ओडिसी नृत्य
ओडिसी नृत्य ही भारतातील ओडिशा राज्यातील एक अभिजात नृत्यशैली आहे. मंदिरशिल्पांच्या मुद्रा हे ओडिसी नृत्याचा विशेष होय.‘त्रिभंग’ स्वरूपाच्या मूर्तीमुद्रेवर भाव आधारित असतात. ओडिशा मधील उदयगिरी येथे या कलेचा जन्म झाला. ओडिसीच्या सध्याच्या स्वरूपात बाराव्या शतकात जयदेवाने लिहिलेल्या गीतगोविंदाची पदे प्रामुख्याने वापरली जातात.
बुधकालीन सहजयान आणि वज्रयान शाखांच्या सौंदर्यप्रधान साधनेतून या शैलीचा उदय झाला असे मानले जाते.भरतनाट्यम् आणि कथक या नृत्यप्रकारांचे मिश्रण यात दिसते.बौद्ध,शैव,वैष्णव, ब्राह्मण आणि शाक्त या संप्रदायांचे संस्कार या शैलीवर दिसून येतात.कवी जयदेवाची अष्टपदी यामध्ये प्रामुख्याने गायली जाते. कोणार्क येथील सूर्य मंदिर तसेच जगन्नाथपुरी येथील मंदिर हे या नृत्याची आधारभूमी मानले जातात.[१]
परिचय
जैनराजा करवेलाच्या कारकीर्दित ओडिसी नृत्यशैलीचा जन्म झाला. तो स्वतः उत्कृष्ट नर्तक होता. ही शैली इसवीसनाच्या दुसऱ्या शतकात विकसित झाली. ओडिसी हे तीन प्रकारच्या नर्तकांद्वारे केले जाई.
- महारी (जगन्नाथ मंदिरातील दासी)
- गोटिपुवा (स्त्रीरूपधारी कुमार मुले)
- नर्तकी (राजदरबारातील सेवेकरी नर्तकी)
अवतरण शैली
नाट्यशास्त्रातील दाक्षिणात्य, पाञ्चालि, औड्रमागधि, अवंती अशा चार प्रकार आहेत. महेश्वरपत्र रचित अभिनयचंद्रिका ग्रंथात ओडिसी नृत्य औड्रमागधि शैलीचे अनुकरण करते असे म्हणले आहे. जंब, ध्रुवा, माता, रूपक, त्रिपुट, अट, एकतालि, अटतालि, आदिताल असे नऊ ताल ओडिसीत वापरले जातात. त्रिभंगी मुद्रा व हे ताल वापरून ओडिसीमध्ये वैविध्यपूर्ण रसभाव, चारिकळा, मण्डल तयार केली जातात. लास्य (सौम्य) ताण्डव ( उग्र) भेदात ओडिसी नृत्याची प्रकृती ताण्डवाकडे झुकली आहे. या नृत्यात शंकर, जगन्नाथ काली, गणपती आदी देवतांची स्तुती उपासना केली जाते.
विविध अंग
मंगलाचरण, स्थायी, पल्लवी, अभिनय, मोक्ष ही ओडिसीचे पाच प्रमुख अंगे आहेत.
मंगलाचरण (नृत्याञ्जलि)
“मंगळाचरण“ करण्याचे तीन उद्देश म्हणजे भूमिप्रणाम, देवस्तुती व, शब्दप्रणाम. नटराजाच्या आवाहनाने नृत्याचा प्रारंभ होतो.
पल्लवी
पल्लवीचे वाद्यपल्लवी व स्वरपल्लवी असे दोन प्रकार आहेत.[२] भरतनाट्यम मधील तिल्लाणाशी पल्लवीचे साम्य आहे.
अभिनय
अभिनय हा ओडिसी शैलीतील सर्वाधिक मनोहर भाग असतो. यात रसाभिनय, हस्ताभिनय आदी भाग आहेत.
मोक्ष
नृत्याचा हा परमोच्च बिंदू आहे. येथे नर्तक आत्म्याचे परमात्याशी मीलन झाल्याचे परमोच्च भाव प्रकट करतो.
प्रसिद्ध कलाकार
मोहन महापात्र अणि त्यांचे शिष्य केलुचरण महापात्र, संयुक्ता पाणिग्रही, अरुणा मोहन्ती, प्रोतिमा बेदी,सोनल मानसिंह, माधवी मुद्गल इ.
चित्रदालन
संदर्भ
बाह्य दुवे
- http://www.artindia.net/odissi.html
- http://www.webindia123.com/dances/odissi/
- http://orissagov.nic.in/culture/odissi.htm
- http://www.chandrakantha.com/articles/indian_music/nritya/odissi.html Archived 2008-12-19 at the Wayback Machine.
- http://www.kanakasabha.com/sapta/odissi.htm Archived 2008-12-20 at the Wayback Machine.