Jump to content

एलेन टेरी आलिशिआ

एलेन टेरी आलिशिआ

एलेन टेरी आलिशिआ ह्या ब्रिटिश रंगभूमीवर प्रसिद्ध अभिनेत्री आहेत . त्यांचा जन्म इंग्लंडमधील कॉव्हेंट्री, वॉरिकशर येथे झाला.

तिचे शालेय शिक्षण फारसे झाले नाही, तरी रंगभूमीशी परिचित अशा आईवडिलांच्या उत्तेजनामुळे तिच्यातील अभिनयगुणांना चांगला वाव मिळाला. वयाच्या नवव्या वर्षीच तिने द विंटर्स टेल व मिडसमर नाइट्स ड्रीम या नाटकांतील अनुक्रमे मॅनिलियम व पक् या भूमिका करून वाहवा मिळविली. पुढे १८५९ पर्यंत तिने कीनच्या आणि नंतर स्टॉक नाटक कंपनीच्या विविध नाटकांत कामे केली व १८६४ मध्ये ती रंगभूमीवरून निवृत्त होऊन आपल्यापेक्षा वयाने ३० वर्षे मोठ्या असलेल्या जी. एफ्. वॅट्स या चित्रकराराशी विवाहबद्ध झाली. हा विवाह अयशस्वी ठरून १८६५ मध्ये तिने घटस्फोट घेतला आणि ती परत रंगभूमीकडे वळली. १८६७ मध्ये तिने द टेमिंग ऑफ द श्रु  नाटकात हेन्‍री अर्व्हींगसोबत कॅथराइनची भूमिका केली परंतु पुन्हा ती रंगभूमीपासून दूर झाली व हार्टफर्ड येथे एडवर्ड गॉडविन या प्रियकराच्या सहवासात सहा वर्षे राहिली. याच काळात तिला दोन अपत्येही झाली. या प्रियकरापासूनही दुरावल्यानंतर टेरीला चार्ल्स रीड या नट-निर्मात्याने पुनश्च रंगमंचावर आणले. मर्चंट ऑफ व्हेनिसमधील तिची पोर्शियाची भूमिका गाजली. टेरीच्या कलागुणांची परिसीमा त्या भूमिकेतून दिसून आली. १८७७ मध्ये चार्ल्स केली या नटाशी तिने विवाह केला.


टेरीच्या अभिनय-कौशल्याला खरा वाव हेन्री अर्व्हिंग या प्रतिभावंत व कल्पक कलाकाराच्या सहवासातच मिळाला. तिच्या ऑफेलिआ (१८७८), पोर्शिया (१८७९), डेस्डेमोना (१८८१), ज्युलिएट (१८८२), लेडी मॅकबेथ (१८८८), क्वीन कॅथराइन (१८९२), कॉर्डेलिया (१८९२), इमोज (१८९६) व व्हॅल्युमनिया (१९०१) या भूमिका अतिशय गाजल्या. ही प्रतिभाशाली अभिनेत्री आपल्या तरल संवेदनक्षमतेने कोणत्याही भूमिका जिवंत उभी करीत असे. रंगमंचावरील तिच्या यशाचे बीज तिच्या तरल संवेदनशील व्यक्तिमत्त्वात होते. ग्रेट ब्रिटन, उ. अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया येथील प्रेक्षकांच्या मनात टेरीच्या भूमिका याच कलगुणांमुळे घर करून बसल्या होत्या.

टेरीचे व अर्व्हिंगचे प्रेमसंबंध निकट स्वरूपाचे होते परंतु १८९० च्या सुमारास बर्नार्ड शॉ व टेरी यांची पत्रमैत्री सुरू झाली. टेरी शॉच्या अधिकाधिक जवळ जाऊ लागली. ही तिची प्रेमपत्रे म्हणजे इंग्रजी पत्रसाहित्यातील सुंदर प्रतिभासंपन्न पत्रलेखनाचे नमुने होत. ‘टेरी म्हणजे जिवंत अभिनयाची पुतळीच आहे’, असे बर्नार्ड शॉ समजत असे. तिने प्रतिगामी अर्व्हिंगला सोडून आपल्या व इब्सेनच्या नाट्यकृतीतून काम करावे व त्यातून आपल्या कलानैपुण्याची चमक दाखवावी असा शॉचा आग्रह असे. १९०५ मध्ये टेरीने शॉच्या कॅप्टन ब्रॉस ब्राँड्स कन्व्हर्शनमध्ये सेसिलीची भूमिका करून शॉच्या आग्रहाला प्रतिसाद दिला. १९०६ मध्ये ड्रुरीलेन रंगमंदिरात टेरीने आपला सुवर्णमहोत्सव साजरा केला, त्या वेळी रंगभूमीच्या क्षेत्रातील तत्कालीन प्रसिद्ध कलाकारांनी रंगमंचावर आपली हजेरी लावून  तिच्याविषयी आदर व्यक्त केला. १९०७ मध्ये टेरीने एका अमेरिकन नटाशी विवाह केला परंतु तोही अयशस्वी होऊन टेरीचे व त्याचे संबंध फक्त मैत्रिपुरतेच उरले. १९१० ते १९१५ या काळात टेरीने शेक्सपिअरच्या नाट्यविषयांवर व्याख्याने दिली. पुढे तिने १९२५ पर्यंत रंगभूमीवरही कामे केली त्यानंतर ती रंगभूमी, चित्रपट इ. क्षेत्रांतून निवृत्त झाली. तत्कालीन ब्रिटिश रंगभूमीवरील अनभिषिक्त सम्राज्ञी म्हणून तिने उणेपुरे एकदशक गाजविले. १९२५ मध्ये ब्रिटिश राजसत्तेने तिला ‘डेम ग्रँड क्रॉस ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ हा किताब देऊन गौरविले. त्यानंतर तीन वर्षांनीच ती निधन पावली. मृत्यूनंतर टेरीच्या मुलीने टेरीच्या केंट येथील निवासात तिच्या स्मरणार्थ एक संग्रहालय उघडले. ते १९३९ मध्ये राष्ट्रीय संस्थेकडे सोपविण्यात आले.

संदर्भ

१. https://vishwakosh.marathi.gov.in/17582/