Jump to content

उंडी


Starr 010309-0546 Calophyllum inophyllum
Callophyllum inophyllum

उंडी (इंग्रजीत Calophyllum inophyllum) हे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर समुद्रालगत आढळणारे एक अत्यंत सुंदर झाड आहे. त्याचे शास्त्रीय नाव - कॅलो फायलम इनो हे नावसुद्धा त्याच्या सौंदर्याचे गुणगान करते. 'कॅलो' म्हणजे सुंदर, 'फायलम' म्हणजे पाने, 'इनो' म्हणजे पानांवरील शिरा किंवा तंतू. या वृक्षाची पाने पोपटी आणि हिरव्या रंगाची असून ती रबराच्या पानांसारखी जाड असतात. पानांवरील शिरांच्या रचनेमुळे ती खूपच सुंदर दिसतात. क्लुझिअेसी कुळातील हा वृक्ष. कोकम, नागकेकेशराची झाडे सुद्धा याच कुळातील.

हा वृक्ष नक्की कोणत्या प्रदेशाचा या संदर्भात संभ्रम निर्माण करणाऱ्या नोंदी आढळतात. पूर्व आफ्रिकेचा सागरी किनारा, भारताचा पश्चिम किनारा, मलेशिया ते उत्तर ऑस्ट्रेलियाचा सागरी किनारा ही या वृक्षाची व्याप्ती. तरीसुद्धा हे झाड उत्तर ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावरचे आहे असे बऱ्याच नोंदीमध्ये आढळते. आपल्याकडे हा वृक्ष कोकण किनारा, केरळ, मद्रास ते ओरिसातील कटकच्या समुद्रालगत, अंदमान-निकोबार, पश्चिम बंगाल आणि अरुणाचलमध्ये सापडतो.

सदरहित असणारा हा वृक्ष २०-२५ फूट उंच वाढतो व पसरतो. फुले साधारण वर्षभर येतात, परंतु खरा बहर मात्र डिसेंबर ते जानेवारी महिन्यात येतो. इंचभराच्या पांढऱ्या रंगाच्या फुलांत असंख्य पिवळे पुंकेसर असतात. स्त्रीकेसर हा स्प्रिंगसारख्या आकाराचा असून पुंकेसरापेक्षा जास्त लांब असून त्याचे टोक हे लालसर व छोटाशा भूछत्रासारखे दिसते.

या झाडाचे बीजप्रसारण वटवाघळांमार्फत, तसेच समुद्राच्या पाण्याच्या मदतीने होते. बिया समुद्राजवळील वाळूत आणि चिखलात वेगाने रुजतात. झाड समुद्रापासून दूरही वाढू शकते, परंतु ती वाढ मात्र वेगाने होत नाही. झाडाच्या खोडातून अथवा पान तोडल्यास देठातून पिवळसर रंगाचा चीक निघतो.

उंडीच्या फळांपासून आणि बियांपासून तेल काढतात. वेगवेगळ्या प्रदेशात या तेलाला वेगवेगळे नाव आहे, तसेच त्याचे उपयोगही वेगवेगळे आहेत.

प्रशांत महासागरातील बेटांवर या तेलाचा उपयोग त्वचा रोगांवर होतो. कुष्ठरोग्यांवरसुद्धा या तेलाचा यशस्वी उपयोग करण्यात आला आहे. आपल्याकडे कोकणामध्ये या तेलाचा उपयोग संधिवातावर करतात. वंगणा तेल म्हणूनही वापर केला जातो. तेलाला मंद सुवास येत असल्यामुळे ॲरोमा थेरपीमध्ये याचा वापर होतो.

संदर्भ

वृक्षराजी मुंबईची डॉ.मुग्धा कर्णिक [१][permanent dead link]