकीकरणास पूरक असे विशिष्ट तत्त्वज्ञानही निर्माण होते. उपयुक्ततावाद, व्यक्तीचे आर्थिक स्वातंत्र्य, व्यापारी दृष्टिकोन यांसारख्या तत्त्वांवर भर दिला जातो. औद्योगिक समाजरचनेला बुद्धिवादी निष्ठा व वैज्ञानिक दृष्टिकोन यांचीही पार्श्वभूमी असते. तथापि पश्चिमी देशांतील औद्योगिक क्रांतीनंतर जी सामाजिक परिस्थिती निर्माण झाली, तिचे स्वरूप आणि वरील तत्त्वज्ञान यांमध्ये तफावत होती. उद्योगधंद्यांत मालक आणि मजूर यांचे हितसंबंध संवादी नव्हते. कामगारवर्ग जुन्या परंपरेशी बद्ध होता. औद्योगिकीकरण आणि नागरीकरण यांमुळेही औद्योगिक समाजात बुद्धिवादी निष्ठेचा फारसा प्रसार झाला नाही. व्यक्तिस्वातंत्र्यालाही पारंपरिक संस्था व गट यांच्या प्रभावामुळे मर्यादा पडल्या. कारखान्यात वावरणारा कामगारवर्ग समाजातील वेगवेगळ्या गटांचा प्रतिनिधी म्हणूनच वावरत असे. अशा गटांचा त्यांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होई.

कुटिरोद्योगासारखे पूर्वीचे उद्योगधंदे सर्वच कुटुंबाला कामात सहभागी करून घेत. परंतु औद्योगिकीकरणामुळे कामगारांना आपले घर आणि गाव सोडून शहरात जाणे भाग पडले. शहरात योग्य प्रकारच्या सुखसोयी उपलब्ध नव्हत्या त्यामुळे व हाती पैसा असल्याने शहरातील कामगारवर्गात मद्यपान, जुगार यांसारखी व्यसने निर्माण झाली. तसेच कामाची अन्याय्य पद्धती व सकस अन्नाचा अभाव यांमुळे श्रमिकांची शरीरप्रकृती खालावू लागली व याचा परिणाम औद्योगिक उत्पादन तसेच समाज या दोहोंवरही झाला. हळूहळू वरील परिस्थिती बदलली. उत्पादनाच्या दृष्टीने श्रमिकांना सुस्थितीत ठेवणे आवश्यक आहे, याची जाणीव होऊन कामगारवर्गाची परिस्थिती सुधारण्याचे प्रयत्‍न होऊ लागले. कामगार संघटनांचा उदय झाला. राजकीय दृष्टीनेही कामगारवर्गाला एक नवी शक्ती म्हणून महत्त्व प्राप्त झाले. या पार्श्वभूमीवरच औद्योगिक समाजशास्त्राचा उदय झाला.

अभ्यासक्षेत्र:

औद्योगिकीकरणामुळे कुटुंब, आर्थिक व सामाजिक स्तरीकरण यांसारख्या सामाजिक संस्थांवर फार मोठे परिणाम होतात. समाजशास्त्राच्या दृष्टीने प्रत्येक व्यक्ती समाजातील विशिष्ट समूहाची सभासद असते व त्या समूहाचा तिच्यावर प्रभाव असतो. त्यामुळे औद्योगिक समाजास आवश्यक असणारी बुद्धिवादी निष्ठा व व्यावहारिक दृष्टी यांना मर्यादा पडतात. उद्योगधंद्यांत आत्मीयतेची जागा व्यवहार घेतो व दुसऱ्याच्या हिताची पर्वा न करता स्वहित साधण्याचा प्रयत्‍न केला जातो. मॅक्स वेबर या प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञाने केलेले नोकरशाहीचे विवेचन या संदर्भात महत्त्वाचे ठरते. नोकरशाहीमध्ये व्यक्तिनिरपेक्ष संबंध अपेक्षित असतात व त्यासाठी औपचारिक संघटनेची विशेष गरज भासते. हा व्यक्तिनिरपेक्षतेचा प्रश्न औद्योगिक समाजशास्त्रात महत्त्वाचा आहे. त्याबरोबरच उद्योगधंद्यातील विविध गटांतील सामाजिक दृष्ट्या महत्त्वाच्या प्रक्रिया, कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य, औद्योगिक सत्तेचे लोकशाहीकरण व औद्योगिकीकरणामुळे होणारे सामाजिक बदल यांवर औद्योगिक समाजशास्त्र विशेष भर देते. औद्योगिक समाजातील मालक व कामगार हे गट आपण समजतो तेवढे एकजिनसी नसतात, असे औद्योगिक समाजशास्त्राने दाखवून दिले आहे.

औद्योगिक समाज गतिशील असतो कारण त्यातील मालक, व्यवस्थापक आणि कर्मचारी यांच्या परस्परसंबंधांतून सतत निरनिराळ्या समस्या निर्माण होत असतात. सामाजिक तत्त्वज्ञान व सामाजिक शास्त्रे यांच्या वाढीबरोबरच उपर्युक्त परस्परसंबंध नवीन दृष्टिकोनातून पाहण्याची आवश्यकता निर्माण होते. तसेच उद्योगधंद्यातील तांत्रिक व यांत्रिक बदलांचा कर्मचारीवर्गावर होणारा परिणाम सामाजिक दृष्टीने महत्त्वाचा ठरतो.