Jump to content

एक्सप्लोरिंग मॅस्क्युलीनिटी (पुस्तक)

एक्सप्लोरिंग मॅस्क्युलीनिटी[] हे पुस्तक कमला भसीन[] द्वारे लिखित असून विमेन अनलिमिटेड द्वारे २००४ मध्ये प्रकाशित केले गेले.

प्रस्तावना

या पुस्तिकेत पुरुषत्व या संकल्पनेचे अर्थ व त्याचे लिंगभावात्मक संबंधांसाठी, सामाजिक तसेच राजकीय व आर्थिक व्यवस्थेसाठी व धार्मिक व कौटुंबिक विचारधारेसाठी असणारे महत्त्व उलगडलेले आहे. येथे लेखिका वर्चस्ववादी पितृसत्ता, लष्करी पितृसत्ता, कामगार व अभिजनवर्गातील पितृसत्तेवर भाष्य करतात. पौरुषत्ववाद व लष्करीकरण; जातीयवाद, मूलतत्त्ववाद व पौरुषत्ववाद तसेच भांडवलशाही व पौरुषत्ववादामधील संबंधांचे परीक्षण करतात. नकारात्मक पौरुषत्व व स्त्रीत्वाचे, स्त्रीपुरुषांवरील होणारे परिणाम त्या अधोरेखित करतात. लिंगभाव संबंध सुधारण्यासाठी पर्याय ही त्या येथे सुचवतात.[]

पुस्तकातील मजकूर

ही पुस्तिका प्रश्न उत्तराच्या स्वरूपात लिहिलेली आहे. येथे विविध मुलभूत व्याख्या व संबंधित मुद्यांवर चर्चा केलेली आहे.

पुरुषी व पुरुषत्वाची-व्याख्या

येथे लेखिका विविध शब्दकोश, थेसोरसच्या मदतीने पुरुषी व पुरुषत्व या संकल्पनांची व्याख्या मांडतात. ऑक्सफोर्ड या शब्दकोशाप्रमाणे पारंपारिकरित्या पुरुषांशी जोडली गेलेली गुण वैशिष्ट्यांना पुरुषी असे म्हणतात तर पुरुषत्व याचा संबंध जैविकतेशी नसून ठराविक वैशिष्ट्ये व गुणांशी आहे. कोलीन या थेसोरस मध्ये पुरुष, खंबीर, पुरुषासारखा, निर्भीड, ताकतवान, गरम रक्ताचा, मर्दानी, धाडसी, आक्रमक, शूर, कणखर, दृढनिश्चयी हे शब्द पुरुषी यासाठी प्रतिशब्द म्हणून आढळतात. पुरुषत्व याअर्थी समाजाद्वारे पुरुषांना व मुलांना दिलेली एक सामाजिक व्याख्या आहे व समाजाने घडवलेली रचना आहे. स्त्री व पुरुषांपैकी ज्यांच्या मध्ये समाजाने ठरवलेले स्त्रियांचे गुण वैशिष्ट्य आढळतात, त्यांना स्त्रीसुलभ व पुरुषी गुण आढळल्यास पुरुषी असे मानण्यात येते. याचबरोबर त्या असे ही मत मांडतात कि पुरुषत्वाची संकल्पना स्थान व काळानुरूप बदलत असते. पुरुषत्वाची संकल्पना ही काळ व समुदायानुसार बदलत असली तरी ती सर्वठिकाणी सामर्थ्य, सत्ता, नियंत्रण व आक्रमकपानाशी संबंधित आहे. पुरुष व पुरुषत्व हे स्त्री व स्त्रीत्वापेक्षा वरिष्ठ आहे असे पितृसत्ताक विचारधारेची धारणा आहे.

लिंगभाव- व्याख्या

लिंगभाव ही मुला-मुलींना, स्त्री पुरुषांना समाजाने दिलेली सामाजिक सांस्कृतिक परिभाषा आहे. लिंगभाव हे एक सामाजिक रचना असून स्त्री/पुरुष, मुलगी/ मुलगा यांच्यावरील नियम, मुल्य, रूढी व व्यवहाराशी संबंधित असून त्याद्वारे जैविक भिन्नतांना व्यापक अशा सामाजिक व्यवस्थेत रूपांतरीत करतो.

लिंगभाव संबंध- व्याख्या

स्त्री व पुरुष, स्त्री व स्त्री, पुरुष व पुरुष यांच्या मधील लिंगभाव आधारित संबंधाना लिंगभाव संबंध असे म्हणतात. पुरुषसत्ताक विचारधारा व व्यवस्थेमुळे सर्वत्र लिंगभाव संबंध हे असमान व उतरंडीचे आहेत. स्त्रियांना सर्व ठिकाणी दुय्यम समजले जाते त्या भेदभावाला बळी पडतात.

पितृसत्ता – व्याख्या

पितृसत्ता ही अशी एक सामाजिक व वैचारिक व्यवस्था आहे ज्यामध्ये पुरुषांना स्त्रियांपेक्षा वरचढ समजले जाते व साधनांवर व निर्णय प्रक्रियेवर पुरुषांचे नियंत्रण असते. ती एक सामाजिक रचित असून त्याचे स्वरूप, मजकूर व विस्तार हे वेगवेगळ्या संदर्भात व काळात बदलणारे असतात. सर्व सामाजिक संरचनांप्रमाणे पितृसत्तेलाही एक विचारधारा व रचना आहे. सदरची संरचना हे निश्चित करते कि कुटुंब प्रमुख हे पुरुष असतील व कुटुंबाच्या मालमत्तेचे व नावाचे वारसदार पुरुष असतील. पण एकंदरीत सर्व सामाजिक संस्था या पुरुषसत्ताक आहेत.

पौरुषत्व व जैविकता याचा संबंध

पौरुषत्व याचा जैविकतेशी काहीही संबंध नसून पौरुषत्व व स्त्रीत्व हे सामाजिक रचना आहे. पुरुषांची जैविकता किंवा जैव-रसायनशास्त्र हे त्यांना वर्चस्ववादी, आक्रमक किंवा स्पर्धात्मक बनवत नाहीत. पौरुषत्व व स्त्रीत्व यांचा संबंध सत्तेशी असून जैविकतेशी नाही.

अधिसात्तक पुरुषत्व –व्याख्या

अधिसत्तेचा अर्थ वर्चस्व किंवा सर्वसमावेशक नेतृत्व असे आहे. त्याअर्थी अधिसात्तक पुरुषत्वाचा अर्थ वरचढ होणारे पुरुषत्व असा होतो. या प्रकारचे पुरुषत्व हे सत्ता व इतरांवर सत्ता गाजवण्याशी संबंधित आहे व ती शरणागतीची मागणी करते.

पुरुषत्व व हिंसा

पितृसत्ताक समाजात पुरुषांनी केलेल्या हिंसेच समर्थन केले जाते कारण अधिकार, नियंत्रण, सत्ता व नेतृत्व हे पुरुषत्वाच्या खुणा आहेत. पुरुषांना समाज दाता व संरक्षक म्हणून बघतो. या भूमिका बजावण्यासाठी पुरुष घरातील व समाजातील इतर सभासदांना शिस्त लावणे ही आपली जबाबदारी मानतो. शिस्त लावण्यासाठी व इतर प्रश्न सोडवण्यासाठी पुरुष हे हिंसेचा वापर एक साधन म्हणून करतात.

पुरुषत्व व धर्म

लिंगभाव, पुरुषत्व व धर्म यांचा स्पष्ट संबंध आहे. संस्कृतीच्या पातळीवर सर्वसामान्य लोकांची कुटुंब, लग्न, लैंगिकता, याबाबतीतील समजुती घडवण्यात, स्त्री व पुरुषांच्या भूमिका व व्यवहारासंदर्भात नियम ठरवून देण्यात, नवरा व बायकोचे तसेच मुलगी व मुलगा यांचे स्थान ठरवण्यात, त्यांचे हक्क व जबाबदाऱ्या ठरवण्यात धर्म महत्त्वाची भूमिका बजावतो. सद्यकालीन सर्व धर्म हे स्त्रियांना पुरुषांपेक्षा दुय्यम ठरवतात.

पुरुषत्व व लैंगिकता

स्त्री व पुरुषांची लैंगिकता व लैंगिक व्यवहार वेगवेगळ्या प्रकारे मांडण्यात आलेले आहेत. पुरुष हे लैंगिक संबंधांबाबत पुढाकार घेणारे मानले जातात. पुरुषांच्या लैंगिक गरजा, आवडी व नावडी व त्यांच्या समाधानाला महत्त्व दिले जाते. तर स्त्रियांना लैंगिक संबंधाबाबत दुय्यम, निष्क्रिय सहभागी व पुरुषांची गरज व लालसा भागवणारी असे मानले जाते. पुरुषांची लैंगिकता, आक्रमकपणा व हिंसा यांचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे.

पुरुषत्व व गुन्हे

पुरुषत्व व गुन्हे यांचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे. पुरुषत्वाची धारणा पुरुषांना व मुलांना सशक्त, शारीरिक दृष्ट्या सक्षम, आक्रमक, वर्चस्ववादी होण्यास प्रेरणा देते. ऐन ओकले मांडतात कि गुन्हेगारी व पुरुषत्व या दोघांशी संबंधित क्रिया या बऱ्याच प्रमाणात सारख्या आहेत.

पुरुषत्व व लष्करीकरण

पुरुषत्व व लष्करीकरणाचा जवळचा जुना संबंध आहे. लष्करीकरण ही विचारधारा प्रश्न सोडवण्यासाठी लष्कराची भूमिका मान्य करते व सामाजिक व वैयक्तिक उद्देश साध्य कार्यासाठी हिंसेला मान्यता देते ज्यामुळे आक्रमक पुरुषत्वाला समर्थन मिळते. लष्करीकरण, पितृसत्ता व पौरुषत्व हे एकमेकांशी गुंतलेले असून परस्पर पोषक ठरतात. स्त्रीवाद्यांच्या मते लष्करी विचार व मुल्य हे मूलतः पुरुषी असून स्त्रियांवर पुरुषांचे वर्चस्व असणे यावर विश्वास ठेवते. स्त्रीवादी विश्लेषकांनी हे दाखवून दिलेले आहे कि स्त्रिया पण लष्करी विचाराचा एक भाग होतात. ‘आदर्श सैनिक’ व ‘आदर्श पत्नी’ हे परस्पर पूरक आहेत. युद्धासाठी पुरुष नेतृत्व जन्म देणे हे मातांची देशाप्रतीची जबाबदारी मानली जाते.

सद्यकालीन आर्थिक व्यवस्था, पुरुषी व पुरुषत्व

सद्यकालीन आर्थिक व्यवस्था स्पर्धा, महत्त्वाकांक्षा व यशाचे समर्थन करते व त्याला प्रोत्साहन देते. त्यामुळे भांडवलशाहीतील मूल्य व्यवस्था व पुरुषत्व हे एकमेकांना पूरक दिसते. भांडवलशाही जगात स्पर्धा, व्यक्तिवाद, आक्रमकपणा, आत्म-केंद्रितता. स्वार्थीपणा सक्षमता व विजय याला महत्त्व देते व सहकार्याला परावृत्त करते. या अर्थव्यवस्थेत जैविक पुरुषापेक्षा अधिसात्तक/वर्चस्ववादी पुरुषत्वाला अधिक महत्त्व आहे. जे पुरुष सत्ता मिळवू शकतात व स्वतःच्या प्रगतीसाठी वापरू शकतात त्यांना जास्त महत्त्व मिळालेले आहे. जागतिकीकरणाच्या जगात, पुरुषत्व हे जागतिक बनत चाललं आहे. कोर्पोरेट संस्कृती ही पुरुषांद्वारे व्यापलेली व पुरुषी आहे. यासर्व प्रक्रियेत स्त्रिया या परीघाबाहेर फेकल्या जातात कारण त्यांच्यामध्ये अपेक्षित गुण व भांडवलशाहीत अपेक्षीत गुणांचा मेळ बसत नाही.

संदर्भ सूची

  1. ^ Bhasin, Kamla (2004). Exploring Masculinity (इंग्रजी भाषेत). Women Unlimited. ISBN 9788188965007.
  2. ^ "Kamla Bhasin / SANGAT South Asian Feminist Network - South Asia - One Billion Rising Revolution". One Billion Rising Revolution (इंग्रजी भाषेत). 2013-07-22. 2018-12-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-23 रोजी पाहिले.
  3. ^ "Exploring masculinity | sangatsouthasia.org". www.sangatnetwork.org (इंग्रजी भाषेत). 2018-06-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-23 रोजी पाहिले.