Jump to content

आनंदवन

समाजातील कुष्ठरोगी, अंध, अपंग, कर्णबधिर, आदिवासी अशा विविध वंचित आणि दुर्लक्षित घटकांना माणूसपणाचं सन्मान्य जगणं जगता यावं यासाठी बाबा आमटे यांनी आपलं उभं आयुष्य झिजवलं. या घटकांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळ दिलं, दृष्टी दिली आणि संधीही दिली. या अचाट आणि अभूतपूर्व प्रयोगाचं जिवंत आणि चैतन्यमय प्रतीक म्हणजे आनंदवन![]

Anandwan Baba Amte Memorial
Anandwan Sanctuary Animal

आनंदवन हा बाबा आमटे यांनी महारोग्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा गावाजवळ १९४८ साली केवळ दोन झोपड्यांमधून सुरू केलेला प्रकल्प, आज सुमारे ५००० लोकांच्या एका स्वयंपूर्ण गावामध्ये रूपांतरीत झाला आहे. प्रकल्पाची सर्व व्यवस्था महारोगी सेवा समिती, वरोरा मार्फत बघितली जाते. आज येथे रूग्णालयाखेरीज अनाथालय, शाळा व महाविद्यालय, अंध व मूकबधिर मुलांची शाळा, हातमाग, यंत्रमाग, हस्तकला, शिवणकला, ग्रिटिंग कार्ड विभाग, प्रिंटीग प्रेस असे नानाविध उपक्रम राबवले जातात. सुमारे १५० शारीरिक विकलांग व्यक्तींचा स्वरानंदवन वाद्यवृंद, केवळ पायाने सुईत दोर ओवून ग्रीटिंग कार्ड्स बनवणारी शकुंतला ही आनंदवनाची आणखी काही वैशिष्ट्य.
आनंदवनाची निर्मिती आणि त्याचा इथपर्यंतचा प्रवास ‘माणूस’ घडविणाऱ्यांचा आहे. कायद्याचे पदवीधर मुरलीधर देविदास आमटे. सुखवस्तू कुटुंबातील. त्यांचे मन न्यायालयात फारसे रमले नाही. नियतीने त्यांची वाट वेगळीच ठरविली होती. समाजाने आणि परिवाराने बहिष्कृत केलेल्या कुष्ठरुग्णांवर त्यांची दृष्टी पडली. त्यांना जीवनाचे ध्येय सापडले. जगण्याचा मार्ग मिळाला. सुखकर आयुष्य सोडून ते १९४९ मध्ये वरोऱ्याला आले आणि त्यांनी महारोगी सेवा समितीची स्थापना केली. १९५१ मध्ये काही कुष्ठरोग्यांना घेऊन आनंदवनाची मुहूर्तमेढ रोवली.[]
त्या वेळी त्यांच्या पाठीशी पत्नी साधनाताई उभ्या होत्या. साधनाताईही सुखवस्तू कुटुंबातील; परंतु त्यांनी समाजाची चिंता वाहणारा, त्यांची आसवे टिपणारा फकीर, जोडीदार म्हणून निवडला. प्रारंभीच्या दिवसांत आनंदवन म्हणजे साप, विंचू यांचे घर होते. सर्वत्र दलदल. सोबत काळोख. अशा ठिकाणी बाबा आणि साधनाताई वास्तव्याला आले. अनेक कठीण प्रसंग आलेत; मात्र बाबा आणि ताई ध्येयापासून दूर गेले नाहीत. अशा वेळी त्यांच्यासमोर रक्ताच्या नात्यांनी, समाजाने बहिष्कृत केलेली माणसे दिसायची. त्यांच्या डोळ्यांतील आसवे दिसायची. त्यांच्या दुःखात स्वतःला सामावून घेताना बाबा आणि ताईंना सुख मिळायचे. कालांतराने हजारो माणसे जुळत गेली. आनंदवन श्रमवन म्हणून विकसित झाले. मात्र, आनंदवन म्हणजे कुष्ठकार्य एवढीच ओळख जनमानसात आहे. प्रत्यक्षात अंध-अपंग, कर्णबधिर, बेरोजगार, शेतकरी, आदिवासी अशा उपेक्षित घटकांना न्याय आणि अर्थपूर्ण संधी देणारे मॉडेल आनंदवन आहे.[]

आनंदवन समाजभान अभियान

‘समाजभान अभियान’! या अभियानांतर्गत पाच कलमी कार्यक्रम आहोत.
१. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत ताज्या दमाचे जे अनेक कार्यकर्ते सामाजिक कामांमध्ये गुंतलेले आहेत, त्यांच्या पाठीशी आनंदवनाने मोठय़ा भावाच्या भूमिकेतून उभं राहावं व त्यांना समाजाची मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणे.
२. आनंदवनाने आजवरच्या प्रवासात शेती, पाणी, घरबांधणी, सामाजिक वनीकरण, दुग्धविकास, प्लास्टिक पुनर्वापर अशा विविध क्षेत्रांत नानाविध यशस्वी प्रयोग केले आहेत.
३. महाराष्ट्रातल्या गावा-शहरांमध्ये जाऊन तेथील महाविद्यालयीन तरुण, स्थानिक मंडळी आणि उत्साही कार्यकर्ते यांच्यासाठी सामाजिक जाणीव-जागृतीच्या अनुषंगाने जाहीर भाषणं, परिसंवाद, मुलाखती यांचं आयोजन करण्याचा आमचा मनोदय आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील लेखक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मंडळींना आनंदवनात आमंत्रित करून तेथील प्रयोगांबद्दल अवगत केलं जाईल.
४. महाराष्ट्रातील खेडय़ापाडय़ांत नवनव्या कल्पनांचं सर्जन करणाऱ्या ‘पब्लिक इनोव्हेटर्स’ना हुडकून त्यांचं काम सरकार, उद्योग व अन्य व्यासपीठांपर्यंत पोहोचवणे.
५. तरुण पिढीशी संवाद साधणं आणि त्यांना सामाजिक भान देणं याची नितांत गरज आहे. त्यादृष्टीने सामाजिक भान देणाऱ्या मराठीतील महत्त्वाच्या पुस्तकांची यादी तयार करून ती सर्व महाविद्यालयांपर्यंत पोहोचवणे.[]

लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा

लोकबिरादरी प्रकल्प (LBP) हे महाराष्ट्र सेवा समिती, वरोरा जि. चंद्रपूरद्वारे एक सामाजिक उपक्रम म्हणून राबविल्या जात आहे. या प्रकल्पांतर्गत रुग्णालय, शाळा व पशु अनाथालय चालविल्या जाते. २३ डिसेंबर १९७३ रोजी सामाजिक कार्यकर्ते मा. बाबा आमटे यांनी माडिया गोंड यांच्या एकात्मिक विकासासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे प्रकल्पाचे कार्य सुरू केले. सदर प्रकल्प गडचिरोली जिल्हा मुख्यालय पासून १६० कि.मी. अंतरावर आहे व आल्लापल्ली पासून ६० कि.मी. दूरवर आहे.[]
डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांची पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे या मेडिकल डायरेक्टर व मेडिकल ऑफिसर म्हणून येथे काम करतात व परिसरातील लोकांना आरोग्य, शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांना कम्युनिटी लीडरशिपसाठी २००८ मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आले.[]

बाह्य दुवे

  1. http://www.anandwan.in/ Archived 2014-12-31 at the Wayback Machine.
  2. http://www.lokbiradariprakalp.org/
  3. https://gadchiroli.gov.in/mr/gallery[permanent dead link]
  4. https://www.loksatta.com/ls-2015-diwali-news/anandvan-baba-amte[permanent dead link]

संदर्भ आणि नोंदी

  1. आनंदवन प्रयोगवन - डॉ. विकास आमटे - ANANDWAN PRAYOGWAN - DR. VIKAS AMTE
  1. ^ a b "आनंदवन समाजभान अभियान". 31 ऑक्टोबर 2019 रोजी पाहिले.
  2. ^ a b वेलणकर, संजीव. "समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे". https://www.marathisrushti.com. 31 ऑक्टोबर 2019 रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)
  3. ^ a b "लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा". https://gadchiroli.gov.in. 31 ऑक्टोबर 2019 रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)