आण्विक कचरा
आण्विक कचरा (इंग्लिश: Radioactive waste, रेडिओअॅक्टिव्ह वेस्ट ;) म्हणजे अणुभंजनातून निर्माण झालेला कचरा. हा रेडियो उत्सर्जक म्हणजेच किरणोत्सारी असतो आणि यामुळे कर्करोग होतो. यासाठी बहुदा युरेनियम हे खनिज वापरले जाते. अणुभट्टी कार्यान्वित झाल्यावर त्यातील इंधनामध्ये खूप प्रमाणात किरणोत्सारी भंजनोत्तर पदार्थ तयार होत असतात. परंतु हे ‘पदार्थ’ युरेनियम इंधन व त्यावरील धातूच्या अतिसुरक्षित कवचात बंदिस्त असल्याने सुरक्षित राहतात. हे भंजनोत्तर पदार्थ म्हणजे फिशन प्रॉडक्ट्स अणुकचऱ्याच्या स्वरूपात केवळ इंधन फेर प्रक्रियेनंतरच अस्तित्वात येतात. अणुभट्टी चालू असताना अशा पदार्थाची गळती झाल्यास त्या अणुकचऱ्याची विल्हेवाट लावणे आवश्यक ठरते. या व्यतिरिक्त न्यूट्रॉनच्या प्रहारामुळे तयार होणाऱ्या किरणोत्सारी पदार्थ अणुकचऱ्याच्या स्वरूपात तयार होतो. हा कचरा समुद्रतळाशी शिश्याच्या पेट्यांमध्ये ठेवला जातो. हा कचरा अंतराळात सोडण्याच्याही कल्पना पुढे आल्या आहेत.रेडियो उत्सर्जन हे पोटाद्वारे,श्वासाद्वारे,शोषल्या गेल्यामुळे वा टोचल्या गेल्यामुळे शरीरात गेल्यास मानवास अत्यंत हानीकारक आहे.
स्रोत
अणुऊर्जा निगडित अणुकचरा निर्माण होण्याचे चार प्रमुख स्रोत आहेत. हे सर्व स्रोत अणुइंधन चक्राशी निगडित आहेत व ते पुढीलप्रमाणे -
- युरेनियम खनिजाचे उत्पादन व शुद्धीकरण - टाकाऊ पदार्थातून रेडियम व तत्सम मूलद्रव्ये.
- इंधन सळ्यांचे उत्पादन- सौम्य प्रतीचा कचरा
- अणुभट्टी चालविणे- सौम्य किंवा मध्यम प्रतीचा कचरा. युरोनियमच्या भंजनातून निघणारे किरणोत्सारी पदार्थ काही प्रमाणात.
- इंधन फेरप्रक्रिया- तीव्र प्रतीचा कचरा. किरणोत्सारी भंजनोत्तर पदार्थ- अधिक प्रमाणात.
प्लुटोनियम मिळवण्यासाठी केलेल्या फेरप्रक्रियेतून मात्र दीर्घकालीन व तीव्र स्वरूपाच्या अणुकचऱ्याची निर्मिती होत असते. अणुकचऱ्याचे वर्गीकरण बहुधा तीन प्रकारात करता येते व ते त्याच्या किरणोत्सारी क्षमतेवर अवलंबून असते. या वर्गीकरणाप्रमाणे अणुकचरा सौम्य, मध्यम किंवा तीव्र अथवा प्रखर म्हटला जातो. या शिवाय तो घन, द्रव किंवा वायू रूपात असू शकतो. अणुकचऱ्याच्या वर्गीकरणाप्रमाणे त्याची विल्हेवाट ही योग्य पद्धतीने केली जाते. त्याच्यापासून अपाय होणार नाही असे पाहिले जाते.
विल्हेवाट
आण्विक कचऱ्याची विल्हेवाट मुख्यत: दोन प्रकारांनी केली जाते.
- सौम्य व घनरूप अणुकचरा जसे की उत्सर्गाच्या संसर्गात आलेले हातमोजे, कपडे इत्यादी सुरक्षितरित्या सिमेंट कॉंक्रिटच्या चरातून साठविले जातात.
- मध्यम स्वरूपाचा कचरा जो बहुधा द्रवरूप असतो व तीव्रता एक मिली क्युरी प्रति लिटरहून कमी असते. त्याची मात्रा प्रथम बाष्पीकरणाद्वारा कमी करून (कॉन्सन्ट्रेट) त्या मात्रेचा बीटूमेन, सिमेंट किंवा तत्सम पदार्थाबरोबर संयोग करून त्याला बंदिस्त साच्यात किंवा मॅट्रिक्स स्वरूपात सिमेंटच्या चरातून पुरतात.
- अगदी सौम्य द्रवरुपी कचऱ्याची म्हणजे तीव्रता एकसहस्रांश मिली क्युरी प्रति लिटरहून कमी असलेल्या कचऱ्यावर रासायनिक प्रक्रिया करून नंतर त्याला गाळून व विपुल प्रमाणात पातळ करून आलारा तत्त्वाप्रमाणे समुद्रात किंवा वातावरणात सोडण्यात येते. (आलारा तत्त्व म्हणजे व्यावहारिक द्रुष्टय़ा शक्य तितके कमी करणे)
प्रखर कचरा
संपूर्ण इंधनचक्रातील ९९ टक्के किरणोत्सारी मात्रा अतिप्रखर अणुकचऱ्यात सापडते. किरणोत्सारी तीव्रता १००० क्युरी प्रति लिटरच्या जवळपास असू शकते. अशा तऱ्हेच्या अणुकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी त्यावर कांचसदृश्य पदार्थाची प्रक्रिया करणे हा उपाय केला जातो. अणुकचरा बोरोसिलीकेट काचेच्या साच्यांत बंदिस्त केले जाते. हा अतिशय घट्ट व रासायनिकदृष्टय़ा टिकाऊ पदार्थ बनतो. अशा स्वरूपातील तीव्र अणुकचरा स्टेनलेस स्टीलच्या हवाबंद पिंपामध्ये साठवता जातो. पहिली २५ वर्षे तो भूमिगत साठवणीच्या व्यवस्थेखाली व देखरेखीखाली ठेवला जातो. त्यानंतर तो भूगर्भातील खडकांच्या आत साठवला जातो.
साठवणूक
अणुवीज केंद्रात वापरलेल्या इंधनाच्या सुरक्षित साठवणीची तरतूद नेहमीच करावी लागते. यासाठी पाण्याने भरलेल्या टाक्या बांधण्यात येतात व त्यात वापरलेले किरणोत्सारी इंधन पाण्याच्या साहाय्याने थंड ठेवण्यात येते. तसेच टाक्यांतील पाण्याने त्याच्या किरणोत्साराला प्रतिबंधही करता येतो. असे साठवलेले इंधन कालांतराने फेरप्रक्रियेस पाठवले जाते.
जल प्रदूषण