Jump to content

इल्या रेपिन

इल्या रेपिन

रेपिनने काढलेले आत्मव्यक्तिचित्र (१८७८)
पूर्ण नावइल्या एफिमोविच रेपिन
जन्मऑगस्ट ५, १८४४
चुगुएव्ह, युक्रेन
मृत्यूसप्टेंबर २९, १९३०
कुओक्काला, फिनलंड
राष्ट्रीयत्वरशियन
कार्यक्षेत्रचित्रकला

इल्या रेपिन (रशियन: Илья́ Ефи́мович Ре́пин) (जीवनकाल:ऑगस्ट ५, १८४४:चुगुएव्ह, युक्रेन - सप्टेंबर २९, १९३०) हा नामवंत रशियन चित्रकार होता. रेपिनची चित्रे वास्तववादी ढंगातील असून त्यात तत्कालीन रशियन समाजव्यवस्थेचे, घडामोडींचे चित्रण दिसते.

जीवन

इल्या रेपिनचा जन्म ऑगस्ट ५, १८४४ रोजी स्लोबोदा युक्रेन परिसरातील खार्कोव्ह शहरानजीक 'चुगुएव्ह' नावाच्या गावात झाला. तरुणवयात रेपिनने 'बुनाकोव्ह' नावाच्या स्थानिक चित्रकाराकडे उमेदवारी करत चित्रकलेचा, विशेषकरून व्यक्तिचित्रणाचा अभ्यास केला. १८६६ मध्ये तो सेंट पीटर्सबर्गला गेला व त्याला तेथील 'इंपिरियल अकॅडमी ऑफ आर्ट्स' या सुविख्यात कलाशिक्षणसंस्थेत प्रवेश मिळाला. १८७३ - १८७६ या कालखंडात संस्थेने दिलेल्या भत्त्यावर त्याने इटली, पॅरिस या ठिकाणांचा अभ्यासदौरा केला. पॅरिसमध्ये असताना तिथे नव्याने सुरू झालेल्या दृक्‌ प्रत्ययवादी चित्रशैलीशी('इंप्रेशनिझम'शी) त्याची ओळख झाली. दृक्‌ प्रत्ययवादी चित्रशैलीतील प्रकाशाच्या चित्रणाचा प्रभाव पडला तरीही रेपिनची शैली मात्र युरोपातील वास्तववादी चित्रपरंपरेशी नाते सांगणारीच राहिली. आपल्या चित्रांमधून रेपिनने सर्वसामान्य माणसांच्या - विशेषत्वाने ग्रामीण लोकांच्या - भावनांचे, क्रिया-प्रतिक्रियांचे चित्रण केले. याखेरीज उत्तरायुष्यात त्याने रंगविलेली रशियन विद्वज्जनांची, अधिकाऱ्यांची, रशियन राजघराण्यातील व्यक्तींची चित्रेही उपलब्ध आहेत. मूलद्रव्यांची पहिली आवर्त सारणी तयार करणारा रशियन रसायनशास्त्रज्ञ दिमित्री मेंडेलीव याचेही चित्र इल्या रेपिनने चितारलेले आहे.

पेरेद्विझ्निकी असोसिएशन

व्होल्गा नदीतीरावरील होड्या ओढणारे बुरलाक(मजूर) (किंवा 'व्होल्गा बार्ज हाउलर्स') (१८७०-७३).

रेपिन जेव्हा सेंट पीटर्सबर्गमध्ये गेला, त्यासुमारास तेथील सरकारी चित्रकला अकादमीतील रूढिप्रिय पद्धतीशी फारकत घेऊन काही चित्रकारांनी 'पेरेद्विझ्निकी कलाकारांची असोसिएशन' सुरू केली होती. १८७८ मध्ये रेपिनही त्यात सामील झाला. सरधोपट मार्गापलीकडे जाऊन अभिव्यक्ती साकारू पाहणाऱ्या रेपिनला त्याच्या 'व्होल्गा बार्ज हाउलर्स' या काबाडकष्ट करणाऱ्या रशियन मजुरांवरील चित्रामुळे प्रतिष्ठा मिळू लागली. परदेश दौरे आणि युक्रेनमधील आपल्या गावी अधूनमधून भेट देण्याव्यक्तिरिक्त १८८२ पासून सेंट पीटर्सबर्गमध्येच रेपिनचे वास्तव्य राहिले.

संदर्भ

बाह्य दुवे