Jump to content

उद्धव शेळके

उद्धव शेळके
राष्ट्रीयत्व भारतीय

उद्धव ज. शेळके ( ८ आक्टोंबर १९३०; मृत्यू: ३ एप्रील १९९२)[] हे मराठी भाषेतील कादंबरीकार आहेत. त्यांची धग ही कादंबरी विशेष गाजली होती.

उद्धव ज. शेळके हे अमरावती जिल्ह्यातील आहेत. त्यांनी लिहिलेली 'धग' ही कादंबरी ग्रामीण पार्श्वभूमीवरील असून इ.स. १९९० च्या दशकात या कादंबरीचे नागपूर आकाशवाणी केंद्राच्या प्रसारणातून क्रमशः वाचन केले गेले. वारांगनांच्या जीवनावरील "डाळिंबाचे दाणे' ही त्यांची कादंबरीही प्रसिद्ध आहे.[] या कादंबरीत वैदर्भीय बोली भाषा आली आहे.

लेखन

इ.स. १९५० च्या दरम्यान शेळक्यांनी कथालेखनाला प्रारंभ केला. 'शिळान' हा त्यांचा पहिला कथासंग्रह त्यात त्यांनी केलेल्या वैदर्भीय ग्रामीण जीवनाच्या सूक्ष्म चित्रणामुळे व बोलीच्या वापरामुळे हा कथासंग्रह लक्षणीय ठरला. 'धग'च्या यशानंतर उद्धव शेळके यांनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या. 'धुंदी', 'पुरुष', 'नांदतं घर', 'कोवळीक', 'गोल्डन व्हिला', 'नर्तकीचा नाद', 'पूर्ती', 'डाग', 'डाळिंबाचे दाणे', 'बाईविना बुवा', 'निर्माता', 'महामार्ग' अशा अनेक कादंबऱ्याचे लेखन त्यांनी केले.[]

संदर्भ

  1. ^ Anand Patil (2002). Uddhav Shelke. New Delhi: Sahitya Akademi. p. 12. ISBN 978-81-260-1458-3.
  2. ^ [१], दै. सकाळ मध्ये प्रसिद्ध लेख. दि. 17 ऑगस्ट 2013
  3. ^ "उद्धव शेळके". 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले.

४. उद्धव शेळके यांची राष्ट्रसंतांचा जीवनालेख रेखाटणारी कादंबरी -'खंजिरीचे बोल '-डॉ.रेखा वडिखाये

वऱ्हाड प्रांतातील 'धग 'कार उद्धव शेळके हे मराठीतील वैदर्भीय श्रेष्ठ कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत.वऱ्हाडातील जनसामान्यांचा जीवनानुभव वऱ्हाडी बोलीत त्यांनी आपल्या समर्थ लेखणीने गोचर केला त्यामुळे ग्रामीण कथाकार आणि कादंबरीकार म्हणून त्यांना मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. अस्सल वऱ्हाडी माणूस,त्याच्या सुख -दुःखासकट त्यांनी वाचकापुढे उभा केला.इतकेच नव्हे तर वऱ्हाडातील संतांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेखही त्यांनी चरित्रात्मक कादंबरीच्या रूपाने रेखाटला आहे.अमरावती जिल्ह्यातील यावली येथे जन्माला आलेल्या,आसेतुहिमाचल ज्यांचे कार्य पसरले आहे अशा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या लौकिक आणि वाङ् मयीन कर्तृत्वाचा वेध त्यांनी 'खंजिरीचे बोल ' या कादंबरीत घेतला आहे.महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे सर्व आयाम या कादंबरीत दृष्टीपुढे येतात.वास्तव घटना आणि प्रसंगांना कादंबरीत महत्त्वाचे स्थान असल्याने काल्पनिकतेला फारसे स्थान नाही.अतिशय प्रभावी रीतीने स्वतः निवेदनाचा भार उचलत, द्वितीयपुरुषी निवेदन तंत्राद्वारे ग्रामजीवनातील तसेच राष्ट्रसंतांच्या जीवनातील वास्तव प्रसंग वऱ्हाडी बोलीतून ते मांडतात त्यावेळी त्यांच्या शैलीची एक अजब लकब वाचकाला स्तिमित करते आणि भाषेतला गोडवा जाणवत राहतो.त्याचप्रमाणे तत्कालीन समाजजीवनाचे संदर्भही उलगडत जातात.जसे त्याकाळी देवीच्या रोगाचे असलेले थैमान,त्याचे परिणाम,या रोगाच्या संबंधाने रूढ असलेली अंधश्रद्धा इत्यादींची कल्पना येते.माणिक म्हणजेच राष्ट्रसंत,त्यांना शाळेत असताना हा आजार होतो त्यामुळे ते परीक्षा पास होऊ शकत नाही.समाजामध्ये असलेली या रोगाविषयीची भीतीची भावना,त्यासंबंधीच्या रूढ प्रथा या संदर्भात शेळके सांगतात,"गावातून मातामायकडे गाणी म्हणत जाणारा बायकांचा कळप पहिला की,माणिक त्यांचा पिच्छा पुरवीत असे.बायका देवीजवळ येत. दगडाच्या फिक्कट पसाऱ्यावर दही-भाताचे बोणे वाहत.उदबत्त्या,कापूर लावीत.आल्या तश्या गाणी म्हणून निघून जात.त्यांच्या डोक्यावर तांबे,पाण्याच्या घागरी दिसत.त्यातली एखादी स्त्री ओल्या वस्त्रात असे."(खंजिरीचे बोल -पृ.क्र.३३)देवीच्या रोगाची लागण झाली की देवीला प्रसन्न करण्याचा हा प्रकार तत्कालीन समाजातच होता असे नाही तर तो आजही समाजात अस्तित्वात आहे.आजही अशा कितीतरी घातक रूढी,प्रथा,परंपरा समाजात खोलवर रुजलेल्या आहेत.अशा मानव, समाजआणि पर्यायाने राष्ट्राविकासाच्या आड येऊ पाहणाऱ्या बाबींवर राष्ट्रसंतांनी टीकास्त्र उपसले.त्यासाठी लेखन आणि समाजप्रबोधन केले.लोककल्याणासाठी ते आयुष्यभर झटले.महाराजांच्या विचारात कालच्याच नव्हे तर आजच्या आणि उद्याच्याही समाजाचा उद्धार करण्याचे सामर्थ्य आहे.त्यांचे द्रष्टेपण आणि समाजोद्धारक विचार समाजापर्यंत,मानवजातीपर्यंत पोहचावे व मानवजातीचे दुःख समूळ नष्ट होऊन आनंदाचे साम्राज्य निर्माण व्हावे या उदात्त हेतूने या कादंबरीचे लेखन उद्धव शेळके यांनी केले आहे.

(आधार ग्रंथ --- उद्धव शेळके -खंजिरीचे बोल -पाप्युलर प्रकाशन ,मुंबई ,२००७ )