Jump to content

इंचनालचा गणपती

इंचनालचा गणपती हा कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजच्या पश्चिमेला सात कि.मी. अंतरावरच्या इंचनाल नावाच्या गावात आहे. या गावात हिरण्यकेशी नदीच्या काठावर एक जुनी गावची पांढर आहे. त्याठिकाणी हे गणेशाचे मंदिर उभे आहे.

इ. स. १९०७-०८साली या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार गोपाळ आप्पाजी कुलकर्णी यांनी केल्याची नोंद आहे. त्यानंतर श्री गजानन ग्रामस्थ सेवा मंडळ, इंचनाल, मुंबई आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी मिळून १९८७ ते १९९२ या काळात पुन्हा एकदा हे मंदिर नव्याने बांधून काढले. त्यासाठी गोकाकवरून आरभाव जातीचा दगड वापरला गेला आहे. करवीर पीठाच्या शंकराचार्याच्या हस्ते ४ मे १९९२ रोजी मंदिराचा कलशारोहण समारंभ झाला. मोठा प्रशस्त सभामंडप, बाजूला बगीचा, महादेव मंदिर असा सर्व रम्य परिसर आहे.

इंचनालच्या या मंदिरातील गणेशमूर्ती बैठी असून तिची उंची अंदाजे सव्वा दोन फूट एवढी आहे. काळ्या पाषाणातली ही मूर्ती शांत आणि मोठी प्रसन्न दिसते. चतुर्भुज गणेशाच्या हातात पाश, अंकुश, पात्र असून एक हात वरद मुद्रेत आहे. या मंदिराची देखभाल देवस्थान समितीकडे आहे. देवाच्या नावानी जवळ जवळ नऊ एकर बागायती जमीन आहे. माघ महिन्यामध्ये येणाऱ्या गणेश जयंतीला इथे मोठा उत्सव आणि महाप्रसादाचे आयोजन करतात. कोल्हापूर, सावंतवाडी, गोवा, बेळगाव इथून भाविक यावेळी इथे दर्शनाला येतात. महागावचे दंडगे (जोशी) घराण्याकडे ३००हून अधिक वर्षांपासून या गणपतीच्या पूजेची व्यवस्था दिलेली आहे.