Jump to content

ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी


ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी

ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी हा इंग्रजी भाषेतील सुप्रसिद्ध शब्दकोश आहे.या शब्दकोशाचा पहिला खंड फेब्रुवारी १ १८८४ रोजी प्रसिद्ध झाला.त्यावेळी 'अ न्यू इंग्लिश डिक्शनरी ऑन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स; फाऊंडेड मेनली ऑन द मटेरियल्स कलेक्टेड बाय द फिलॉलॉजिकल सोसायटी' असे त्याचे लांबलचक नाव होते. पहिल्या ३५२ शब्दांच्या खंडात 'ए' पासून 'ऍंट' पर्यंतच्या शब्दांचा समावेश होता. पुढे हळूहळू या कोशात शब्दांची भर पडत गेली आणि संपूर्ण एकत्रित शब्दकोश तयार होण्यास एप्रिल १९ १९२८ ही तारीख उजाडली. १९३३ मध्ये या शब्दकोशाला ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी असे नाव मिळाले. १९५७ नंतर जगातील इतर बोली भाषेतील शब्दांचा या कोशात समावेश होण्यास सुरुवात झाली. तसेच जे शब्द वापरले जात नाहीत ते काढून टाकणेही सुरू झाले. नंतर या कोशाचे संगणकीकरण करण्यासाठी 'न्यू ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी' हा प्रकल्प हाती घेण्यात आला. या कामात १२० टाइपरायटर्सनी जवळजवळ ३५ कोटी कॅरेक्टर्स टंकली. पुन्हा १९८९ मध्ये न्यू हा शब्द काढून टाकण्यात आला व 'ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी - २' या नावाने खंड प्रकाशित करण्यात आला. सध्या या शब्दकोशाचा इतिहासातील सर्वांत महत्त्वाकांक्षी प्रकल्प चालू असून 'ओईडी-३' या प्रकल्पात प्रत्येक शब्दाचा अर्थ, त्याच्या विविध अर्थछटा, संदर्भ तसेच व्याकरण या बाबी बारकाईने तपासल्या जात आहेत. प्रकल्पासाठी प्रस्तावित खर्च साडेपाच कोटी डॉलर इतका असून हा प्रकल्प पूर्ण होण्यास २०३७ साल उजाडेल.