इंद्रजित गुप्ता
इंद्रजित गुप्ता | |
---|---|
जन्म: | १६ मार्च इ.स. १९१९ |
मृत्यू: | २० फेब्रुवारी इ.स. २००१ कोलकाता |
संघटना: | कम्युनिस्ट पक्ष |
वडील: | सतिष गुप्ता |
पत्नी: | सुरैय्या |
इंद्रजित गुप्ता (बंगाली: ইন্দ্রজিৎ গুপ্ত) (मार्च १६, इ.स. १९१९ - फेब्रुवारी २०, इ.स. २००१) हे बंगाली, भारतीय साम्यवादी नेते होते. देवेगौडा आणि गुजराल यांच्या पंतप्रधानपदावरील कारकिर्दीत ते केंद्रीय मंत्रिमंडळात गृहमंत्री होते.
जीवन
दिल्लीतील सेंट स्टिफन्स कॉलेज आणि लंडनमधील किंग्ज कॉलेज यासारख्या नामांकित शिक्षणसंस्थांमधून त्यांनी शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून पदवी प्राप्त केली.
राजकीय कारकीर्द
ते इ.स. १९६० मध्ये सर्वप्रथम पश्चिम बंगाल राज्यातील नैऋत्य कलकत्ता लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीत लोकसभेवर निवडून गेले.त्या मतदारसंघाचे त्यांनी इ.स. १९६७ पर्यंत प्रतिनिधित्व केले. त्यानंतर ते १९६७ आणि इ.स. १९७१ सालांतील लोकसभा निवडणुकींत पश्चिम बंगाल राज्यातील अलीपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. इ.स. १९७७ सालातील लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. इ.स. १९८० आणि इ.स. १९८४ सालांतील लोकसभा निवडणुकींमध्ये ते पश्चिम बंगाल राज्यातील बासीरहाट लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतरच्या इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६, इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९ सालांतल्या लोकसभा निवडणुकींमध्ये ते पश्चिम बंगाल राज्यातील मिदनापूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते १०व्या, ११व्या, १२व्या आणि १३व्या लोकसभांमध्ये सर्वांत ज्येष्ठ सदस्य होते. त्यामुळे लोकसभेची स्थापना झाल्यावर इतर सदस्यांना शपथ द्यायला त्यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाली.