उंदरगाव (माढा)
?उंदरगाव महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | माढा |
जिल्हा | सोलापूर जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
उंदरगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एक गाव आहे. उंदरगाव हे सीना नदीच्या तीरावर पश्चिमेला वसले आहे. माढा वैराग राज्यमार्गावर माढ्यापासून पूर्वेला साधारणपणे सात किलोमीटर तर माढा रेल्वे स्थानकपासून तीन किलोमीटर अंतरावर उंदरगाव आहे. संपूर्ण भारतात मदुराई नंतर मंदिराचे गाव म्हणून उंदरगाव प्रसिद्ध आहे. गावाच्या चोहूबाजूंनी असलेल्या हिरवळीमुळे गावाला उंदरगावचे सुंदरगाव असे नामाभिधान प्राप्त झाले आहे.[१]
भौगोलिक स्थान
हवामान
येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी 600 मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते. उंदरगाव हे ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध होते. येथील जमीन काळी असून कसदार आहे. या जमिनीत ज्वारीच्या इतर कडधान्य जसे की हरभरा, मूग, जवस, करडई, तूर मोठ्या प्रमाणात घेतली जात. अन्नधान्य मध्ये ज्वारी, गहू, मका घेतली जातात.परंतु जेव्हापासून उजनी धरणातून सीना माढा कालवा झाला तेव्हापासून गावातील पीक पद्धती पूर्णतःहा बदलून गेली आहे. गावातील शेतकरी सध्या ऊस आणि इतर नगदी पिके म्हणजे द्राक्ष घेत आहेत. द्राक्ष बागायतदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अनेक शेतकरी सांगली, मिरज, पंढरपूर, हैदराबाद, पुणे, मुंबई येथे द्राक्ष पाठवतात. काही शेतकरी बेदाणे करण्यासाठी पंढरपूर किंवा मिरज येथील वेर हाऊस मध्ये आपले द्राक्ष ठेवतात. नगदी पिकांच्या लागवडीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक प्रगती झालेली आहे.
लोकजीवन
येथील लोकांचा पारंपरिक व्यवसाय शेती आहे. त्याच बरोबर पशुपालन आणि त्यातून होणारा दुग्ध व्यवसाय ही गावात मोठ्याप्रमाणावर चालतो. गावाची ग्रामपंचायत 1952 साली स्थापन झाली असून गावात जिल्हा परिषद सोलापूरची प्राथमिक शाळा आहे. ह्या शाळेला आदर्श शाळा असा पुरस्कार मिळाला आहे. गावातील बहुतांश लोक वारकरी सांप्रदायतील आहेत. बरेचशे लोक नियमितपणे महिन्याला पंढरपूरची वारी करतात. गावात धर्मनिरपेक्ष आणि सर्वधर्मसमभावाचे वातावरण आहे. गावात साक्षरतेचे प्रमाण 97.89% आहे. श्रीराम नवमीला राम मंदिरात हरीनाम सप्ताह असतो. तसेच दत्त जयंतीला दत्त मंदिरात, तर दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मास अर्थात पुरुषोत्तम मासात महादेव मंदिरात हरीनाम सप्ताह पार पडतो. हनुमान जयंती दिवशी तेथे कीर्तन आयोजित केले जाते. विठ्ठल बिरूदेवाचा उत्सवही मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गणेश उत्सवात समाज प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित कारण्याची मोठी परंपरा आहे. प्रत्येक महिन्याचा चतुर्थीला गणपती मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते. पंधरा दिवसांच्या एकादशीला विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांची कायम रीघ लागलेली असते. विठ्ठल बिरूदेवाच्या यात्रेला पट्टणकोडोली जिल्हा कोल्हापूर येथे अनेक भाविक चैत्र महिन्यात जातात. गावात ग्रामदैवताची यात्रा आयोजित केली जाते. त्या दिवशी गावात कुस्त्या आयोजित करण्याची परंपरा आहे. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि राजामाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती-पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.
मुस्लिम समाजाची मस्जिद गावात आहे. मुस्लिम समाजाच्या सर्व सणासुदीत गावातील सर्वजण धार्मिक भेदभाव विसरून सहभागी होतात. गावामध्ये पारंपरिक तसेच आधुनिक खेळात सर्व मुले मोठ्या प्रमाणावर सहभागी होताना दिसतात. खोखो, कबड्डी, क्रिकेट, बॅडमिंटन, कुस्ती इत्यादी खेळांमध्ये गावातील सर्व विद्यार्थ्यांनी बऱ्यापैकी प्राविण्य मिळवले आहे. त्याचबरोबर आट्यापाट्या या पारंपरिक खेळाचा स्पर्धा गावात आयोजित करून एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जातो. उंदरगावातील लोक राजकीय दृष्ट्या अत्यंत सहज असून तालुक्यातील राजकारणावर येथील लोकांचा मोठा प्रभाव आहे.
प्रेक्षणीय स्थळे
तामिळनाडूच्या मदुराई या मंदिराच्या शहरानंतर सर्वात जास्त मंदिरे आपल्या देशात उंदरगावात आढळतात. पवनपुत्र बजरंगबली हनुमान, श्रीप्रभू रामचंद्र, दत्तगुरु, भोळा शंकर अर्थात महादेव, श्री गणेश, खंडेराया, अंबाबाई, विठ्ठल बिरूदेव, विठ्ठल रुक्मिणी, नरसिंह इ. मंदिरे प्रेक्षणीय आहेत. काही मंदिरे प्राचीन तर काही नवीन बांधली आहेत. कोल्हापूर पद्धतीचा बंधारा व गुंडेश्वर मंदिरं एक विलोभनीय ठिकाण आहे. बेंद नाल्याच्या किनारी एकविरा देवीचे एक सुंदर घडणीचे हेमाडपंथी मंदिर आहे. शेजारीच बेंद नाल्यावरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. सीना नदीचा विस्तीर्ण किनारा संध्याकाळी मनसोक्त फिरण्यासाठी एक अनोखी पर्वनीच घेऊन येतो.
नागरी सुविधा
गावामध्ये सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा असून ह्या शाखेला पंचक्रोशीतील उंदरगाव, वाकाव, जामगांव, चव्हाणवाडी आणि केवड या गावांचे व्यवहार जोडले आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सर्व योजनांचा लाभ संबंधित लाभार्थ्यांना याच बँकेतून मिळतो. तसेच गावात विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटी कार्यरत आहे. गावात पोस्ट ऑफिस असून उंदरगाव व केवड ही दोन गावे या अंतर्गत येतात. गावात जिल्हा परिषदेची आदर्श प्राथमिक शाळा असून विद्यार्थी संख्या अपेक्षेपेक्षा जास्त आहे. एका खाजगी शिक्षण संस्थेचे माध्यमिक विदयालय आणि उच्चमाध्यमिक विदयालय गावात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र गावात आहे. तेथील नर्स आणि आशा सेविका गावातील नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असतात. गावामध्ये खाजगी दवाखाना असून औषधे मिळण्यासाठी मेडिकल स्टोअर देखील आहे.
गावामधील झेरॉक्स सेंटरमध्ये इंटरनेटची सुविधा उपलब्ध असून यामध्ये पीक विमा, पीक कर्ज किंवा इतर आवश्यक सर्व फॉर्म्स भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
त्याचबरोबर शेतीसाठी आवश्यक असणारी खते, औषधे, औजारे गावात मिळतात. चारचाकी आणि दोनचाकी वाहनांचे दुरुस्ती केंद्रे गावात आहेत. माढा वैराग राज्य मार्ग गावातून जात असल्यामुळे रस्ता वाहूतिकीची समस्या नाही. तसेच तीन किलोमीटरवर माढा रेल्वे स्थानक आहे, तेथे काही निवडक लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस थांबतात तर पॅसेंजर नेहमी थांबते. येथून दक्षिण भारतात चेन्नई, केरळ, बंगलोर, हैद्राबाद, पूर्व भारत भुबनेश्वर येथे जाणाऱ्या गाड्या थांबतात. येथून मुंबई, दिल्ली येथे जाणाऱ्या काही निवडक गाडयांना थांबा दिला आहे. कोल्हापूरला जाणारी एक्सप्रेस सुद्धा येथे थांबते.
जवळपासची गावे
माढा (तालुका), केवड, वाकाव, जामगाव, कुंभेज, खैराव, दारफळ, निमगाव, सुलतानपूर, महातपूर, चव्हाणवाडी, विठ्ठलवाडी, लोंढेवाडी तुर्कपिंपरी
संदर्भ
- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate
- ^ https://www.incredibleindia.org/, https://www.incredibleindia.org/ (https://www.incredibleindia.org/). "https://www.incredibleindia.org/". https://www.incredibleindia.org/.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); External link in|website=, |title=
(सहाय्य)