Jump to content

आर्किमिडीज

दोमेनिको फेत्ती याने चितारलेला आर्किमिडीज (इ.स. १६२०)

आर्किमिडीज (ग्रीक: Αρχιμήδης) (इ.स.पू. २८७ - इ.स.पू. २१२) हे प्राचीन ग्रीक गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, अभियंता, संशोधकखगोलशास्त्रज्ञ होते. भौतिकशास्त्रातील स्थितिकी या उपशाखेत व तरफेच्या यंत्रणेवर, तसेच गणितातील घनफळ, पॅराबोला इत्यादी विषयांवर त्यांनी मूलभूत संशोधन केले. भूमिती, यामिकी (प्रेरणांची वस्तूंवर होणारी क्रिया व त्यामुळे निर्माण होणारी गती यांचा अभ्यास करणारे शास्त्र) व अभियांत्रिकी या त्रिविध क्षेत्रांत त्यांची महत्त्वाची कामगिरी आहे.

जन्म व शिक्षण

आर्किमिडीज यांचा जन्म सिसिलीमधील सेरॅक्यूज येथे झाला. सेरॅक्यूजचा राजा दुसरा हीरो व त्यांचा मुलगा गेलो यांच्याशी त्यांची दाट मैत्री होती. त्यांचे सर्व शिक्षण अलेक्झांड्रिया येथे झाले. तेथे कॉनन नावाच्या गणितज्ञाशी त्यांचा परिचय झाला. शिक्षण संपल्यावर आपल्या जन्मगावी येऊन त्यांनी गणिताचा अभ्यास पुढे चालू ठेवला. उपलब्ध असलेल्या त्यांच्या लेखांवरून त्यांच्या सखोल कार्याची कल्पना येते. त्यांचे काही लेख जवळजवळ दोन हजार वर्षांपर्यंत प्रमाणभूत मानले गेले आहेत.

भौतिकशास्त्राचा अभ्यास व शोध

आर्किमिडीज यांना वर्तुळ, अन्वस्त आणि सर्पिल या वक्रांच्या क्षेत्रमापनासाठी त्यांनी वापरलेली 'निःशेष पद्धत' बऱ्याच बाबतीत अर्वाचीन समाकलनाच्या [अवकलन व समाकलन] विवरणाशी जुळती असल्याचे आढळते. वर्तुळाचा परीघ व व्यास यांच्या गुणोत्तराचे (π)चे मूल्य २२१/७१ आणि २२ /७ त्यांच्या दरम्यान असल्याचे त्यांनी सिद्ध केले. शंकूचे विविध प्रकारे छेद घेतल्याने बनणाऱ्या आकृतींचे क्षेत्रफळ अगर त्या आकृती अक्षाभोवती फिरवून बनणाऱ्या घनाकृतीच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ अगर त्या आकृतीचे घनफळ तुलनात्मक रीतीने मांडता येते असे आर्किमिडीज यांनी दाखविले. अंक मोजण्याच्या ग्रीक पद्धतीत त्यांनी सुधारणा केल्या.

सोनाराने बनविलेल्या मुकुटात चांदीची भेसळ असल्याचा राजा हिरो यांस संशय आला व त्याची शहानिशा करण्याचे काम आर्किमिडीज यांच्याकडे सोपविण्यात आले. या घटनेतूनच आर्किमिडीज यांना तरफेचा शोध लागला. "योग्य टेकू मिळाल्यास मी पृथ्वीसुद्धा तरफेचा साहाय्याने उचलून दाखवीन" असे त्यांनी उद्‌गार काढले होते.

आर्किमिडीजचा सिद्धान्त

"एखादा पदार्थ द्रवरूप किंवा वायुरूप (द्रायू) पदार्थात तरंगत असताना त्यावर खालून वर अशी एक प्रेरणा लागू होते. तिला उत्प्रणोदन असे नाव आहे व तिचे मूल्य पदार्थाने बाजूस सारलेल्या द्रायूच्या वजनाएवढे असते." हा सिद्धान्त आर्किमिडीजने प्रस्थापित केला. "पदार्थाचे पाण्यात केलेले वजन हे त्याच्या हवेतील वजनापेक्षा त्याने बाजूला सारलेल्या पाण्याच्या वजनाइतके कमी असते" हे त्यांचे तत्त्व 'आर्किमिडीजचा सिद्धान्त' या नावाने सुप्रसिद्ध आहे.

पाणी उपसून काढण्याकरिता त्यांनी शोधून काढलेल्या यंत्रात 'आर्किमिडीज स्क्रू' असे नाव प्राप्त झाले आहे व ते इजिप्तमध्ये वापरातही होते. गोफणीतून ज्याप्रमाणे दगड फेकता येतात त्याच धर्तीवर मोठेमोठे दगड फेकण्याचे यंत्र आर्किमिडीज यांनी तयार केले होते.

आर्किमिडीज स्क्रू

या उपकरणामध्ये एक लांब नळकांडे असून त्याच्या आत त्याच्या अक्षावर बसवलेल्या दांड्याभोवती मळसूत्राप्रमाणे बसवलेला व नळकांड्याला चिकटवलेला पत्र्याचा पडदा असतो. दांड्याचे खालचे टोक विहिरीसारख्या पाण्याच्या साठ्यामध्ये बुडविलेले असते व वरचे टोक उंचावर पाण्याच्या बाहेर असते.दांड्याच्या वरच्या टोकावर नळकांडे फिरविण्याचा दांडा बसवलेला असतो. नळकांडे योग्य दिशेने फिरवले म्हणजे नळकांड्याच्या खालच्या तोंडातून पाणी आत शिरते व मळसूत्री पडद्यावरून हळूहळू वर चढत जाऊन वरच्या तोंडातून बाहेर पडते.

आर्किमिडीज स्क्रूच्या उपयोजनेचे प्रात्यक्षिक

मृत्यू

रोमन सेनापती मार्सेलस् यांनी समुद्रमार्गे सेरॅक्यूजवर केलेली स्वारी राजा हीरोनी या यंत्राच्या जोरावर परतविली. तथापि खुष्कीच्या मार्गाने येऊन मार्सेल्स यांनी सेरॅक्यूज काबीज केले व त्यांच्या सैन्यातील एका सैनिकाने आर्किमिडीज यांचा शिरच्छेद केला.

आर्किमिडीजच्या लिखानांचे संपादन

टॉरेली यांनी १७९२ मध्ये व हायबर्ग यांनी १८८० मध्ये आर्किमिडीज यांच्या सर्व लिखाणाचे संपादन केले. त्यानंतर १८९७ मध्ये हीथ यांनी वर्क्स ऑफ आर्किमिडीज या ग्रंथात आर्किमिडीज यांचे लेख आधुनिक चिन्हे व खुणा वापरून प्रसिद्ध केले.

संदर्भ

बाह्य दुवे