Jump to content

आयुर्वेदोक्त चिकित्सा चतुष्पाद

आयुर्वेदाची आठ अंगे आहेत. या आठ प्रकारांशी चिकित्सेचा संबंध आहे. चरक संहितेत म्हंटलं आहे, " चतुर्णां भिषगादीनां शस्तानां धतुवैकृते। प्रवृत्तिः धातुसात्म्यार्था चिकित्सा इति अभिधीयते।। " रोग आणि रोगाच्या शांती करता जो जो उपाय केला जातो त्यास चिकित्सा असे म्हणतात.

या चिकित्सेनुसार, १. वैद्य / भिषक, २. औषधोपयोगी द्रव्य / औषध, ३. उपस्थाता / परिचारक आणि ४. रोगी हे चारही आपापल्याप्रशस्त गुणांनी प्रशस्त असतील तरच उचित चिकित्सा होऊ शकते. तसंही आयुर्वेदाचे प्रयोजन  रोगापासून रोग्याची मुक्तता आणि स्वस्थ जे आहेत त्यांच्या स्वास्थ्याची रक्षा हेच आहे. 

१. वैद्य - वैद्याची ४ लक्षणे -

     अ. वैद्य स्वतः दक्ष असावा. 
     ब. आचार्यांकडून शास्त्राचे ज्ञान ग्रहण केलेला असावा. 
     क. दृष्टकार्मा असावा. चिकित्सेचे विधी अनेकदा बघितलेला असावा. 
     ड. शरीराने आणि आचरणाने शुद्ध म्हणजे शुचि असावा. 

२. औषध - औषधीद्रव्याची ४ लक्षणे -

    अ. बहुकल्प - स्वरस, अवलेह, अशा अनेक रूपांमध्ये देता येतील अशी असावीत. 
    ब. बहुगुणी - विविध औषधी गुणांनी संपन्न असावीत. 
    क. गुणांच्या संपत्तीने युक्त असावीत. 
    ड. योग्य - रोग्याच्या रोगासाठी अनुकूल असावीत. 

३. परिचारक - परिचारकाची ४ लक्षणे -

    अ. अनुरक्त - रोग्यावर स्नेह करणारा असावा. 
    ब. शुचि - सर्व बाबतीत स्वच्छता पाळणारा असावा. 
    क. दक्ष - कुशल असावा. 
    ड. बुद्धिमान - समय आणि आवश्यकतेनुसार अपेक्षित निर्णय घेऊ शकणारा असावा. 

४. रोगी - रोग्याची ४ लक्षणे -

    अ. आढ्य - धन जन संपन्न असा असावा. 
    ब. भिषग्वश्य - वैद्याने सांगितलेले ऐकणारा, आज्ञेनुसार औषध घेणारा आणि पथ्य पाळणारा असावा. 
    क. ज्ञापक - आपलं सुख दुःख सांगू शकणारा, आपला त्रास वैद्याला समजावू शकणारा असावा. 
    ड. सत्त्ववान - मानसिक सत्त्वसंपन्न, चिकित्सा काळात होणाऱ्या कष्टांना न घाबरणारा असावा. 

हे चिकित्सेचे ४ पाय आहेत. यास चिकित्सा चतुष्पाद असे म्हणतात. यातील एक जरी पाय कमी असला तर चिकित्सा होऊ शकत नाही. चिकित्सा सफल होण्याकरता हे ४ पाय ( चिकित्सा चतुष्पाद ) आवश्यक आहेत.