आवळा
आवळा (डोंगरी आवळा), इंग्रजीत Indian Gooseberry, emblic myrobalan आमला आसामीत, आमलकी আমলকী बंगालीत, आमलक આમલક गुजराथीत, आमला हिंदीत, नेल्ली कानडीत, तसेच तमिळ व मल्याळम मध्ये, आवळो कोंकणीत, आमलकः संस्कृत मध्ये
हे तुरट व आंबट चवीचे, हिवाळ्यात येणारे, हिरव्यारंगाचे अत्यंत औषधी फळ आहे.
आवळ्याला आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे. हे एक उत्तम रसायन आहे. आयुर्वेदात आवळ्याच्या मुख्य वापर हा त्रिफळा चूर्णात आणि च्यवनप्राशात केला जातो.
आवळा हा एक फळ देणारा वृक्ष आहे. हा २० फूट ते २५ फुटापर्यंत उंच वाढतो. आशियाव्यतिरिक्त युरोपात व आफ्रिकेतही आढळतो. आवळ्याची झाडे हिमालयाच्या पायथ्याशी आणि उर्वरित भरतखंडात अधिकांश रूपाने मिळतात. आवळ्याचे फूल घंटेच्या आकाराचे असते.[१]
आवळ्याचे द्विनाम वर्गीकरण :
Scientific classification | |
Kingdom: | Plantae |
Clade: | Tracheophytes |
Clade: | Angiosperms |
Clade: | Eudicots |
Clade: | Rosids |
Order: | Malpighiales |
Family: | Phyllanthaceae |
Genus: | Phyllanthus |
Species: | P. emblica |
Binomial name | |
Phyllanthus emblica |
झाडाची साल राखाडी रंगाची, पाने चिंचेच्या पानांसारखी, परंतु थोडी मोठी, फुले छोटी व पिवळ्या रंगाची असतात. फुलांच्या जागी गोल, चमकणारे, पिकल्यावर लाल रंगाचे होणारे आवळ्याचे फळ लागते. वाराणसीचा आवळा सगळ्यात चांगला समजला जातो. हे वृक्ष कार्तिक महिन्यात बहरतात.
आयुर्वेदानुसार हरीतकी (हड़) आणि आवळा दोन सर्वोत्कृष्ट औषधी आहेत. या दोघांमध्ये आवळ्याला जास्त महत्त्व आहे. चरकाच्या मतानुसार वाढत्या वयामुळे येणाऱ्या शारीरिक अवनतीला थांबवणाऱ्या अवस्थास्थापक द्रव्यांमध्ये आवळा सगळ्यात मुख्य आहे. प्राचीन ग्रंथकारांनीं याला शिवा (कल्याणकारी), वयस्था (वाढत्या वयाला थांबवून ठेवणारे) तथा धात्री (आईसारखे रक्षण करणारे) म्हणले आहे.
आवळी भोजन
कार्तिक शुक्ल चतुर्दशीला आवळ्याच्या झाडाखाली बसून जेवतात, त्या जेवणाला आवळी भोजन म्हणतात.
शेती
आवळ्याचे झाड आशियात व युरोपात आवळ्याची शेती मोठ्या प्रमाणावर होते. याची व्यवसायिक शेती शेतकऱ्यांना लाभदायक असते.
भारताचे हवामान आवळ्याच्या शेतीसाठी सर्वात उपयुक्त मानले जाते.
आवळा हा केसांच्या समस्यांवर गुणकारी आहे. त्यामुळे आवळ्याचा अर्क अन्य तेलात मिसळून केसाला लावायचे 'आमला तेल' बनवतात.
आवळ्यापासून आवळा सुपारी, आवळा कॅंडी, आवळा लोणचे, आवळा मोरंबा, आवळेपाक, असे साठवणुकीचे पदार्थ तयार करता येतात. आवळा जुना झाला, पिकला, भाजला, उकडला, उन्हात वाळवला तरी त्याचे गुण कमी होत नाहीत. यात पांच रस आहेत (मधुर, अम्ल, तिक्त, कटू, तुरट). कच्चा आवळा मिठासोबत खाल्ल्यास शरीरास सर्व रस (षड्रस) मिळतात. च्यवनप्राश या प्रसिद्ध औषधाचा मुख्य घटक आवळा हा आहे. आवळासेवनाने शरीरातील पित्त कमी होण्यास मदत होते.
आवळा हे कोरडवाहू फळपीक आहे. या फळामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते.
रायआवळा (फायलॅंथस ॲसिडस किंवा सिक्का ॲसिडा) नावाचे एक आवळ्याच्या चवीचे पण वेगळे फळ आहे.
ज्यांचे जन्मनक्षत्र भरणी आहे त्यांचा आवळा हा आराध्यवृक्ष आहे.
रासायनिक संरचना
आवळ्याच्या १०० ग्राम रसात ९२१ मिलिग्रॅम आणि गरात ७२० मिलिग्रॅम. सी व्हिटॅमिन असते. आवळ्याची आर्द्रता ८१.२, प्रोटीन्स ०.५, स्निघ्नता ०.१, खनिज द्रव्ये ०.७, कार्बोहायड्रेट्स १४.१, कैल्शियम ०.०५, फॉस्फरस ०.०२, लोह १.२ मिलिग्रॅम.व निकोटिनिक ॲसिड ०.२ मिलिग्रॅम असते. यांच्या व्यतिरिक्त आवळ्यात गॅलिक ॲसिड, टॅनिक ॲसिड, शर्करा (ग्लूकोज), अल्ब्युमिन, काष्ठौज इत्यादी तत्त्वेपण असतात.
संदर्भ
- ^ "Phyllanthus Emblica - an overview | ScienceDirect Topics". www.sciencedirect.com. 2023-04-11 रोजी पाहिले.