Jump to content

आल्फ्रेड सिस्ले

आल्फ्रेड सिस्ले

आल्फ्रेड सिस्लेचे पिएर-ओगूस्त रन्वारने काढलेले चित्र (१८६८)
पूर्ण नावआल्फ्रेड विल्यम सिस्ले
जन्मऑक्टोबर ३०, १८३९
पॅरिस, फ्रान्स
मृत्यूजानेवारी २९, १८९९
मोरे-सुर-ल्वांग, फ्रान्स
राष्ट्रीयत्वब्रिटिश
कार्यक्षेत्रचित्रकला
शैलीदृक् प्रत्ययवाद शैली/
impressionism
वडीलविल्यम सिस्ले
आईफेलिशिया सेल

आल्फ्रेड सिस्ले (इंग्रजी: Alfred Sisley) हा दृक्‌ प्रत्ययवादी चित्रशैलीतील निसर्गचित्रांकरिता नावाजला गेलेला ब्रिटिश चित्रकार होता. जन्माने ब्रिटिश असूनदेखील सिस्लेचे वास्तव्य आणि कलाक्षेत्रातील कारकीर्द फ्रान्समध्येच घडली.

जीवन

आल्फ्रेड सिस्लेचा जन्म 'विल्यम सिस्ले'(William Sisley) व 'फेलिशिया सेल'(Felicia Sell) या इंग्लिश जोडप्याच्या पोटी ऑक्टोबर ३०, १८३९ रोजी झाला. सिस्ले १८६०च्या सुमारास मार्क-शार्ल-गाब्रिएल-ग्ले‍एर या चित्रकाराच्या 'आतलिए'मध्ये म्हणजेच स्टुडिओमध्ये ('आतलिए-ग्ले‍एर'मध्ये) चित्रकलाप्रशिक्षणाकरिता दाखाल झाला. तेथे त्याची फ्रेडरिक बाझीय, क्लोद मोने, पिएर-ओगूस्त रन्वार या सहाध्यायांशी ओळख झाली. खुल्या हवेत चित्रण करून ऊन-सावल्यांच्या दिवसभर बदलणाऱ्या देखाव्यांची दृश्ये कुंचल्यातून साकारण्याच्या उद्देशाने ते प्रयत्न करीत असत. त्यांच्या या प्रयोगांतून वातावरणातील खुलेपणा, ऊन-सावल्यांचे खेळकर चैतन्य चित्रामध्ये उतरवू शकणारी 'दृक्‌ प्रत्ययवाद' नावाची एक विषिष्ट प्रकारची चित्रशैली विकसित झाली. तत्कालीन रसिकवर्गाची नजर अशा शैलीतील रसास्वादाला सरावलेली नसल्याने या मंडळींच्या चित्रांची सुरुवातीस फारशी दखल घेतली गेली नाही. प्रदर्शनात चित्रे दर्शविण्याच्या किंवा विकण्याच्या संधी अशा परिस्थितीत कमी होत्या तरीही वडिलांच्या आर्थिक पाठबळामुळे सिस्लेला त्याच्या इतर सहकलाकारांप्रमाणे आर्थिक चणचण जाणवली नाही.
सिस्लेची विद्यार्थीदशेतल्या त्या कालखंडातील चित्रे आता उपलब्ध नाहीत. त्याचे उपलब्ध चित्रांतील सर्वात आधीचे चित्र - 'छोट्या शहराजवळचा एक रस्ता' - १८६४च्या सुमारास काढले असावे असे मानले जाते.

१८६०च्या सुमारास सिस्ले 'युजेनी लेस्कूझेक' नामक युवतीबरोबर विवाहबद्ध झाला. सिस्ले आणि युजेनी यांना दोन मुले झाली. या दांपत्याचा संसार ३० वर्षांचा होताहोता १८९९ साली सिस्लेची पत्नी कालवश झाली.

सिस्ले आणि मोने १८७१च्या सुमारास जेव्हा लंडनमध्ये होते तेव्हा त्यांना जे.एम्‌.डब्ल्यू. टर्नर आणि जॉन कॉन्स्टेबल या ब्रिटिश चित्रकारांची चित्रे सापडली. सिस्ले जरी सिद्धांतवादी अभ्यासक नसला तरीही या चित्रकारांच्या चित्रांचा प्रभाव त्याच्या 'दृक्‌ प्रत्ययवादी' चित्रशैलीच्या घडणीवर झाल्याचे जाणवते.

दृक्‌ प्रत्ययवादी चित्रकारांमध्ये सिस्लेच्या चित्रशैलीशी जवळीक असणाऱ्या मोनेच्याअ चित्रकर्तृत्वापुढे सिस्लेचे चित्रकर्तृत्व झाकोळल्यासारखे वाटले, किंवा सिस्ले जरी छोट्या प्रमाणावर काम करणारा, प्रयोगांच्या फंदात कमी पडणारा चित्रकार असला तरीही सिस्लेची चित्रशैली ही 'अस्सल', 'दृक्‌ प्रत्ययवादी चित्रशैलीचे पाठ्यपुस्तक' मानली जाते. सिस्लेने प्रामुख्याने रंगविलेल्या निसर्गदृश्यांमध्ये आकाशाचा देखणेपणा, त्यातील अवकाशाची भव्यता दिसून येते.

जानेवारी २९, १८९९ रोजी मोरे-सुर-ल्वांग मुक्कामी घशाच्या कर्करोगामुळे सिस्लेचे निधन झाले.

कार्य

आर्ट इन्स्टिट्यूट ऑफ शिकागो येथे सध्या असलेली मोरेमधील रस्ता आणि वाळूचे ढिगारे ही दोन चित्रे आणि पॅरिसमधील मुझे दॉर्से येथील मोरे-सुर-ल्वांगमधील पुल ही सिस्लेची चित्रे प्रसिद्ध आहेत.

महत्त्वाच्या चित्रकृती

व्हिलनव्ह-ला-गारांन येथील पूल १८७२.
पोर्ट मार्लीच्या किनाऱ्यावरील वाळूचे ढिगारे (१८७५).
मोरे येथील चर्च (१८९३).

संदर्भ

बाह्य दुवे