इंद्रभुवन (सोलापूर)
==इंद्रभुवनचा इतिहास== एकेकाळी महाराष्ट्रात चैथ्या क्रमांकावर आणि देशात बाराव्या क्रमांकावर असलेल्या सोलापूर शहराच्या सौंदर्यात भर घालणारी सोलापूर महानगरपालिकेची सर्वोत्कृष्ट सुबक नक्षीकाम असलेली अत्यंत रेखीव, मनमोहक, देखणी इमारत म्हणजे इंद्रभुवन होय. अनेक स्थापत्य शास्त्रांच्या प्रमाणबद्ध मिश्रणातून साकार झालेली सुमारे 15 हजारपेक्षा जास्त चैरस फुटांची ही भक्कम साजिरी इमारत शहराच्या मध्यवर्ती भागात उंचावर मोठया डौलाने उभी आहे. ही इंद्रभुवन इमारत स्थापत्य शास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना मानला जातो. जगभरातील उत्कृष्ट इमारतींमध्ये त्याकाळी वापरण्यात आलेले अत्याधुनिक बांधकाम साहित्य या इमारतीत वापरण्यात आले आहे. राहण्यासाठी उभी केलेली ही प्रासादासारखी वास्तू बांधण्यासाठी 13 वर्षांचा कालावधी लागण्याचे मुख्य कारण म्हणजे ती सर्वांत्कृष्ट व्हावी हे होय. जगभरातील अनेक देशात आप्पासाहेब वारद यांनी दौरे करून या इमारतीसाठी लागणाÚया सुबक आणि आकर्षक वस्तू आणल्या. ग्रॅनाईट, बेसाल्ट, शहाबादी दगडांपासून घडविलेल्या या वास्तूसाठी जगभरातील सर्वांत्कृष्ट स्थापत्य पद्धतीचा वापर करण्यात आला आहे.
इंद्रभुवनचा शिल्पकार
देशातील अग्रगण्य बारा उद्योजकांमध्ये नाव असलेले व्यापारी सोलापूरात होऊन गेले ते म्हणजे पुण्यश्लोक मल्लप्पा ऊर्फ आप्पासाहेब वारद यांनी हा पराक्रम सोलापूर शहरात राहून करून दाखविला आहे. व्यापार, उद्योग, दानशुर वृत्ती आणि धार्मिक अधिष्ठानामुळे 1890च्या दशकात सोलापूर शहराला ’वारदाचे सोलापूर’ म्हणून ओळखले जात होते. वारद घराण्याचे मूळ पुरूष गुरूबसप्पा हे निण्णी, जि. बिदर येथील रहिवासी होते. बीदर सोडून जवळच मंगळवारपेठ नावाच्या गावात ते काही दिवस राहावयास गेले. त्याना विरूपाक्ष नावाचा मुलगा होता. विरूपाक्ष यांना बसप्पा व मल्लिकार्जुनप्पा नावाची दोन मुले होते. यामधील आप्पासाहेब हे बसप्पांचे पुत्र होते.
19 व्या शतकाच्या सुरुवातीला बसप्पा हे उस्मानाबाद जिल्हयातील इटकळ येथे वास्तव्यास आले होते. ते पुढे व्यापाराच्या निमित्ताने सोलापूरमध्ये येऊन स्थायिक झाले. ते सोलापूर मध्ये मंगळवारपेठेतील वारद बोळात राहत होते.
अप्पासाहेब वारद
आप्पासाहेब वारद यांचा जन्म 17 जून 1851 रोजी पहाटे झाला. त्यांच्या जन्मामुळे वडिलांना आणि चुलत्यांना खूप आनंद झाला. अन्नदान आणि वस्त्रदान करून बारसे साजरे करण्यात आले. आप्पासाहेबांचे मूळ नाव मल्लेश उर्फ मल्लप्पा असे ठेवण्यात आले होते. गोरा वर्ण, मोहक चेहरा, बाळसेदार शरीरयष्टी यामुळे मल्लेश हा सर्वांचा लाडका बनला. पुढे मल्लेश पंधरा वर्षांचा झाल्यावर चन्नबसप्पांनी त्याला आपल्या दुकानात बसण्यास सांगितले. चुललत्याच्या मार्गदर्षनाखाली तो उधारी बसुलीचे काम करू लागला. हळूहळू ओळखी वाढल्या, जनसंपर्क वाढले, व्यवहार ज्ञान वाढले. आप्पासाहेबांनी वडील बंधू चनबप्पा यांच्याबरोबर व्यापारात लक्ष घालण्यात सुरुवात केली. केवळ दोन पेढया असलेल्या वारद यांनी भारतभर 40हून अधिक पेढया उभ्या केल्या होत्या. त्यांच्या पेढयांमध्ये हिशोब लिहिण्यासाठी पद्धत ही त्याकाळी आदर्श ठरली. ब्रिटिश सरकारने सर्व मोठया उद्योगांना अशा पद्धतीने हिशोब लिहिण्याचा आदेश दिला.
इंद्रभुवनची निर्मिती
बांधकामाचे कोणतेही शास्त्रशुद्ध औपचारिक शिक्षण न घेतलेल्या शेकडो कारागिरींनी एक तपाहून अधिक काळ अखंड परिश्रम घेऊन केवळ दगड, चुना, विटांचा वापर करून शभर वर्षापूर्वी उभी केलेली ही टोलेजंग इमारत आजही तितकीच मजबूत आहे. ’पिलर’चा आधार न देता उभे केलेले मजबूत सभागृह त्यात आहेत. कोणतेही काम अत्यंत भव्य, सुंदर, भक्कम आणि व्यवस्थित असावे यावर, त्यांचा कटाक्ष होता. इंद्रभुवन प्रासाद बांधण्याची कल्पना त्यांच्या डोक्यात येताच संपूर्ण भारतातील अनेक इमारतीचे सुंदर सुंदर नमुने त्यात कसे समाविष्ट करता येतील इकडे त्यांचे लक्ष वेधले. या तीन मजली मजबूत इमारतीचे बांधकाम सुरू झाल्याबरोबर आप्पासाहेबांनी मुंबई, मद्रास आणि कलकत्ता येथे असलेल्या त्यावेळच्या ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची कार्यालये, रेल्वे स्थानक, फोर्ट आदी इमारती पाहिल्या. इंजिनियरशी चर्चा करून निरनिराळया भागांचा आराखडा त्यांनी करून घेतला. व्हिक्टोरियन स्थापत्य शास्त्राचा आदर्श नमुना म्हणून या इमारतीचा लौकिक सर्वत्र पसरला. इंद्रभुवनच्या बांधकामासाठी जिल्हयातील कलावंत आणि जिल्हयात तयार होणारा माल यांना त्यांनी प्राधान्य दिले. सन 1899 साली या महालाचे बांधकाम सुरू झाले आणि सन 1912 साली इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. सलग साडेबारा वर्षे हे बांधकाम चालू होते. ही इमारत आप्पासाहेब वारद यांनी आपल्या निवासासाठी बांधायला घेतली अशी चर्चा त्यावेळी होती. बंगल्याच्या सभोवताली असलेल्या एकूण नऊ एकर जमिनीवर एक उत्कृष्ट उद्यान असावे. बंगल्यातील सर्व सामानसुमान कलासुंदर असावे अशी त्यांची तीव्र मनीशा होती पण त्यांच्या हयातीत ही इमारत पूर्ण झालेले पहावयाचे भाग्य त्यांना लाभले नाही. 1911 साली इंद्रभुवनाचे शिल्पकार आप्पासाहेब वारद यांचा मृत्यु झाला.
सोलापूर महानगरपालिकेसाठी इंद्रभुवनचा वापर
इंद्रभुवनमध्ये काही दिवस हरिभाई देवकरण प्रशाला भरत असे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, त्यानंतर काही काळ जिल्हा सेशन कोर्टाचे कार्यालय या इमारतीत होत. आप्पासाहेब वारद यांच्या मृत्युनंतर काही दिवस ही इमारत वारद कुटुंबीयांच्या ताब्यात होती. नंतर ती शासनाने ताब्यात घेतली. दिनांक 1 मे 1964 रोजी महाराष्ट्र दिनी आणि कामगार दिनाचे औचित्य साधून सोलापूर महानगरपालिकेची स्थापना इंद्रभुवन येथे करण्यात आली. 1964 साली सोलापूर नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत झाल्यावर शासनाने नवीपेठेतील कार्यालय या इमारतीत हलविले. त्या दिवसापासून या इमारतीमध्ये महानगरपालिकेचे कामकाज आजतागायत सुरू आहे. अनेक स्थापत्यविशारदांनी गौरविलेल्या या इमारतीत पूर्वी शासकीय कार्यालयांचा कारभार चालत असे. यामध्ये मामलेदार कचेरी आणि न्यायालयाचाही समावेश होता. इमारतीचा गौरव म्हणून 2004 साली टपाल खात्याच्या वतीने या इमारतीचे चित्र असलेले टपाल तिकिट काढण्यात आले.
=संदर्भ ग्रंथ=
- जाधव मधु, पुण्यष्लोक आप्पासाहेब वारद, सुविद्या प्रकाशन, सोलापूर, 2016.
- माने राजा (संपा.), सबकुछ सोलापूर, लोकमत मीडिया प्रा. लि., सोलापूर, 2014.
- बमणगांवकर ना.रा., पुण्यष्लोक वारद, वारद स्मारक मंडळ प्रकाशन, सोलापूर, 1949.
- सोलापूर नगरपालिका: शतसांवत्सरिक ग्रंथ.
- पुण्यष्लोक वारद स्मारक समिती: अहवाल.