Jump to content

एमिली शेंकल

पती सुभाषचंद्र बोस यांच्यासमवेत एमिली शेंकल

एमिली शेंकल (जर्मन: Emilie Schenkl ;) (२६ डिसेंबर, इ.स. १९१० - मार्च, इ.स. १९९६) ही सुभाषचंद्र बोस यांची सचिव व भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेली व जन्माने ऑस्ट्रियन स्त्री होती. काही विद्वानांच्या मते, सुभाषचंद्र बोस यांनी २६ डिसेंबर इ.स. १९३७ रोजी ऑस्ट्रियातील बागास्ताइन येथे एमिली शेंकल या युवतीशी गुप्तपणे विवाह केला होता []. ज्यावेळी विवाह झाला त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे इ.स. १९३८ साली हरीपुरा येथे होणाऱ्या अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होणार हे निश्चित झाले होते. तेव्हा लग्नाची ही खाजगी बाब, त्यात ते ही एका ऑष्ट्रियन रोमन कॅथॉलिक युवतीशी, उघडपणे जाहीर करणे अकारण वादंग माजविणारे ठरण्याची भीती होती. म्हणूनही सुभाषचंद्रांनी हे लग्न गुप्तपणे केले असावे[ संदर्भ हवा ].

प्रकृती स्वास्थ्यासाठी आणि ब्रिटिश सरकारने हद्दपार केले म्हणून सुभाषचंद्र इ.स. १९३३ साली युरोपात गेले. तिथे व्हिएन्नात जून इ.स. १९३४ मध्ये एमिलीची व त्यांची पहिली भेट झाली. सरकारी अवकृपा आणि हवापालट म्हणून सुभाषचंद्र व्हिएन्नात आले असले तरी ते केवळ पर्यटक नव्हते. भारताची यथास्थिती युरोपातील देशांना कळावी म्हणून सुभाषचंद्रंनी व्हिएन्नात एक ऑफिस उघडले. त्याठीकाणी त्यांची सेक्रेटरी म्हणून एमिली शेंकल कामाला आली. तिची मातृभाषा जर्मन असली तरी तिला इंग्रजी बऱ्यापैकी येत होते. एमिलीचे कुटुंब सामान्य मध्यमवर्गीय होते. वडिलांना घरखर्चास हातभार लावता यावा म्हणून तिने सुभाषचंद्रांच्या सेक्रेटरीची ही नोकरी स्वीकारली.

सुभाषचंद्रांनी एमिलीबरोबर डिसेंबर इ.स. १९३७ मध्ये लग्न केले होते ते गुप्तपणे. युद्धकाळात एका जर्मन स्त्रीने भारतीयाबरोबर लग्न लावणे शक्यच नव्हते. एमिलीने हा संबंध तोडावा असा सल्ला तिला वकीलांनी दिला होता असे तिने नंतर एका दूरचित्रवाणीस दिलेल्या मुलाखतीत म्हणले आहे. परंतु तिने हा सल्ला झुगारून लावला व व हिंदू पद्धतीने फेब्रुवारी इ.स. १९४२ मध्ये लग्न केले.[] त्यानंतर त्यांना अनिता ( २१ नोव्हेंबर, इ.स. १९४२; व्हिएन्ना) नावाची एक मुलगी झाली.

८ फेब्रुवारी इ.स. १९४३ रोजी पाणबुडीत बसताना सुभाषचंद्रांनी एमिलीचा निरोप घेतला ती त्या दोघांमधील अखेरची भेट. १८ ऑगस्ट इ.स. १९४५ रोजी विमान अपघातानंतर सुभाषचंद्रांचा शेवट झाला. त्यानंतर इ.स. १९९५ सालापर्यंत म्हणजे ५० वर्षे एमिली जिवंत होती.

सुभाषचंद्र व एमिली यांनी एकमेकांना अनेक पत्रे लिहिली होती. सुभाषचंद्रांनी पाठविलेली पत्रे एमिलीने जपून ठेवली होती. जून इ.स. १९९३ मध्ये एमिलीने हा अमोल ठेवा, तिचे पुतणे व शरदचंद्र बोसांचे पुत्र सिसिर बोस यांच्या स्वाधीन केला. समग्र सुभाष साहित्याचा भाग म्हणून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने ही पत्रे ग्रंथरूपाने इ.स. १९९४ साली प्रसिद्ध केली आहेत.[]

संदर्भ

  1. ^ "नेताजी सुभाषचंद्र बोस : द फरगॉटन हिरो (२००५)" (इंग्रजी भाषेत). ११ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ रूडॉल्फ हार्टोग. द साइन ऑफ द टायगर (इंग्लिश भाषेत). p. १०८.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ लेटर्स टू एमिली शेंकल १९३४-१९४२, एस.सी. बोस

बाह्य दुवे