Jump to content

एडविन अर्नोल्ड

सर एडविन ॲरनॉल्ड

सर एडविन अर्नाल्ड (१८३२-१९०४) हे एक इंगजी कवी आणि पत्रकार होते. त्यांचा जन्म इंग्लंडमधील वायव्य केंट प्रांतातील ग्रेव्हसेंड या थेम्स नदीच्या दक्षिण तटावर असलेल्या गावी झाला. १८५२साली, एडविन अर्नाल्ड यांना ऑक्सफर्ड विश्वविद्यालयातील विद्यार्थ्यासाठी उत्तम काव्यरचनेसाठी सर रॉजर न्यू्डिगेट यांच्या नावाने ठेवलेले ’न्यूडिगेट’ पारितोषिक मिळाले होते.

सर एडविन अर्नाल्ड यांनी बर्मिंग‍हॅम शहरातील किंग एडवर्ड स्कूलमध्ये काही काळ अध्यापन केले, आणि मग ते भारतात आले. पुण्याच्या डेक्कन कॉलेजचे ते १८५६मध्ये प्राचार्य झाले. इंग्लंडमध्ये परतल्यावर त्यांनी ’डेली टेलिग्राफ’ या वृत्तपत्रात नोकरी केली. १८६३मध्ये ते त्या वर्तमानपत्राचे संपादक झाले. आपल्या पूर्वेकडे घालविलेल्या जीवनाच्या अनुभवांवर त्यांनी अनेक कविता लिहिल्या.

गौतम बुद्धाचे जीवन आणि बौद्ध धर्म यांवर सर एडविन अर्नाल्ड यांनी १८७९साली लिहिलेले ’दि लाइट ऑफ एशिया’ हे काव्य खूप गाजले. या काव्याचे ’आर्यप्रदीप’ या नावाचे काव्यमय भाषांतर मराठी कवी गंगाधर रामचंद्र मोगरे यांनी केले आहे. याच काव्यावर हिमांशु रॉय यांनी १९२५साली ’प्रेम संन्यास’ नावाचा मूकपट काढला होता. या दुर्मीळ चित्रपटाचे पुनःप्रदर्शन एप्रिल-मे २०१३ या काळात भारतात झालेल्या ’भारतीय सिनेमाच्या शताब्दी’निमित्ताने दिल्लीत झाले. चित्रपट बघताना, जुन्या काळचा प्रत्यक्ष अनुभव यावा यासाठी ’गुलशन महाल’ नावाचा एक तात्पुरता तंबू कार्यक्रमाच्या स्थळी उभारला होता. त्या तंबूत हा मूकपट दाखविला गेला.