Jump to content

औंध साहित्य संमेलन

औंध उपनगरीय मराठी साहित्य संमेलन पुणे शहरातील औंध, बाणेर या भागात अक्षरभारती या नोंदणीकृत संस्थेच्या वतीने दरवर्षी भरवले जाते. अक्षरभारतीची स्थापना २००३ साली भरलेल्या औंध उपनगरीय मराठी साहित्य संमेलनप्रसंगी प्रा. माधव राजगुरू यांनी केली. प्रसिद्ध समीक्षक प्रा. रा. ग. जाधव हे या संस्थेचे पहिले अध्यक्ष होते. आतापर्यंत कवी डॉ. विठ्ठल वाघ, ज्ञानेश्वर तापकीर, डॉ. अविनाश सांगोलेकर, प्रा. माधव राजगुरू यांनी संस्थेचे अध्यक्षपद भूषवले आहे. पहिले संमेलन २००३ साली संपन्न झाले. आतापर्यंत पाच संमेलने झाली असून डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. अनिल अवचट, डॉ. विट्ठल वाघ, प्रा. प्रवीण दवणे, डॉ. यशवंत पाटणे यांनी संमेलनाध्यक्षपद भूषविले आहे. संमेलनात भानू काळे, विजय भटकर, रमेश राठीवडेकर, प्रवीण दवणे इत्यादींना मराठी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. संमेलनाशिवाय कथा, कविता वाचन व लेखन स्पर्धा, लेखन कार्यशाळा, व्याख्यानमाला इ. अन्य उपक्रमही संस्थेच्या वतीने घेतले जातात. औंध परिसरातील लोकांची वाचनाची भूक शमविण्यासाठी संस्थेने अक्षरभारती नावाने ग्रंथालय सुरू केले आहे. याशिवाय अक्षरभारती अनुवाद अकादमीच्या वतीने अनुवादाच्या संदर्भातील कामे केली जातात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मराठी विभाग आणि अक्षरभारती यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. गजानन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत राज्यस्तरीय चार अनुवाद कार्यशाळा झालेल्या आहेत. अक्षरभारती आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचा हिंदी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अनुवादकांचा मेळावा झाला असून यावेळी हिंदी, मराठी, इंग्रजी, कन्नड या भाषांमधील अनुवादक सहभागी झाले होते. या मेळाव्यात अनुवादाच्या संदर्भात येणाऱ्या अडचणी व उपाय यावर सविस्तर चर्चा झाली. अक्षरभारतीचा प्रकाशन विभाग असून आतापर्यंत अनेक मौलिक ग्रंथ प्रकाशित करण्यात आली आहेत.

हे सुद्धा पहा