आर.के. नारायण
जीवन-
रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायणस्वामी (१० ऑकटोबर १९०६ - १३ मे २००१) आर. के. नारायण यांचा जन्म तामिळनाडू राज्यातील मद्रास (आताचे चेन्नई ) या ठिकाणी झाला. ते आठ भावंडांपैकी ( सहा मुले आणि दोन मुली ) एक होते. नारायण यांचे वडील हे स्कूल टीचर होते. नारायण यांच्या वडिलांची सतत बदली होत असल्यामुळे ते त्यांची आजी पार्वती जवळ राहिले. या काळामध्ये त्यांचे जवळचे मित्र आणि सवंगडी हे मोर आणि काही खोडकर माकडे होती. त्यांच्या आजीने नारायण यांना ' कुंजापा ' हे टोपण नाव दिल होते. कुटुंबामध्ये त्यांना याच नावाने ओळखले जात असे. आजीने त्यांना भारतीय शास्त्रीय संगीत, संस्कृत, गणित, पुराणे इत्यादी विषय शिकवले. आजीकडे राहत असताना नारायण यांचे शालेय शिक्षण मद्रास येथील लुथेरिअन मिशन स्कूल, सी. आर. सी. हायस्कूल आणि द ख्रिस्तीयन कॉलेज हायस्कूल अश्या विविध ठिकाणी झाले. नारायण यांच्या वडिलांची बदली महाराजा कॉलेज हायस्कूल मध्ये झाल्यानंतर ते मैसूर या ठिकाणी राहावयास गेले. या ठिकाणी त्यांना परिपूर्ण ग्रंथालय मिळाले आणि त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली. या ठिकाणाहूनच त्यांना लिखाणाची सुरुवात केली. नारायण हे विद्यापीठ प्रवेश परीक्षेमध्ये अपयशी झाले व त्यांनी एक वर्ष घरीच वाचन आणि लिखाण केले. त्यानंतर त्यांनी १९२६ मध्ये विद्यापीठ प्रवेश परीक्षा पास केली व महाराजा कॉलेज ऑफ मैसूर जॉईन केले. नारायण यांना पदवी पूर्ण करण्यासाठी चार वर्षे लागली. यानंतर त्यांनी स्कूल टीचरची नोकरी केली. परंतु त्यांनी लगेचच ती नोकरी सोडली. या अनुभवानंतर नारायण यांना एक गोष्ट लक्षात आली की त्यांच्यासाठी लिखाण हे एक उत्तम करीअर होऊ शकते. यानंतर त्यांनी कादंबरी लिखाणाची सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात त्यांनी इंग्रजी वर्तमानपत्रासाठी आणि मासिकांसाठी मनोरंजक कथा लिहिले. परंतु या लिखाणामधून त्यांना फारच कमी कमाई होत असे (पहिल्या वर्षी त्यांची वार्षिक कमाई ९ रुपये बारा आणे एवढी होती नारायण यांनी 'स्वामी आणि मित्र ' ही कादंबरी लिहिली. परंतु काकांनी त्यांच्या लिखाणावर टीका केली. आणि बऱ्याच प्रकाशकांनी छापण्यास नकार दिला. या बरोबरच नारायण यांनी 'मालगुडी' या पुस्तकाचे लिखाण चालू केले. सुट्टीच्या काळामध्ये आपल्या बहिणीच्या घरी कोईमतूर या ठिकाणी असताना नारायण हे जवळच राहणाऱ्या राजमा या १५ वर्षीय मुलीला भेटले व तिच्या प्रेमात पडले. बरेचसे अडथळे पार पडल्यानंतर नारायण यांनी त्या मुलीच्या वडिलांची लग्नासाठी परवानगी मिळवली व लग्न केले. लग्नानंतर नारायण यांनी मद्रास येथील द जस्टीस या ब्राह्मणेतर हक्कासाठी लढणाऱ्या वर्तमानपत्रासाठी वार्ताहर म्हणून काम केले. या नोकरीमुळे त्याचा संपर्क हा अनेक वेगवेगळ्या लोकांसोबत व वेगवेगळ्या विषयायांशी आला. नारायण यांनी आपल्या सामी आणि फ्रेंड या कादंबरीचे हस्तलिखित ऑक्सफर्ड मधील एका मित्राला पाठवले या मित्राने ते हस्तलिखित ग्रॅहम ग्रीन याना दाखवले. ग्रॅहम ग्रीनने ते लिखाण आपल्या प्रकाशकाला प्रकाशित करण्याची शिफारस केली आणि १९३५ साली ही कादंबरी प्रसिद्ध झाली . ग्रॅहम ग्रीन यांनी नारायण याना स्वतःचे नाव कमी शब्दात करण्याचा सल्ला दिला जेणेकरून इंग्लिश भाषिकांमध्ये ते लवकर माहित होतील. ही कादंबरी अर्ध आत्मचरित्र होती आणि त्यांच्या लहानपणीच्या घटनांवर आधारित होती. कादंबरीचे अवलोकन खूप प्रसिद्ध झाले परंतु त्याप्रमाणात त्याची विक्री झाली नाही. नारायण यांची दुसरी कादंबरी द बॅचलर ऑफ आर्टस् (१९३७) ही त्यांच्या महाविद्यालयीन अनुभवावर आधारित होती. ती कादंबरी वेगवेगळ्या प्रकाशकांनी प्रकाशित केली. पुन्हा एकदा ग्रॅहम ग्रीन यांनीच प्रकाशनाची शिफारस केली. नारायण यांची तिसरी कादंबरी द डार्क रूम (१९३८) मध्ये घरगुती विसंवादावरती आधारित होती. या मध्ये जुलमी पुरुष आणि शोषित स्त्रीचे वर्णन केले आहे आणि ती कादंबरी आणखी एका प्रकाशकाने प्रकाशीत केली. या कादंबरीला देखील चांगले रिव्हिवज मिळाले. १९३७ मध्ये नारायण यांच्या वडिलांचा मृत्यू झाला व नारायण यांची कमाई काहीच नसल्यामुळे त्यांना सक्तीने मेसूर सरकारकडून कमिशन घ्यावे लागले. नारायण यांनी सुरुवातीच्या तीन कादंबरीमध्ये काही सामाजिक समस्यावर प्रकाश टाकला. पहिल्या पुस्तकामध्ये नारायण यांनी विद्यार्थीदशेवर व त्यांना वर्गामध्ये होणाऱ्या शिक्षेवर प्रकाश टाकला. हिंदू विवाहामध्ये लग्नपत्रिका जुळण्याची प्रथेवर दुसऱ्या पुस्तकामध्ये प्रकाश टाकला आणि तिसऱ्या कादंबरीमध्ये त्यांनी नवरा बायको यांच्यामधील संबंधावर लिखाण केले.
नारायण यांना वाचनाची प्रचंड आवड होती. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी इंग्लिश लेखक डिकिन्स, आर्थर कॅनन डायल आणि थॉमस हार्डी यांच्या लेखनाचे वाचन केले. नारायण हे बारा वर्षाचे असताना त्यांनी भारतीय स्वातंत्र चळवळीमध्ये भाग घेतला ज्यासाठी त्यांना आपल्या काकांचे बोलणे खावे लागले. त्यांचे कुटुंब अराजकीय होते आणि सर्वच सरकारे वाईट असतात असे मानत. हे एक भारतीय इंग्लिश लेखक म्हणून प्रसिद्ध होते. आर. के. नारायण हे मुल्क राज आनंद आणि राजा राव या भारतीय इंग्लिश लेखकांच्या समकालीन होते.
आर.के. नारायण | |
---|---|
जन्म नाव | रासिपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायणस्वामी |
जन्म | ऑक्टोबर १०, इ.स. १९०६ चेन्नई, तमिळनाडू, भारत |
मृत्यू | मे १३, इ.स. २००१ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
भाषा | इंग्रजी |
साहित्य प्रकार | कादंबरी |
प्रसिद्ध साहित्यकृती | मालगुडी डेज, स्वामी ॲन्ड फ्रेन्ड्स, दि बॅचलर ऑफ आर्ट्स, दि गाईड, दि मॅन-ईटर ऑफ मालगुडी |
पुरस्कार | साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९५८), पद्मभूषण पुरस्कार (इ.स. १९६४), पद्मविभूषण पुरस्कार (इ.स. २०००) |
आर. के. नारायण आणि मालगुडी हे दोन्ही शब्द समानार्थी म्हणून वापरता येतील.
१९३५ साली नारायण यांनी मालगुडी नावाच्या एका काल्पनिक गावाला केंद्रस्थानी असल्याची कल्पना करून स्वामी ॲन्ड फ्रेन्ड्स या नावाची आपली पहिली कथामालिका लिहिली. त्यावेळी त्यांचे लिखाण भारतात कोणाच्याही पसंतीस उतरले नाही. या गोष्टी वाचून लेखक ग्रॅहॅम ग्रीन यांना मात्र या कथांमध्ये त्यांचे नवीन मित्र भेटल्यासारखे वाटले. त्यांनी पुढाकार घेऊन नारायण यांची ही कथामालिका छापण्यात रस घेतला आणि हे पुस्तक अतिशय गाजले. त्यानंतर नारायण यांनी एका पाठोपाठ एक सरस गोष्टी लिहून काढल्या. त्यांच्या बऱ्याच कथा मालगुडी नावाच्या गावाभोवती घडतात. या गोष्टी वाचतांना वाचक त्यात हरवून जातात. हे गाव पूर्णपणे काल्पनिक आहे यावर अनेकांचा विश्वास बसत नाही, इतके वास्तववादी चित्रण नारायण यांनी आपल्या कथांमधून उभे केले आहे. या गावातीलच एक गोष्ट 'दि गाईड' यावर गाईड नावाचा हिंदी चित्रपट निघाला. दि गाईडचे मराठी रूपांतर श्री.ज. जोशी यांनी केले आहे. आर. के. नारायण यांच्या मिस्टर संपत आणि दि फायनान्शियल एक्सपर्ट या पुस्तकांच्या आधारेही चित्रपट निघाले आहेत. शिवाय त्यांच्या मालगुडी डेज वर आधारित एक दूरदर्शन मालिकाही तयार करण्यात आली होती.
साधी लिखाणशैली आणि हलक्या-फुलक्या विनोदामुळे नारायण यांची तुलना प्रसिद्ध रशियन लेखक आंतोन चेखव यांच्याशी केली जाते. त्यांचे लिखाण जगातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
नारायण यांचे लहान भाऊ आर.के. लक्ष्मण हे अतिशय प्रसिद्ध व्यंगचित्रकार आहेत. टाइम्स ऑफ इंडिया या दैनिकात लक्ष्मण यांची व्यंगचित्रे "यू सेड इट" या शीर्षकाखाली गेली अनेक वर्षे नियमितपणे प्रसिद्ध होत आली आहेत.
साहित्य
- अंडर द बन्यन ट्री ॲन्ड अदर स्टोरीज
- ॲन ॲस्ट्रोलॉजर्स डे ॲन्ड अदर स्टोरीज
- दि इंग्लिश टीचर (मराठी अनुवाद : अशोक जैन)
- दि एमेराल्ड रूट
- ग्रॅंडमदर्स टेल
- दि गाईड (मराठी रूपांतर : श्री.ज. जोशी)
- टॉकेटिव्ह मॅन
- अ टायगर फॉर मालगुडी
- दि डार्क रूम
- नेक्स्ट संडे
- दि पेंटर ऑफ साइन्स
- दि फायनान्शियल एक्सपर्ट
- दि बॅचलर ऑफ आर्ट्स (मराठी अनुवाद :अशोक जैन)
- दि मॅन-ईटर ऑफ मालगुडी (मराठी अनुवाद ’मालगुडीचा नरभक्षक’, अनुवादिका - सरोज देशपांडे)
- माय डेज
- माय डेटलेस डायरी
- मालगुडी डेज (मराठी अनुवाद - मधुकर धर्मापुरीकर).
- मिस्टर संपत - द प्रिंटर ऑफ मालगुडी
- अ रायटर्स नाइटमेअर
- रिलक्टंट गुरू
- लॉली रोड
- दि वर्ल्ड ऑफ नागराज
- दि वर्ल्ड ऑफ स्टोरी-टेलर
- वेटिंग फॉर दि महात्मा (मराठी अनुवाद - ’महात्म्याच्या प्रतीक्षेत’. अनुवादिका - सरोज देशपांडे)
- स्वामी ॲन्ड फ्रेन्ड्स (मराठी अनुवाद ’स्वामी आणि त्याचे मित्र’. अनुवादक अशोक जैन)
- अ हॉर्स ॲन्ड टू गोट्स