इन्स्क्रिप्ट
इन्स्क्रिप्ट हा संगणकावर भारतीय लिप्यांत टंकलेखन करण्यासाठी वापरण्यात येणारा कळपाटाचा/ कळफलकाचा प्रमाणित आराखडा आहे. हा आराखडा कोणत्याही क्वेर्टी (QWERTY) कळपाटावर वापरता येतो. हा आराखडा बाराखडीच्या तत्त्वावर आधारलेला असून तो ब्राह्मी लिपीपासून निर्माण झालेल्या विविध भारतीय लिप्यांसाठी सामाईकरीत्या वापरता येतो. सदर आराखड्याला भारतीय मानक ब्यूरो ह्या संस्थेची मान्यता आहे.
इन्स्क्रिप्ट आराखड्याची रचना
कानपूरच्या भारतीय तंत्रज्ञान-संस्थेत (आय. आय. टी.त), काम करीत असलेल्या तंत्रज्ञांनी भारतीय लिप्यांचा संगणकावर वापर करण्यासाठीचे तंत्रज्ञान विकसित करण्याबाबत प्रयत्न चालवले होते.[१] भारत सरकारच्या, इलेक्ट्रॉनिक्स विभागाने १९८३ मध्ये तिथे ग्राफिक्स ॲन्ड इंडियन स्क्रिप्ट टेक्नॉलॉजी (जिस्ट) हा गट स्थापन केला.[१][२] ह्या गटाने प्रा. मोहन तांबे ह्यांच्या नेतृत्वाखाली इस्की (इंडियन स्टॅन्डर्ड कोड फॉर इन्फरमेशन इंटरचेंज) ही भारतीय लिप्यांसाठीची संकेतप्रणाली आणि इन्स्क्रिप्ट हा भारतीय लिप्यांना सामाईक असलेला आराखडा अभिकल्पित करण्याचे काम चालवले होते. झालेले काम इलेक्ट्रॉनिक्स विभागाने जनतेसाठी १९८६ साली खुले केले.[२] १९८८ साली प्रा. मोहन तांबे ह्यांच्या नेतृत्वाखालचा जिस्ट हा गट सीडॅक (सेंटर फॉर डेव्हलपिंग ॲडव्हान्स्ड कॉम्प्यूटिंग) ह्या संस्थेंत सामील करण्यात आला. जिस्ट ह्या गटाचे नाव ह्यावेळी ग्राफिक्स ॲन्ड इंटेलिजन्स-बेस्ड स्क्रिप्ट टेक्नॉलॉजी असे करण्यात आले.[३]
प्रमाणक म्हणून शासनमान्यता
भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागाने इन्स्क्रिप्ट ह्या आराखड्याला १९८६ साली मान्यता दिली. १९८८मध्ये त्यात काही सुधारणा करण्यात आल्या आणि १९९१ साली भारतीय मानक ब्यूरोने इन्स्क्रिप्ट हा आराखडा प्रमाणित केला.[४]
इन्स्क्रिप्टची रचनावैशिष्ट्ये
- इन्स्क्रिप्टची रचना ध्वन्यनुसारी म्हणजे उच्चाराच्या क्रमाप्रमाणे आहे. उच्चारात ज्या क्रमाने ध्वनी येतात तशाच क्रमाने ते लिहायचे असतात. उदा. कि ह्या लेखनात पहिली वेलांटी व्यंजनाक्षराच्या आधी दिसत असली तरी ते अक्षर लिहिताना प्रथम क ह्या व्यंजनाक्षराची कळ दाबून त्यानंतर पहिल्या वेलांटीसाठीची कळ दाबण्यात येते.
- डाव्या हाताला स्वराक्षरे आणि स्वरचिन्हे (काना, मात्रा, वेलांटी इ.) असतात तर उजव्या हाताला व्यंजनाक्षरांची चिन्हे असतात.
- व्यंजनचिन्हांची मांडणी प्रत्येक कळीवर दोन चिन्हे (शिफ्टसह आणि शिफ्टवाचून) अशी केलेली आहे.
- वर्गीय व्यंजनांतील व्यंजने लिहिताना (क-वर्ग, च-वर्ग, ट-वर्ग, त-वर्ग आणि प-वर्ग)
- मधल्या (खालून दुसऱ्या) रांगेत घोष किंवा कठोर व्यंजनांपैकी (वर्गीय व्यंजनांतील पहिली दोन) शिफ्ट न दाबता अल्पप्राण व्यंजने (क, च, ट, त, प), आणि शिफ्ट दाबून महाप्राण व्यंजने (ख, छ, ठ, थ, फ) लिहिता येेतात.
- मधल्या रांगेच्या वरच्या (खालून तिसऱ्या) रांगेत मृदू व्यंजनांपैकी (वर्गीय व्यंजनांतील दुसरी दोन) शिफ्ट न दाबता अल्पप्राण व्यंजने (ग, ज, ड, द, ब), आणि शिफ्ट दाबून महाप्राण व्यंजने (घ, झ, ढ, ध, भ) लिहिता येेतात.
- स्वरचिन्हे व स्वरांशचिन्हे लिहिताना
- शिफ्ट न दाबता स्वरांशचिन्ह (उदा. काना) टंकता येते तर शिफ्ट दाबून त्याच स्वराचे स्वरचिन्ह (उदा. आ) टंकता येते.
- अ हा स्वर व्यंजनाक्षरात वेगळा दाखवण्याची पद्धत नसल्याने अच्या कळीवर शिफ्ट न दाबता ् (पायमोडीचे चिन्ह = अचा आणि इतर कोणत्याही स्वराचा अभाव) आणि शिफ्ट दाबून स्वरचिन्ह (अ) टंकता येते.
- जोडाक्षरे टंकण्यासाठी ज्या व्यंजनांचा संयोग अभिप्रेत असेत त्यांच्या मध्ये ् (पायमोडीचे चिन्ह) टंकावे लागते. उदा क + ् + क = क्क, र + ् + क + य = र्क्य
- ऱ्य, ऱ्ह हे व्यंजनसंयोग लिहिण्यासाठी ऱ (क्वार्टी इंग्लिशमधील शिफ्ट J) + ् + य/ ह ह्या कळी दाबाव्या लागतात.
इन्स्क्रिप्टची वैशिष्ट्ये
- हा आराखडा विविध चाचण्यांद्वारे तपासण्यात येऊन त्याला भारतीय मानक ब्यूरोने प्रमाणक (स्टॅण्डर्ड) म्हणून मान्यता दिली आहे.
- विविध कार्यकारी प्रणाल्यांत (ऑपरेटिंग सिस्टिमांत) उदा. विंडोज, मुक्त/ लिनक्स, मॅक इ. विशिष्ट भाषा निवडल्यावर त्यासाठी हा आराखडा बहुशः क्रियापूर्व (डीफॉल्ट) स्वरूपात उपलब्ध असतो. त्यासाठी कोणतीही वेगळी आज्ञावली बसवून घ्यावी (इन्स्टॉल करावी) लागत नाही.
- बाराखडी येत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला हा कळपाटाचा आराखडा विनासायास वापरता येतो. (‘फोनेटिक’ आराखड्याप्रमाणे ह्यासाठी इंग्लिश लेखनाच्या पूर्वज्ञानाची आवश्यकता नसते.)
- विविध भारतीय भाषांच्या लिप्यांसाठी हाच आराखडा (थोड्याफार फरकाने) सामाईक म्हणून वापरता येतो. उदा. मराठीसाठी इन्स्क्रिप्ट वापरणारी व्यक्ती हाच आराखडा वापरून गुजराती, बाङ्ला, असमिया इ. विविध भारतीय भाषांच्या लिप्यांतही टंकलेखन करू शकतात.
इन्स्क्रिप्ट कसे वापरावे ह्याविषयीची शिकवणी
संदर्भ
- ^ a b महेशकुमार आर. सिन्हा; A Journey from Indian Scripts Processing to Indian Language Processing पृ. १५
- ^ a b "प्रा. मोहन तांबे ह्यांचा परिचय; Session - II; HDTV-Implementation & Strategies; पृ. ६" (PDF). 2012-03-10 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2016-08-27 रोजी पाहिले.
- ^ महेशकुमार आर. सिन्हा; A Journey from Indian Scripts Processing to Indian Language Processing पृ. १६
- ^ IS 13194 : 1991, UDC 681.3 पृ. १५