उपयुक्ततावाद
भांडवलवादाच्या नंतरच्या अवस्थेत – ज्या अवस्थेत तो सर्वाधिक शोषक बनला त्या अवस्थेत – उपयुक्ततावाद प्रकटला. जेरेमी बेंथमने उपयुक्ततावादाची व्यवस्थीशीर मांडणी केल्याने त्याला ‘उपयुक्ततावादाचा जनक’ असे संबोधले जाते. बेंथमपूर्व काळातील हॉब्ज, लॉक, डेविड ह्यूम यांच्या लिखाणात उपयुक्ततावादाची बीजे आढळतात.
मूलतत्त्वे
- आनंद वाढविणारी आणि वेदना कमी करणारी कोणतीही गोष्ट ‘उपयुक्त’ असते. राज्यसंस्थेच्या कृत्यांची चिकित्सा करण्यासाठी उपयुक्तता हा एकमेव निकष लावला पाहिजे. उदारमतवादात मुक्ततेची जागा उपयुक्ततेने घेतली.
- महत्तमांचे महत्तम सुख – हे एक उदारमतवादी तत्त्व आहे. वेगवेगळ्या व्यक्तींच्या सुखाची एकत्रित बेरीज त्यात अभिप्रेत आहे. अनेकांच्या शोषणासोबत काहींना मिळणाऱ्या सुखाचा पाठपुरावा हे तत्त्व करीत असल्याने समाजवाद्यांनी त्याला विरोध केला. मात्र स्वातंत्र्य, न्याय यांसारख्या अमूर्त कल्पनांपेक्षा सुख आणि वेदना अशी साधी मानके उपलब्ध करून देण्याचे काम उपयुक्ततावादाने केले.
- सुखगणन (हिडॉनिस्टिक कॅल्क्युलस) – बेंथमच्या म्हणण्यानुसार गुणात्मक दृष्ट्या सगळी सुखे सारखीच असतात. संख्येच्या दृष्टीने मात्र त्यांच्यात भेद उत्पन्न होऊ शकतो. कार्लाईलने बेंथमच्या या भूमिकेची ‘डुकार तत्त्वज्ञान’ अशी संभावना केली आहे.