उत्तरेश्वर मंदिर (तेर)
उत्तरेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथे असलेले एक लक्षणीय मंदिर आहे.[१] हे मंदिर उत्तरेच्या ईश्वराचे म्हणजेच शंकराचे आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून त्यात गर्भगृह आणि मंडपाचा समावेश आहे. मंदिर विटांनी बांधलेले असून त्याच्या दरवाजाची चौकट लाकडी होती. या लाकडी चौकटीच्या बुडाचा भाग नष्ट झालेला आहे. ही चौकट पुढे सुरक्षेच्या व जतनाच्या कारणास्तव तेर येथीलच रामलिंगअप्पा लामतुरे संग्रहालयात हलविली गेली. या चौकटीच्या द्वारशाखांवर भौमितिक नक्षीकाम, हंस, मिथुन, व्याल, स्त्री-पुरुषांच्या जोड्यांच्या माळा कोरलेल्या आहेत. चौकटीच्या मध्यभागी माथ्यावर विविध देवता, त्यांचे गण, सेवक दाखविलेले आहेत.
मंदिरशैली
उत्तरेश्वर मंदिराच्या गर्भगृहाच्या बाह्यांगावर दिसून येणारी वास्तुवैशिष्ट्ये, द्राविड शैलीतील कूटशिखरे, शालाशिखरे आणि त्यात व्याल घटकांच्या ऐवजी मकर घटकांचा केलेला वापर, मध्यभागी चैत्यगवाक्ष असलेल्या स्तूपिकेची वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि दरवाजाच्या लाकडी चौकटीवरील शिल्पांची शैली यावरून हे मंदिर इ.स. ५५०च्या सुमारास बांधले गेलेले आहे, असे समजते..
मंदिराची रचना
मंदिराच्या अधिष्ठानाच्या थरावर गर्भगृहाची भिंत असून या भिंतीवर ठरावीक अंतरावर द्राविड शैलीचे सडपातळ स्तंभ आढळतात. या स्तंभाच्या मधील जागेत चैत्यगवाक्षांची नक्षी असून त्यावरील कमानीच्या खालच्या भागात मकर दाखविलेले आहेत. भिंतीच्या वर त्रिमितीयुक्त थराचे छत असून त्यावर स्तूपिकेसारखा वास्तुघटक आहे. पंचरथ प्रकारच्या या गर्भगृहावर छताच्या दोन थरांत शालाशिखर व कूटशिखर हे वास्तुघटक आहेत. स्तुपिकेची बाह्यरेषा त्रिरथ प्रकारची असून वरचा भाग त्रिमितीयुक्त आहे.