Jump to content

आसव-अरिष्ट

औषधे दीर्घकाळपर्यंत टिकून राहावीत यासाठी आसव-अरिष्टे तयार केली जातात. ही रोगांनुसार विविध प्रकारच्या वनस्पतींपासून बनवितात. आसव अरिष्ट करण्यासाठी प्रथम एक मातीचे स्वच्छ मडके घेऊन त्यात आवश्यक त्या औषधी वनस्पती, पाणी व इतर सहाय्यक वनस्पतींचा रस या गोष्टी भरल्या जातात. त्यामध्ये आवश्यक प्रमाणात गूळ, साखर, मध व अन्य सुगंधी पदार्थ टाकतात. त्यानंतर त्यात धायटीची फुले किंवा यीस्ट मिसळून झाकण लावून त्याला पंधरा ते पंचवीस दिवस समशीतोष्ण (साधारण तापमानाला) खोलीमध्ये स्थिर ठेवतात. यानंतर त्यामध्ये संधान (मद्यनिर्मितीची) प्रक्रिया सुरू होते. संधान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्याला गाळून जो द्रवपदार्थ प्राप्त होतो त्याला ‘आसव’ असे म्हणतात. औषधी वनस्पतींचे भरड चूर्ण करून त्यापासून काढा बनवून त्यानंतर वरीलप्रमाणे संधान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला गाळून जो मद्ययुक्त द्रव पदार्थ तयार होतो, त्यास अरिष्ट असे म्हणतात. आसव बनविताना अग्नीची प्रक्रिया केली जात नाही, तर अरिष्ट बनविताना अग्नीची प्रक्रिया केली जाते.

आचार्य चरकांनी आसव बनू शकणाऱ्या चौऱ्यांशी प्रकारच्या वनस्पतींचे वर्णन केले आहे, त्यांना आसवयोनी असे म्हणतात. ज्या आसव-अरिष्टांमध्ये पाणी, सुगंधी पदार्थ इत्यादींचे प्रमाण दिलेले नाही, त्या ठिकाणी एक द्रोण (१३ लिटर) पाण्यात एक तुला (५ किग्रॅ.) गूळ, गुळाच्या अर्धा (२.५ किग्रॅ.) मध, तर सुगंधी द्रव्य गुळाच्या दशांश प्रमाणात घालावीत असा नियम आहे.

आसव हे शरीर व भूक वाढविणारे, निद्रानाश, वेदना व तोंडाचा बेचवपणा दूर करणारे व मनाला प्रसन्न करणारे असे असते; तर अरिष्ट हे शरीर कृश किंवा रोड होणे, मूळव्याध, पचनाचे जुने विकार इत्यादी प्रकारच्या रोगांमध्ये लाभदायक असून अन्नाची चव वाढविणारे, कफापासून उत्पन्न होणारे रोग कमी करणारे असते. वाळा, अफू, कोरफड, चंदन इत्यादी औषधांपासून आसव; तर अशोक, गुळवेल, अश्वगंधा, द्राक्ष इत्यादींपासून अरिष्ट बनविले जाते. आसव-अरिष्टे जितकी जुनी तितकी अधिक गुणकारी असतात.