Jump to content

उषवदत्ताचा नाशिक शिलालेख

उषवदत्ताचा नाशिकचा शिलालेख हा पश्चिम क्षत्रप शासक नहपानाचा जावई उषवदत्त याने सुमारे इ.स. १२० च्या सुमारास नाशिक लेण्यांमध्ये तयार केलेला शिलालेख आहे . हे जरी संमिश्रीत भाषिक स्वरूपात असले तरी पश्चिम भारतातील संस्कृत च्या वापराचे सगळ्यात जुने उदाहरण आहे. हा शिलालेख ब्राह्मण, बौद्ध यांना दान देण्याची भारतीय परंपरा आणि यात्रेकरू व सामान्य जनतेची सेवा करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे द्वितीय शतकापर्यंतचे दस्तऐवजीकरण देखील करतो.

उषवदत्तचा नाशिक शिलालेख
पदार्थ पाषाण
लेखन संमिश्र संस्कृत
कालखंड/संस्कृती पाश्चात्य क्षत्रप
स्थानत्रिरश्मी लेणी,
नाशिक, महाराष्ट्र, भारत.

वैशिष्ट्य

हा शिलालेख नाशिक लेण्यांचा "शिलालेख क्रमांक १०" म्हणून वर्गीकृत आहे. हा नहपान विहार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लेणी क्र. १० च्या समोरच्या ओसरीवर स्थित आहे. त्याची लांबी अनेक मीटर आहे.

संमिश्र संस्कृतचा वापर

लेण्यांमध्ये नहपानाच्या घराण्यातील एकंदरीत सहा शिलालेख आहेत, परंतु उषवदत्तचा शिलालेख हा विशेषतः महत्वाचा आहे कारण तो संस्कृतच्या वापराचे पश्चिम भारतातील सर्वात जुने उदाहरण आहे. पाश्चात्य क्षत्रपांनी केलेले इतर बहुतेक शिलालेख ब्राह्मी लिपी वापरून प्राकृत भाषेत होते.

जरी प्राकृत ही संस्कृत भाषेची वंशज मानली जात असली तरी "भारताचा महान भाषिक विरोधाभास" म्हणून ज्याचे वर्णन केले गेले आहे, त्यात संस्कृत शिलालेख प्राकृत शिलालेखांपेक्षा खूप नंतर आलेत. याचे कारण असे की, अशोकाच्या प्रभावशाली आज्ञापत्रांच्या काळापासून (सुमारे 250 ईसापूर्व) प्राकृत अनेक प्रकारे वापरात होती. इ.स.पूर्व प्रथम शतकातील काही उदाहरणांव्यतिरिक्त, बहुतेक संस्कृत शिलालेख हे एकतर मथुरेच्या आसपासच्या उत्तरी क्षत्रपांच्या सर्वात आधीच्या लोकांसाठी किंवा थोड्या नंतर, पश्चिम आणि मध्य भारतातील त्यांच्याशी संबंधित पाश्चात्य क्षत्रपांसाठीचे हिंद-शक शासकांच्या काळातील शिलालेख आहेत. असे मानले जाते की हे हिंद-शक राज्यकर्ते भारतीय संसकृतीशी आस्था वा आसक्ती दर्शवण्यासाठी संस्कृतचे प्रवर्तक बनले. सॉलोमनच्या मते, "संस्कृतचा प्रचार करण्याची त्यांची प्रेरणा कदाचित स्वतःला कायदेशीर भारतीय म्हणून स्थापित करण्याची इच्छा होती किंवा किमान भारतीय राज्यकर्ते आणि सुशिक्षित ब्राह्मणवादी अभिजात वर्गाची मर्जी राखण्यासाठी होती."

पश्चिम भारतात, संस्कृतमधील पहिला ज्ञात शिलालेख नाशिक लेण्यांमधील लेणी क्र. १० च्या समोर, पश्चिम क्षत्रप शासक नहपानाचा जावई उषवदत्त याने बनवला होता असे दिसते. शिलालेख द्वितीय शतकाच्या पूर्वार्धातील आहे आणि त्यात संमिश्र वैशिष्ट्ये आहेत. त्यापाठोपाठ जुनागड शिलालेख होता, जो रुद्रदामन प्रथमने सुमारे इ.स. १५० मध्ये कोरला होता. तो पूर्णतः कमी-अधिक प्रमाण संस्कृतमध्ये नोंदवलेला पहिला लांब शिलालेख आहे. पाश्चात्य क्षत्रपांचे संस्कृत शिलालेख रुद्रदामनच्या कारकिर्दीनंतर सुमारे दोनशे वर्षे सापडले नाहीत, परंतु ते महत्त्वाचे आहे कारण त्यांची शैली गुप्त साम्राज्याच्या काळातील स्तवन-शैलीचा नमुना आहे. हे सर्व शिलालेख ब्राह्मी लिपीतील आहेत.

लेणीचे बौद्धाना समर्पण

नाशिक लेणी क्रमांक १० मधील नहपानचा शिलालेख क्रमांक १०

शिलालेखावरून असे दिसून येते की क्षत्रप नहपानाचा जावई आणि दिनिकाचा मुलगा- उषवदत्त याने बौद्ध भिक्षूंसाठी लेणी क्रमांक १० बांधली आणि या लेणीसाठी तसेच भिक्षूंच्या अन्न आणि वस्त्रासाठी ३००० सोन्याची नाणी दान केली.

"यशस्वी! दिनिकाचा मुलगा व क्षहरात क्षत्रप राजा नहपानाचा जावई उषवदत्त, (...) गोवर्धनाच्या त्रिरश्मी टेकडीवर (खर्‍या) धर्माने प्रेरित होऊन ही लेणी बनवण्यास कारणीभूत ठरले.

—  उषवदत्तच्या शिलालेख क्रमांक १० चा भाग, लेणी क्रमांक १०, नाशिक

लेणी बौद्ध संघाला अर्पण केल्याचा उल्लेख त्याच लेणीतील दुसऱ्या शिलालेखात आहे, शिलालेख क्रमांक १२:

"यशस्वी! इ.स. 42 मध्ये, वैशाख महिन्यात, दिनिकचा मुलगा व क्षहरात क्षत्रप राजा नहपानाचा जावई उषवदत्त याने साधारणपणे ही लेणी संघाला बहाल केली .... "

—  उषवदाताच्या शिलालेख क्रमांक १२, लेणी क्रमांक १०, नाशिक

शिलालेखाचा पूर्ण मजकूर

'नहपानाचे जावई उषवदत्त यांचा शिलालेख,
नाशिक लेणी क्र. १०, शिलालेख क्र. १०

ब्राह्मी लिपीत संमिश्र संस्कृत मध्ये लिहीलेला शिलालेख क्रमांक १० चा संपूर्ण मजकूर:

"यशस्वी! दिनिकाचा मुलगा, क्षहरात क्षत्रप राजा नहपानाचा जावई उषवदत्त याने तीन लाख गायी दान दिल्या; बार्णासा नदीच्या काठी सुवर्णदान केले व घाट बांधला; देव व ब्राह्मणांना सोळा गावे दान दिली; व प्रतिवर्ष लक्ष ब्राह्मणांना भोजन घालत आलेला आहे; प्रभास या पवित्र तीर्थी ब्राह्मणांचे आठ भार्यांशी विवाह लावून दिलेले आहेत; भरुकच्छ, दशपुर, गोवर्धन व शूर्पारक येथे चौसोपी घरे निवासाकरिता दान दिली; उद्याने, तलाव व विहिरी निर्माण केल्या; इबा, पारदा, दमण, तापी, करबेणा आणि दाहनुका या नद्या पार करण्याकरिता धर्मार्थ तरींची सोय केली; या नद्यांच्या दोन्ही काठांवर धर्मशाळा बांधल्या व पाणपोया घातल्या आणि पिंडीतकावड, गोवर्धन, सुवर्णमुख, शोर्पारग आणि रामतीर्थ येथे संन्याशांना (भिक्षुसंघांना) नानंगोल गावातील बत्तीस हजार नारळीची झाडे दान दिली. भट्टारकाच्या (नहपान) आज्ञेवरून मी वर्षाऋतूमध्ये मालयांनी वेढा घातलेल्या उत्तमभद्रांना सोडविण्याकरिता चालून गेलो. माझ्या स्वारीच्या निर्घोषाने ते मालय पळू लागले; तेव्हा त्यांना पकडून मी त्यांना उत्तमभद्र क्षत्रियांच्या ताब्यात दिले. नंतर मी पुष्कर क्षेत्री जाऊन स्नान केले आणि तीन सहस्र गायींचे आणि एका गावाचे दान दिले. वाराहीपुत्र अश्विभूती या ब्राह्मणाकडून त्याच्या पित्याच्या मालकीचे गोवर्धन नगराच्या ईशान्य दिशेस असलेले एक शेत चार हजार कार्षापण नाणी देऊन विकत घेतले आणि ते आपल्या लेण्यात राहणाऱ्या चारी दिशांच्या भिक्षूंच्या मुख्य आहाराकरिता दान दिले."

—  उषवदत्ताचा शिलालेख, नाशिक लेणी क्र.10, शिलालेख क्र.10.

बाहेरील दुवा

नहपानाचा कोरीव लेख